प्रवीण निकम
उच्च शिक्षणाच्या संधी घेत आपली स्वप्ने साकारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेकांना वेगवेगळ्या टप्प्यावर स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. हा उच्च शिक्षणाचा प्रवास करताना अनेक गोष्टी नव्याने शिकाव्या लागतील, आत्मसात कराव्या लागतील. विविध शिष्यवृत्या, सरकारी योजनांचे लाभार्थी होत असताना आपल्याला वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत. तेव्हाच आपल्याला यशस्वी करिअरच्या संधी मिळण्यास मदत होते. यातील महत्त्वपूर्ण कौशल्य म्हणजे नेतृत्व कौशल्य.
विविध शिष्यवृत्तींसाठी स्वत:ला तयार करताना संघर्षांचे निराकरण करणे आणि शैक्षणिक वाटचालीत येणाऱ्या समस्यांचे अडचणींचे व्यवस्थापन करणे यासह अनेक व्यावसायिक कौशल्ये आपल्याला शिकावी लागणार आहेत. या सर्व भूमिका निभावताना आपल्याला लागते ते नेतृत्व कौशल्य. उच्च शिक्षणाच्या वाटचालीत शैक्षणिक आणि परस्पर कौशल्ये सुधारण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे नेतृत्व कौशल्य शिकणे होय. ‘स्व’चे महत्त्व ओळखणे आणि प्रभावशाली नेतृत्वासाठी दृष्टिकोन तयार करणे हेही महत्त्वाचे आहे. एखाद्या विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी अभ्यासक्रम निवडताना किंवा प्रवेश घेताना संपूर्ण प्रक्रियेत आपले नेतृत्व कौशल्य आवश्यक असते. कारण, विषयातील नावीन्य शोधण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रियेसाठीच्या सादरीकरणासाठी नेतृत्व कौशल्य गरजेचे आहे. पुढे अभ्यासक्रम शिकत असताना, तुम्ही जे काही शिकता व वाचता यातील मजकूर अनेकांसमोर सादर करावा लागतो. अभ्यास व सादरीकरण करत असताना सखोल वाचनासह संदर्भ देऊन सादर करून स्वत:चा मुद्दा मांडावा लागतो. अशावेळी सुद्धा नेतृत्व कौशल्य तुम्हाला साहाय्यभूत ठरते.
हेही वाचा >>> नोकरीची संधी : असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
ज्ञान, कौशल्य आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक आणि कृतिशील वृत्तीद्वारे जे कायम इतरांच्या मनामध्ये स्थान मिळवितात आणि एखाद्याच्या प्रभावशाली अभ्यासाच्या मागे लागून त्याचा सातत्याने पाठपुरावा करतात म्हणजे नेतृत्व. याच नेतृत्व कौशल्याच्या जोरावर विद्यार्थी उत्तम सादरीकरणासह रोजगार मिळवण्यासाठी इंटर्नशिप व नोकरी मिळण्यास प्राप्त ठरतात. या शैक्षणिक वाटचालीत स्वयंप्रेरित, इतरांना प्रभावित करणारे, आंतरव्यक्ती संबंध जोपासणारे, सर्जनशील, चिकित्सक विचार करणारे, निर्णयक्षम आणि संघ बांधणी करण्याची क्षमता इत्यादी अनेक गुण आत्मसात करावे लागणार आहे. आपल्याकडे विविध सरकारी योजना आणि शिष्यवृत्या आहेत ज्या तुमची उच्च शिक्षणाची वाटचाल सोपी करतील. त्या शिष्यवृत्या तुम्ही तेव्हाच मिळवू शकता जेव्हा तुम्ही त्यासाठी लागणाऱ्या विविध कौशल्यावर आधी काम कराल. तुम्हाला या शिष्यवृत्ती देत असताना अर्थात तुमच्यात खरोखर समाजाचे नेतृत्व करण्याची बदल घडविण्याची ताकद आहे का यावर निश्चितपणे विचार केला जातो. त्यामुळे शिष्यवृत्ती मिळविण्याचा प्रवास हा खूप गरजेचा व महत्त्वपूर्ण टप्पा आहे. जो अनेक कौशल्यांचा आधार घेत तुम्ही पूर्ण करणार आहात. अनेकजण अशा विद्यार्थ्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त तत्पर असतात जे अशा सर्व कौशल्याने परिपूर्ण आहेत. तेव्हा आपण प्रयत्न करू या की या उच्च शिक्षण घेताना शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करताना आपण या सर्व कौशल्याने परिपूर्ण विद्यार्थी म्हणून आपण घडत जाऊ आणि नवे-नवे अवकाश शोधत राहू. लेखमालेच्या पुढील सत्रापासून आपण विविध शिष्यवृत्ती बद्दल जाणून घेण्यास सुरुवात करू या.
(लेखक ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे चेवेनिंग स्कॉलर आहेत.)