अॅड. प्रवीण निकम
विद्यार्थी मित्रांनो कसे आहात? गेल्या अनेक लेखांमधून आपण भेटत आहोत. वेगवेगळ्या शिष्यवृत्त्यांबद्दल जाणून घेत आहोत. हे सर्व जाणून घेताना मी लेखात अनेकदा फेलोशिप करा असेच सांगत आलोय. आज आपण याच फेलोशिप विषयी अधिक माहिती घेऊया. तर सर्वात आधी आपल्याला हे माहीत हवे की फेलोशिप म्हणजे काय? तर फेलोशिप हा शब्द ‘कोइनोनिया’ या ग्रीक शब्दापासून आला आहे. कोइनोनियाची व्याख्याच करायची झाल्यास ती ‘काहीतरी समान असणे’ अशी केली जाऊ शकते. आपल्याला स्वारस्य असणाऱ्या गोष्टींमध्ये काहीतरी करून ती गोष्ट अधिक जाणून घेण्याच्या दृष्टीने झालेला अभ्यासपूर्ण प्रवास म्हणजे ‘फेलोशिप’.
अशा फेलोशिप जवळजवळ सर्वच क्षेत्रात असतात, जे तुमच्या ज्ञानाला सखोलता देतात, अनुभवाची बैठक प्रदान करतात. तुमच्यापैकी अनेकांना शिक्षण क्षेत्र आवडत असावे आणि या क्षेत्रात काहीतरी भरीव करावे असेच वाटत असेल आणि हे करताना गाठीशी एक ठोस अनुभव असेल तर ते कारण अधिक सोपं होईल असाही विचार येत असेल. यावरच उपाय असणाऱ्या ‘टीच फॉर इंडिया फेलोशिप’. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना अनुभव समृद्ध करणाऱ्या या फेलोशिप बद्दल आज जाणून घेऊ या.
‘टीच फॉर इंडिया’ची स्थापना २००८ मध्ये झाली. टीच फॉर अमेरिकाच्या प्रवासातून प्रेरित होऊन, सर्व मुलांनी उत्कृष्ट शिक्षण घेतले पाहिजे या विश्वासाभोवती काम करण्यासाठी सुरू झालेली ही संस्था. ‘टीच फॉर इंडिया फेलो’ म्हणून काम करताना तुम्हाला तुमचा उद्देश शोधण्यासाठी आणि तुमच्या करिअरला चालना देण्यासाठी नेतृत्व अनुभव मिळून तुम्हाला भारतातील मुलांच्या भविष्यावर प्रभाव टाकण्याची संधी मिळेल. शिक्षण क्षेत्रात काम करताना प्रामुख्याने गरज असणाऱ्या, सर्वात तळाशी असणाऱ्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नात तुम्ही सहभागी होऊ शकता. अनेक वर्षाचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या ‘टीच फॉर इंडिया’चे फेलो कोण आहेत तर? आतापर्यंत १४०,००० लोकांनी फेलोशिपसाठी अर्ज केलेले आणि ४,५०० लोकांनी दोन वर्षांचा कार्यक्रम पूर्ण केलेले अनेक जण आतापर्यंतचे फेलोज् आहेत. हे फेलोज् विविध पार्श्वभूमी, प्रवाह आणि ५०० पेक्षा जास्त महाविद्यालये, विद्यापीठे आणि ३०० हून अधिक कंपन्यांमध्ये पसरलेल्या वयोगटातून येतात. आतापर्यंत अहमदाबाद, बेंगळूरु, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई किंवा पुणे या ८ प्रमुख शहरामध्ये टीच फॉर इंडिया फेलोशिपचा हा उपक्रम राबविला जात आहे.
या फेलोज्कडे असणारी जबाबदारी म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या सरकारी किंवा परवडणाऱ्या खासगी शाळेत पूर्णवेळ शिक्षक म्हणून सर्व विषय शिकवणे. ज्यात प्रामुख्याने इंग्रजी, गणित, सामाजिक अभ्यास किंवा विज्ञान यासारखे विशिष्ट विषय शिकवले जातात. यात तुम्हाला पहिली ते १० वी च्या वर्गातील ४० ते ८० विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम फेलोज म्हणून करायचे असते. या फेलोशिपचा प्रवास एका निवासी प्रशिक्षण संस्थेपासून सुरू होतो, जिथे तुम्ही अभिनव, पुनर्कल्पित पद्धतीने शिकवण्यासाठी सुसज्ज शिक्षक बनण्याची कौशल्ये आणि मानसिकता शिकता. वर्गातील आणि त्यापलीकडे अनुभवातून शिकता, ऑन-द-ग्राउंड प्रशिक्षण तुम्हाला दिले जाते. ‘शिक्षण क्षेत्र’ जी सर्व बदलाचे मूलभूत स्राोत किंवा कारण आहे, त्या क्षेत्रात अशी अभ्यासपूर्ण फेलोशिप करायला मिळणे ही तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक परिपूर्ण करणारी असशीच आहे.
या फेलोशिपसाठीची पात्रता निकष सांगायचे झाले, तर तुमचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असावे. जुलै २०२४ पासून २०२५ फेलोशिपसाठी तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे किंवा भारताचे परदेशी नागरिक (OCI) असावे. फेलोशिपचे माध्यम इंग्रजी असल्या कारणास्तव तुम्हाला या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
फेलोशिप निवड प्रक्रियेचे ३ टप्पे आहेत. या भूमिकेसाठी तुमची ताकद आणि प्रेरणा समजून घेण्यासाठी हे टप्पे करण्यात केले आहे.
तुमचा शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास तसेच फेलोशिपमध्ये सामील होण्यासाठी तुमची आवड, अनुभव आणि प्रेरणा, तुमचा परिचय जाणून घेतले जाते. फेलोज् इंग्रजी भाषेमधून शिकवतात म्हणून, इंग्रजी विषयाचे मूल्यांकन केले जाते.
काही अर्जदारांना अधिक जाणून घ्यायचे असल्यास त्यांची मुलाखत देखील घेतली जाते.
निवडीचा अंतिम टप्पा! येथे तुम्ही टीच फॉर इंडिया आणि इतर अर्जदारांसोबत तुम्हाला एक नमुना पाठ शिकवणे, गटासोबतचे कार्य आणि मग प्रत्यक्ष मुलाखत असे तीन टप्पे पार करावे लागतात.
या निवड प्रक्रियेनंतरच तुमच्या फेलोशिप अर्जाचा सकारात्मक विचार व निवड केली जाते. फेलोशिप साठी तुमची निवड झाली तर तुम्हाला २५,३४४ रु. मासिक वेतन मिळते व ६,००० रु. ते १०,००० रु. मासिक भरपाई भत्ता दिला जाते. (मासिक भत्ता म्हणून दिली जाणारी रक्कम शहरानुसार बदलू शकते.)
‘टीच फॉर इंडिया फेलोशिप’ हे तुम्हाला भारतातील तळागाळातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची संधी देते. एखाद्या देशाचे भविष्य ही त्या देशाची भावी पिढी असते. ती भावी पिढी अधिक सक्षम पद्धतीने घडविण्याची इच्छ असणाऱ्या शिक्षण क्षेत्रात काहीतरी भरीव करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही फेलोशिप एक अभ्यासपूर्ण प्रवास असणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही https:// www. teachforindia. org/ fellowship या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.