विद्यार्थी मित्रांनो १३ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या लेखात आपण ‘विज्ञान तंत्रज्ञान’ या विषयाची तयारी कशी करायची ते जाणून घेतले होते. या लेखात आपण ‘विज्ञान तंत्रज्ञान’ या विषयातील ‘संगणक तंत्रज्ञान’ या घटकाबद्दल जाणून घेणार आहोत. या घटकावर नियमितपणे प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती आपणास दिसून येते. २०२२ च्या युपीएससी पूर्वपरीक्षेत यावर जवळपास ६ प्रश्न विचारले होते. २०२४ मध्येही बिग डेटा अॅनालिटिक्स, क्रिप्टोग्राफी, मेटाव्हर्स व आभासी मॅट्रिक्स अशा संकल्पना समोर ठेवून प्रश्न विचारलेले आहेत.

२०२४ यूपीएससी पूर्वपरीक्षेतील खालील प्रश्न बघा –

● प्र. ‘लाखो वापरकर्त्यांद्वारे एकाच वेळी प्रवेश करता येणारे, आभासी वस्तूंवर मालमत्ता अधिकार वापरणारे, ३डी आभासी जगाचे एक इंटरऑपरेबल नेटवर्क’ दर्शविण्यासाठी खालीलपैकी कोणता शब्द/वाक्प्रचार सर्वात योग्यरित्या वापरला जातो?

(अ) बिग डेटा अॅनालिटिक्स

(ब) क्रिप्टोग्राफी

(क) मेटाव्हर्स

(ड) आभासी मॅट्रिक्स

‘मेटाव्हर्स’ हा शब्द ३डी आभासी जगांचे एक आंतरकार्यक्षम नेटवर्क दर्शवितो ज्यामध्ये लाखो वापरकर्त्यांद्वारे एकाच वेळी प्रवेश करता येतो, जे आभासी वस्तूंवर मालमत्ता अधिकार वापरणारे असू शकतात. त्यामुळे वरील प्रश्नांचे उत्तर ‘क’ आहे.

अभ्यास करताना आपण पर्यायातील इतर तंत्रज्ञानाच्या संकल्पना समजून घेणे अपेक्षित आहे. उदा –

क्रिप्टोग्राफी म्हणजे माहितीचे संरक्षण करण्यासाठी कोड आणि अल्गोरिदम वापरण्याची पद्धत. जी फक्त इच्छित प्राप्तकर्तेच ती वाचू शकतात. याचा वापर स्टोरेजमध्ये, ट्रान्झिटमध्ये आणि वापरात असताना डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. बिग डेटा अॅनालिटिक्स म्हणजे विशेष साधने आणि तंत्रे वापरुन मोठ्या प्रमाणात डेटाचे परीक्षण करणे. जेणेकरून लपलेले नमुने, ट्रेंड आणि अंतर्दृष्टी शोधता येतील व त्याचा वापर व्यवसाय आणि संस्थांना चांगले निर्णय करता येईल.

‘व्हर्च्युअल मॅट्रिक्स’ ही सॉफ्टवेअर-आधारित प्रणाली असून ती वापरकर्त्यांना एकापेक्षा अधिक मॉनिटर्सवर किंवा व्हिडिओ वॉलवर व्हिडिओ डिस्प्ले नियंत्रित करण्याची परवानगी देते. भौतिक हार्डवेअरशिवाय ते पारंपारिक अॅनालॉग मॅट्रिक्सशी जोडलेले आहे. कोणतेही चांगले तंत्रज्ञान हे दीर्घकालीन असते. त्यामुळे ते चर्चेत आल्यानंतर त्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नजीकच्या २ ते ३ वर्षात असते. तेव्हा या संकल्पना उदहरणांसाह समजून घेणे गरजेचे आहे. चालू घडामोडींमधील पुन्हा-पुन्हा चर्चेत असणारे तंत्रज्ञान आपण जाणून घेणे गरजेचे आहे.

२०२२ यूपीएससी पूर्वपरीक्षेतील खालील प्रश्न बघा –

● वेब ३.० च्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या. (२०२२)

१. वेब ३.० तंत्रज्ञानामुळे लोकांना त्यांचा स्वत:चा डेटा नियंत्रित करता येतो.

२. वेब ३.० च्या जगात ब्लॉकचेनवर आधारित सोशल नेटवर्क्स असू शकतात.

३. वेब ३.० हे कॉर्पोरेशनऐवजी वापरकर्त्यांद्वारे एकत्रितपणे चालवले जाते.

वरीलपैकी कोणते विधान(ने) बरोबर आहेत?

(अ) १ आणि २

(ब) २ आणि ३

(क) १ आणि ३

(ड) १, २ आणि ३

वेब ३.० इंटरनेटच्या संभाव्य पुढील टप्प्याचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर चालणारे विकेंद्रित इंटरनेट हे मॉडेल वापरात असलेल्या वेब १.० आणि वेब २.० या आवृत्त्यांपेक्षा वेब ३.० वेगळे आहे. वेब ३.० मध्यस्थीची भूमिका काढून टाकून पीअर टू पीअर (विक्रेता ते खरेदीदार) व्यवहारांना सक्षम करते. वेब ३.० मध्ये, वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्म आणि अनुप्रयोगांमध्ये मालकी हक्क असतात. वेब ३.० ‘विकेंद्रित आणि निष्पक्ष इंटरनेट प्रदान करते जिथे वापरकर्ते त्यांचा स्वत:चा डेटा नियंत्रित करतात.’

कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या चर्चेचा विषय आहे त्यावर विचारिलेला हा प्रश्न बघा –

● सध्याच्या विकासाच्या स्थितीत, कृत्रिम बुद्धिमत्ता खालीलपैकी कोणते कार्य प्रभावीपणे करू शकते?

१. औद्याोगिक युनिट्समध्ये विजेचा वापर कमी करणे.

२. अर्थपूर्ण लघुकथा आणि गाणी तयार करणे.

३. रोग निदान करणे.

४. टेक्स्ट-टू-स्पीच रूपांतरण करणे.

५. विद्याुत उर्जेचे वायरलेस ट्रान्समिशन करणे.

खाली दिलेल्या कोड वापरून योग्य उत्तर निवडा.

(अ) फक्त १, २, ३ आणि ५

(ब) फक्त १, ३ आणि ४

(क) फक्त २, ४ आणि ५

(ड) फक्त १, २, ३, ४ आणि ५

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) म्हणजे मानवांसारखे विचार करण्यासाठी आणि त्यांच्या कृतींची नक्कल करण्यासाठी प्रोग्राम केलेल्या मशीनमध्ये मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करणे. आजच्या समाजात, आरोग्यसेवा, मनोरंजन, वित्त, शिक्षण इत्यादी अनेक उद्याोगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध उपयोग आहेत. वरील सर्व कार्ये ते करू शकते.

२०२२ युपीएससी पूर्वपरीक्षेतील खालील प्रश्न बघा –

● ‘सॉफ्टवेअर अॅज अ सर्व्हिस ( SaaS)’ च्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या.

१. ‘सॉफ्टवेअर अॅज अ सर्व्हिस’ खरेदीदार वापरकर्ता इंटरफेस कस्टमाइझ करू शकतात आणि डेटा फील्ड बदलू शकतात.

२. ‘सॉफ्टवेअर अॅज अ सर्व्हिस’ वापरकर्ते त्यांच्या मोबाइल डिव्हाइसद्वारे त्यांचा डेटा अॅक्सेस करू शकतात.

३. आउटलुक, हॉटमेल आणि याहू! मेल हे ‘सॉफ्टवेअर अॅज अ सर्व्हिस’ चे प्रकार आहेत.

● वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत?

(अ) १ आणि २

(ब) २ आणि ३

(क) १ आणि ३

(ड) १, २ आणि ३

सॉफ्टवेअर अॅज अ सर्व्हिस च्या संदर्भात सर्व विधाने बरोबर आहेत. संगणक तंत्रज्ञानातील ‘क्यूबिट’ या संकल्पनेवरही प्रश्न विचारलेला असून ही संज्ञा क्वांटम कम्प्युटिंगशी संबंधित आहे. नियमितपणे प्रश्न अपेक्षित असलेला हा घटक चांगल्याप्रकारे अभ्यासाने काळाची गरज आहे.

sushilbari10 @gmail. com