कृषी अभियांत्रिकी या क्षेत्रात मागील चार वर्षांत बरेच बदल झाले. स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयांचा अभ्यासक्रम कमी झाला. या एका गोष्टीमुळे या क्षेत्रामध्ये स्पर्धाच कमी झाली. या अगोदर सर्वात जास्त मेरिट हे कृषी अभियांत्रिकी या विभागात लागत असे. सन २०२५ पासून स्पर्धा परीक्षेमध्ये आमूलाग्र बदल होत असून या शाखेचे सर्व अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे समाविष्ट केला आहेत. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चारही कृषी विद्यापीठांमध्ये या शाखेचा समावेश आहे.

कृषी अभियांत्रिकीचा इतिहास

अभियांत्रिकी ही मानवी अस्तित्वाच्या सुरुवातीपासूनच जीवनाचा एक पैलू राहिला आहे. भारतीय इतिहासात इसवी सन पूर्व ९००० वर्षांपूर्वी पासूनच शेती ही संकल्पना विकसित होत गेली. हळूहळू सिंधु संस्कृतीच्या खोऱ्यात पाळीव प्राणी शेळी, हत्ती, बैल यांचा शेतीसाठी उपयोग होऊ लागला. चाकाच्या शोधानंतर तर शेती विकासाला एक वेगळीच दिशा मिळाली. कृषी अभियांत्रिकीचा शोध तसा प्राचीनच पण ही संकल्पना अमेरिकन वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. मॅसन ह्योग यांनी १८९४-१९७८ या कालखंडात मांडली व आधुनिक तंत्रज्ञाच्या आधारे भारतीय शेती यांत्रिकीकरणाकडे वळू लागली याचे उत्तम उदाहरण म्हणजे हरितक्रांती.

या शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमात महत्त्वाचे सात विभाग आहेत ते खालीलप्रमाणे :

● कृषी यंत्र व शक्ति विभाग

● निचरा व सिंचन विभाग

● मृदा व जलसंधारण विभाग

● कृषी प्रक्रिया विभाग

● विद्याुत व ईतर ऊर्जा विभाग

● कृषी स्थापत्य विभाग

● मूलभूत विज्ञान व संगणक विभाग

कृषी अभियांत्रिकी पदवीनंतर नोकरीच्या संधी

कृषी अभियांत्रिकी पदवी नंतर आपल्या समोर सर्वच क्षेत्रातील विविध प्रकारच्या विविध पदांवर असलेल्या संधी उपलब्ध आहेत. त्याच थोडक्यात विश्लेषण.

● शासकीय नोकरी

केंद्र सरकार – यूपीएससी परीक्षेतून असणार्या संधी उदा. भारतीय वन सेवा (आयएफएस)

राज्य सरकार – एमपीएससी परीक्षेतून असणार्या संधी उदा. कृषी उपसंचालक, कृषी अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, वन क्षेत्रपाल, वन संरक्षक, कृषी सहाय्यक तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका/ नगरपरिषद याठिकाणी असणार्या संधी.

● केंद्रीय कृषी आस्थापना

भारतीय कृषी अनुसंधान केंद्र ( IARI), याठिकाणी तांत्रिक अधिकारी ते शास्त्रज्ञ, यांसारखे विविध केंद्र व राज्य सरकार यांचे कृषी संशोधन केंद्र, ICAR, ASRB, MCAER, कृषी विद्यापीठात प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, तांत्रिक अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी विज्ञान केंद्र, टेक्निकल ऑफिसर इत्यादी.

● सरकारी, निमसरकारी आणि सहकारी आस्थापना

उदा. अमूल डेअरी फार्म सारखे उद्याोग, विविध कृषी प्रक्रिया उद्याोग, सहकारी साखर कारखाने, महाबीज, महिको, एमएआयडीसी यांसारखे महामंडळ इत्यादी.

अन्य क्षेत्रातील संधी

बँकिंग क्षेत्रात कृषीविकास, ग्रामविकास अधिकारी, कनिष्ठ कृषी सहाय्यक इत्यादी पदांवर संधी. विमा कंपन्यांमध्ये संधी. सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशन ( CWC) तसेच भारतीय अन्न महामंडळ ( FCI) ठिकाणी विविध पदी संधी. खते व कीटकनाशके, बी-बियाणे उद्योग, ट्रॅक्टर व शेती अवजारे, अन्न प्रक्रिया उद्योगात प्लान्ट इंजिनीअर, संशोधन विभाग, सिंचन कंपनी, सोलर एनर्जी, बायोगॅस, पॉलिहाऊस आणि शेड नेट उद्योग, मृदा व जलसंधारण विभाग, पाणलोट क्षेत्रात कार्यरत असलेल्या बिगर शासकीय संस्थांमध्ये ठिकाणी संधी, शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक म्हणून संधी, स्वयंउद्योग, शेती संबंधित कृषी सेवा केंद्र, शेती मार्गदर्शक व सल्लागार यांसारख्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

कृषी अभियंता आणि कृषी अभियांत्रिकीचे भविष्यातील महत्त्व

भारताची लोकसंख्या जवळपास १४० कोटी एवढी प्रचंड आहे. झपाट्याने वाढणाऱ्या या लोकसंख्येच्या तुलनेत अन्नधान्य पुरवठा, लागवड व उत्पादन वाढीसाठी कृषी अभियंत्याची नक्कीच आवश्यकता आहे. तसेच सध्या भारत सरकारचा कल हा अपारंपरिक ऊर्जास्राोतांचा वापर यावर विशेष आहे हा भर पाहता सौर क्षेत्रात विशेष भवितव्य आहे. भविष्यात कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्यासाठी कृषी अभियंता यांची मागणी मोठ्या प्रमाणात होईल असे वाटते.

(लेखक सातारा येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत)

sachinhort.shinde@gmail.com