Rise and fall of cities in India-UPSC: स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. आजच्या विशेष लेखामध्ये पुराणशास्त्र आणि संस्कृती या विषयामधले तज्ज्ञ देवदत्त पट्टनायक भारतातील नगररचनेचा इतिहास उलगडून सांगत आहेत.
भारताच्या इतिहासाने पाच शहरीकरणे अनुभवली आहेत. पहिलं शहरीकरण हे भारताच्या वायव्येला इसवी सनपूर्व २५००-१९०० या कालखंडात व्यापारात अग्रगण्य असणाऱ्या हडप्पा संस्कृतीचे होते. ही एक विशाल संस्कृती होती. हडप्पा संस्कृतीचा आवाका आणि विस्तार समकालीन इजिप्त, चीन, आणि मेसोपोटेमिया या संस्कृतींपेक्षा अधिक मोठा होता.
सध्या पाकिस्तानमध्ये असलेली हडप्पा आणि मोहेंजोदारो ही या संस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करणारी सर्वात प्राचीन शहरे आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील इतर पुरातत्त्वीय स्थळांवर उत्खनन करण्यात आले. यात राजस्थानमधील कालीबंगन, गुजरातमधील ढोलावीरा आणि लोथल यांचा समावेश होता. ही नियोजित शहरे होती. या शहरांमध्ये प्रवेशाचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग वेगवेगळा होता. त्यामुळे लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येत असे. याशिवाय या शहरांची रचना ग्रीड पद्धतीसारखी (उभ्या आडव्या रेषांची) होती. संपूर्ण संस्कृतीतच वेगवेगळ्या शहरांमध्ये एकसमान प्रकारची वजनं आणि मापं वापरल्याचे आढळून आलेले आहे, किंबहुना विशिष्ट आकाराच्या एकसमान विटाही बांधकामासाठी वापरण्यात आल्या, त्या विटांचे प्रमाण १:२:४ असे आहे. मेसोपोटेमिया किंवा इजिप्तप्रमाणे, येथे राजवाडा किंवा मंदिर असलेल्या केंद्रीकृत राजेशाहीचा कोणताही पुरावा आढळत नाही. तसेच युद्ध किंवा कैद्यांचे कोणतेही चिन्ह आढळत नाही.
महाजनपदे
भारताच्या इतिहासात दुसरे शहरीकरण हडप्पा संस्कृतीनंतर १,५०० वर्षांनंतर घडले. आर्य किंवा इंडो-युरोपियन लोक दक्षिण रशियातून ऑक्सस मार्गे आले आणि त्यांनी बरोबर घोडे आणले. ही घटना सुमारे इ.स.पू. १५०० च्या सुमारास घडली. हे बहुतेक पुरुष होते, त्यांनी स्थानिक महिलांशी विवाह केला आणि त्यामुळे स्थानिक डीएनएच्या रचनेत बदल झाला. काळाच्या ओघात, हे समाज अधिक पूर्वेकडे गंगेच्या मैदानी प्रदेशात स्थलांतरित झाले. गंगेच्या सुपीक मैदानाने सिंधूचा मैदानी प्रदेश आणि त्यापलीकडील प्रदेशांबरोबर व्यापारी संबंध प्रस्थापित केले. इ.स.पू. ५०० च्या सुमारास नवीन शहरे उदयाला आली.
“गांधारपासून (पाकिस्तानातील स्वात खोऱ्यात आहे) ते मथुरेपर्यंत (गंगा नदीच्या खोऱ्यात) आणि मगध (बिहार) ते माळव्यापर्यंत (मध्य प्रदेश) सुमारे १६ महाजनपदे होती.”
हडप्पाप्रमाणे, ही शहरेही व्यापारी शहरे होती. महामार्गांचे संरक्षण करण्यासाठी टोल कर महत्त्वाचा ठरला. त्यामुळे राजाशी संबंधित चक्रवर्ती या संकल्पनेला महत्त्व प्राप्त झाले. या संकल्पनेचे प्रतिनिधित्त्व मोठे आरे असलेले चक्र करत होते. याच काळात बौद्ध आणि जैन हे सांघिक तत्त्वज्ञान उदयास आले. त्यांनी वैदिक कर्मकांडाला आव्हान दिले. ही चळवळ व्यापाराशी जोडलेली होती. दुसऱ्या शहरीकरणाविषयीची माहिती आपल्याला बौद्ध साहित्यामधून मिळते. भारतातील पहिली नाणी कदाचित इंडो-गंगेटिक मैदानी प्रदेशातील महाजनपदांनी पाडली असतील — आहत नाणी (पंच मार्क कॉईन्स) व्यापारी श्रेणींनी तयार केली. सुमारे ५ व्या शतकाच्या सुमारास, रोमचे पतन झाले, रोम हा भारताचा व्यापारी भागीदार होता शिवाय हूणांचे आक्रमण झाले यामुळे व्यापाऱ्यांचे महत्त्व कमी झाले. व्यापारात घट झाली. महाजनपदांचा ऱ्हास होऊ लागला.
मंदिरांचे शहर
तिसरे शहरीकरण एक हजार वर्षांनंतर दक्षिण भारत आणि आग्नेय आशियातील मंदिर शहरांच्या स्वरूपात झाले. येथे मंदिर हे राजकीय आणि आर्थिक कामांचे मुख्य सत्ताकेंद्र होते. मंदिराच्या सभोवती बाजारपेठा, दरबारातील अधिकारी, त्यांची निवासस्थाने आणि नर्तिका, त्यांची निवासस्थान होती. चौथ्या-पाचव्या शतकानंतर निर्यात-केंद्रित व्यापार कमी झाला, त्यामुळे शेतीचा विकास झाला. बौद्ध धर्म हळूहळू कमी होत असताना, ब्रह्मदेय किंवा ब्राह्मणांना/ मंदिरांना देणगी देण्याची प्रथा निर्माण झाली. मंदिराची महामंडळं तयार झाली. त्यामुळे मंदिरं ही राजकीय सत्ता आणि संपत्तीची केंद्र झाली. या मंदिरांमध्ये ब्राह्मण पुजारी, क्षत्रिय आश्रयदाता, वैश्य व्यापारी, कलाकार इत्यादी होते. अंतर्विवाह (एंडोगामी) वाढले आणि जातिव्यवस्था अधिक दृढ झाली. दहाव्या शतकातील चोलांच्या काळात मंदिर शहरीकरण पूर्णपणे विकसित झाले होते. हे शहरीकरण व्यापारापेक्षा शेतीप्रधान होते.
मुस्लिम महानगरे
चौथे शहरीकरण म्हणजे मुस्लिम महानगरांच्या (१२वे-१७वे शतक) विकासाचा कालखंड. हे शहरीकरण मुख्यतः कृषीप्रधान होते. मौर्य साम्राज्यात दरबारींना नाण्यांद्वारे वेतन दिले जात असले तरी, या काळात जहागिरी प्रथेनुसार त्यांना गावाच्या संपत्तीतील हिस्सा देऊन वेतन दिले जाऊ लागले. दिल्ली एक केंद्रीय शहर म्हणून उदयास आले. सूफी पंथाच्या प्रसारासह दरगाह (पवित्र स्थळे) आणि पीरांना महत्त्व प्राप्त झाले. जामा मशीद या शहरांमध्ये केंद्रबिंदू ठरली. इथून शुक्रवारीच्या प्रार्थनेत (khutbah-खुतबा) राजाचे नाव घेतले जाऊ लागले. कारण या दिवशी प्रार्थनेसाठी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत असत. याच काळात अहमदाबाद, बीदर, आणि गुलबर्गा यांसारखी शहरे विकसित झाली.
वसाहतवादी कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर शहरे
सतराव्या शतकापासून पाचवे शहरीकरण हे वसाहतवादी कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर शहरांचे होते. पोर्तुगीज वसाहतवादाच्या वर्चस्वाची सुरुवात वास्को दा गामा याच्या १४९८ साली केरळमधील आगमनानंतर झाली. त्यांनी किनारपट्टीवरील भाग काबीज केला. त्यात पश्चिम किनारपट्टीवरील दिव, बों बहीया (बॉम्बे- मुंबई) ते गोवा आणि कोचीन, आणि पूर्व किनारपट्टीवर मछलीपट्टणम ते मायलापूर (सध्याचे चेन्नई) ते थुथुकुडीपर्यंतच्या प्रदेशांचा समावेश होता. त्यांनी किल्ले बांधण्यास सुरुवात केली. ही स्थळ सैनिकी ठाणी आणि प्रशासकीय केंद्रे म्हणून काम करत होती. याच कालखंडात चर्च, कॅथेड्रल आणि प्रशासकीय इमारती मोठ्या प्रमाणात बांधल्या गेल्या. या वास्तुरचनेत युरोपियन स्थापत्यशास्त्रातील घुमट, कमानी, आणि वॉल्ट्स या वैशिष्टयांचा समावेश झाला.
मुंबई, चेन्नई, कलकत्ता, कोची यांसारखी मोठी किनारी शहरे निर्माण झाली. या शहरांमध्ये तटबंदीयुक्त्त वसाहती निर्माण झाल्या. या वसाहती पोर्तुगीज, डच, फ्रेंच किंवा ब्रिटिशांच्या होत्या. एकोणिसाव्या शतकात रेल्वे आल्यानंतर या शहरांमध्ये मोठे बदल दिसू लागले. रेल्वे स्टेशन, न्यायालये (कायदेशीर व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी) आणि क्लॉक टॉवर्स (कामाचे तंत्रज्ञानिकरण करण्यासाठी) बांधकाम झाले, त्यामुळे एक नवीन औद्योगिक आणि साम्राज्यवादी शहरी दृश्य तयार झाले.
स्वातंत्र्यानंतर नियोजित शहरांचा विकास झाला. चंदीगढ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या शहराची रचना (मास्टर प्लान) स्विस-फ्रेंच वास्तुविशारद ले कॉर्बुझर यांनी तयार केला होता; भुवनेश्वरला १९४८ साली ओडिशाची राजधानी म्हणून निवडण्यात आले, ज्यात मंदिरांचा समावेश आधुनिक प्रशासनाच्या गरजांमध्ये केला गेला; गुजरातला मुंबई मिळणार हे फोल ठरल्यानंतर १९६० साली गांधीनगरची स्थापना झाली. भारताच्या पंचवार्षिक योजनांचा भाग म्हणून प्रचंड औद्योगिकीकरणामुळे भिलाई, जमशेदपूर, आणि रूरकी यांसारखी औद्योगिक शहरे देखील उभी राहिली. ही शहरे औद्योगिक होती, पण समाजवादी दृष्टिकोनातून चालणारी होती, त्यांनी भव्य कलात्मकता टाळली.
अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास | मातीची भांडी संस्कृतीची झलक कशी देतात?
विषयाशी संबंधित प्रश्न:
हडप्पा संस्कृतीच्या नगर रचनेच्या वैशिष्ट्यांवर चर्चा करा.
हडप्पा काळातील व्यापारी शहरीकरणापासून स्वातंत्र्यानंतरच्या औद्योगिक शहरांपर्यंत भारताचे शहरीकरण कसे विकसित झाले?
१७ व्या शतकातील पोर्तुगीज वसाहतवादाने भारतातील किनारी शहरांना कसा आकार दिला?
१९ व्या शतकात रेल्वे आल्यामुळे विविध युरोपीय सत्तांच्या अंतर्गत शहरे औद्योगिक आणि साम्राज्यवादी केंद्रे कशी बनली?