प्रवीण निकम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मित्रांनो लेखमाला सुरू होऊन काही महिने झालेत. अनेकांचे पदवीचे किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले असेल. खास करून विज्ञान किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील पास झालेले अनेक जण वेगवेगळ्या संधींच्या शोधात असतील. अशावेळी एखादी फेलोशिप त्यांच्या भविष्यातील वाटचालीत सहाय्यभूत ठरणारी असते. मुळातच उच्च शिक्षण घेत असताना फेलोशिप करणे हे तुमच्या एकंदर प्रोफाइलच्या बाजूने झुकणारी गोष्ट आहे हे कायम लक्षात ठेवा. कारण या फेलोशिप तुम्हाला प्रत्यक्ष कामाच्या, संशोधनाच्या आणि नवनवीन गोष्टी शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देत असतात. त्यामुळेच आज आपण एका फेलोशिप विषयी जाणून घेणार आहोत आणि ही फेलोशिप आहे, क्वाड फेलोशिप.

क्वाड फेलोशिप हा ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि युनायटेड स्टेट्सच्या सरकारांचा एक सांघिक उपक्रम आहे. २४ सप्टेंबर २०२१ मध्ये क्वाड भागीदारांद्वारे सुरू झालेला हा शिष्यवृत्ती कार्यक्रम पुढील पिढीतील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांमध्ये संबंध निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. क्वाड फेलोशिप प्रत्येक क्वाड देशातील शैक्षणिक, परराष्ट्र धोरण आणि खासगी क्षेत्रातील नेत्यांनी बनलेल्या गैर-सरकारी टास्क फोर्सशी सल्लामसलत करून चालविली जाते. २०२४ पासून, ही फेलोशिप इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन ( IIE) द्वारे प्रशासित केली जाणार आहे.

क्वाड फेलोशिप ही मास्टर्स आणि डॉक्टरेट विद्यार्थ्यांना युनायटेड स्टेट्समध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित ( STEM) चा अभ्यास करण्यासाठी साहाय्य करणारी फेलोशिप आहे. या वर्षीपासून ही फेलोशिप ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि युनायटेड स्टेट्स या चार क्वाड देशांमधील विद्यार्थ्यांना तसेच आशियाई देशांमधील विद्यार्थ्यांचे संशोधनात्मक अभ्यासासाठी संधी उपलब्ध करून देत आहे.

फेलोशिप खासगी, सार्वजनिक आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये, त्यांच्या स्वत:च्या राष्ट्रांमध्ये आणि क्वाड देशांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान तज्ज्ञांचे नेटवर्क विकसित करत आहे. हा कार्यक्रम क्वाड फेलोशिप मध्ये समाविष्ट सर्व देशाच्या सर्वोच्च शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि राजकारण्यांसोबत प्रोग्रामिंग आणि नेटवर्किंग संधींद्वारे एकमेकांच्या समाज आणि संस्कृतीमधील दुवा होत अधिकाधिक सांघिक ऐक्य निर्माण करत जागतिक पातळीवर बदल घडविण्यासाठी युवकांना तयार करीत आहे. फेलोशिप दरम्यान, क्वाड फेलोना नेटवर्क करण्याची आणि STEM, सरकार आणि समाजातील कुशल विचारांसह प्रोग्रामिंगमध्ये करिअर करण्याची संधी मिळत आहे. या फेलोशिपचा सर्वात मोठा फायदा विद्यार्थ्यांना हा होणार की आर्थिक लाभ तर होईलच पण क्रॉस-कल्चरल एक्सचेंज, नेटवर्किंग आणि प्रोग्रामिंगचे एक नवं क्षेत्र आणि त्यातील संधी विद्यार्थ्यांसाठी या निमित्ताने खुल्या झाल्या आहे. प्रत्येक क्वाड फेलोला शैक्षणिक खर्चासाठी वापरण्यासाठी $40,000 चा एक-वेळचा स्टायपेंड मिळणार आहे.

आता अर्थात मग प्रश्न पडतो की इतकी उत्तम संधी असणारी ही फेलोशिप करताना कोणकोणत्या अटी शर्ती असणार आहेत. तर याचे पात्रतेचे निकष म्हणजे अर्ज करताना विद्यार्थ्याचे किमान वय किमान १८ वर्षे असावे. ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, किंवा युनायटेड स्टेट्स – किंवा १० आशियाई देशांपैकी – ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड, यापैकी एकाचा नागरिक किंवा कायदेशीर कायमचे रहिवासी असावा. याच वर्षी अर्ज करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑगस्ट २०२४ पर्यंत STEM फील्डमध्ये बॅचलर पदवी किंवा त्याच्या समकक्ष पदवी मिळवलेली असावी. शिवाय संभाव्य पदवीधर विद्यार्थ्याने २०२४-२५ शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी यूएस-आधारित विद्यापीठात पात्र STEM पदवीधर प्रोग्रामसाठी आधीच अर्ज केलेला असणे आवश्यक आहे. या विषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही क्वाड फेलोशिपच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ही माहिती घेऊ शकता आणि अर्ज देखील करू शकता. त्यासाठी वेबसाईट – QuadFellowshipInfo@iie. org

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scholarship quad fellowship higher education career news amy
Show comments