SBI Recruitment 2023: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामधील तीन विविध विभागांमधील रिक्त पदांसाठी भरती सुरु झाली आहे. बॅंकेने दिलेल्या सूचनापत्रकानुसार, नियमित आणि कंत्राटी तत्वावर स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर अंतर्गत रिटेल प्रॉडक्ट बॅंकिंग मॅनेजर, कार्यकारी शिक्षण प्राध्यापक आणि वरिष्ठ कार्यकारी (स्टॅटिस्टिक्स) या तीन जागांसाठी भरती सुरु झाली आहे. या संबंधित सविस्तर माहिती स्टेट बॅंकेच्या sbi.co.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
एसबीआयच्या रिटेल प्रॉडक्ट बॅंकिंग मॅनेजर या पदासाठी नियमित पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. एसबीयने जाहीर केलेल्या भरती सूचनापत्रकानुसार (सं.CRPD/SCO/2022-23/32), रिटेल प्रॉडक्ट बॅंकिंग मॅनेजरच्या फक्त ५ पदांसाठी उमेदवारांची नियमित पद्धतीने निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २३ फेब्रुवारी रोजी सुरु झाली आहे. २१ दिवसांनंतर अर्ज करण्याची मुदत संपणार आहे. इच्छुक उमेदवार बॅंकेच्या वेबसाइटवर जाऊन संबंधित माहिती मिळवू शकतात. तेथेच अर्ज करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
निवड प्रक्रियेद्वारे कार्यकारी शिक्षण प्राध्यापक या पदासाठी २ उमेदवार, तर वरिष्ठ कार्यकारी (स्टॅटिस्टिक्स) या पदासाठी एका उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. या दोन्ही पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची भरती कंत्राटी तत्त्वावर होणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामधील या जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २३ फेब्रुवारी रोजी सुरु झाली असून १५ मार्च २०२३ हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज करण्यासाठीची शैक्षणिक पात्रता, वयाची अट याबद्दलची संपूर्ण माहिती एसबीआयच्या वेबासाइटवरुन मिळवू शकता.
वार्षिक वेतन-
नियमित पद्धतीने भरती होत असल्याने रिटेल प्रॉडक्ट बॅंकिंग मॅनेजरला दर महिन्याला ६३,४८० ते ७८,२३० रुपये पगार मिळणार आहे. तसेच लागू डीए, एचआरए, सीसीए, पीएफ, पेन्शन, एलएफसी, वैद्यकीय भत्ते अशा सुविधा देखील मिळणार आहेत. तर कार्यकारी शिक्षण प्राध्यापक म्हणून निवड झालेल्या उमेदवाराला वर्षाला २५ ते ४० लाख रुपये वेतन मिळणार आहे. तर वरिष्ठ कार्यकारी (स्टॅटिस्टिक्स) पदासाठी निवडल्या गेलेल्या व्यक्तीला वर्षाला १५ ते २० लाख रुपये पगार मिळणार आहे.