नोकरीसाठी देणाऱ्या मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र दोन्ही आत्मसात करणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुलाखत कशी द्यावी याविषयी अनेक जण पुष्कळ सल्ले व सूचना देताना दिसतात. सोशल मीडियावर देखील याचे अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत मुले ते पाहून त्याचे अंधानुकरण करताना देखील दिसतात. वास्तविक प्रत्येक कंपनीचा अजेंडा मुलाखतीदरम्यान वेग वेगळा असतो.
मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होत आले की शेवटच्या वर्षालाच कॉलेजमध्ये अनेक नामांकित कंपन्या मुलाखतीसाठी यायला सुरुवात होते. हा काळ मुलांच्या दृष्टीने व कॉलेजच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा असतो. जितक्या अधिक मुलामुलींचे नामांकित कंपन्यांमध्ये सिलेक्शन होईल तितके ते कॉलेज किंवा त्याचा दर्जा अधिक चांगला असे बहुतेकांना वाटते. मुलाखती दरम्यान आपली निवड व्हावी यासाठी मुले देखील खूप मेहनत करताना दिसतात. इतकी वर्षे चिकाटीने केलेला अभ्यास घेतलेली मेहनत या सर्व गोष्टींचे नोकरीसाठी निवड झाल्यावर मिळताना दिसते. नोकरीसाठी देणाऱ्या मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र दोन्ही आत्मसात करणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुलाखत कशी द्यावी याविषयी अनेक जण पुष्कळ सल्ले व सूचना देताना दिसतात. सोशल मीडियावर देखील याचे अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत मुले ते पाहून त्याचे अंधानुकरण करताना देखील दिसतात. वास्तविक प्रत्येक कंपनीचा अजेंडा वेगवेगळा असतो. संभाव्य उमेदवाराकडून त्या त्या पदासाठी नक्की काय अपेक्षित आहे हे कंपन्या नक्कीच जाणून असतात. मुलांच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास, संवाद कौशल्य, देहबोली, त्या पदासाठी आवश्यक असलेल्या विषयाचे ज्ञान अशा अनेक व्यक्तिमत्त्वातील घटकांकडे मुलाखती दरम्यान जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. पुस्तकी ज्ञानापेक्षा परिस्थितीची चटकन होणारी जाणीव, त्यानुसार आवश्यक असलेली निर्णय क्षमता, प्रयोगशीलता, नेतृत्व गुण, आपल्या टीम बरोबर एकत्रितपणे काम करण्याची असलेली मानसिक तयारी, स्वभावातील लवचिकता आणि वर्तणुकीतील समतोल अशा अनेक गुणांना कंपनी महत्त्व देत असते.
हेही वाचा…एमपीएससी तयारी: गट ब सेवा पूर्व परीक्षा; आधुनिक भारताचा इतिहास
आपल्याकडे बहुतेक कॉलेजमध्ये कौशल्य विकासाचे प्रशिक्षण ( Soft Skill Training) दिले जाते परंतु मुले या प्रशिक्षणाकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. कॉलेजच्या असणाऱ्या परीक्षा, व्यग्र वेळापत्रक, प्रॅक्टिकल्स, इंडस्ट्री व्हिजिट या सर्व गोष्टींमुळे बरेचदा मुलांचे स्वत:चा व्यक्तिमत्त्व विकास व कौशल्य विकास याकडे दुर्लक्ष होताना दिसते. कौशल्य विकासाऐवजी मुले अनेक छोटे छोटे ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्सेस करताना दिसतात. असे कोर्सेस केल्यामुळे आपला ( Resume) अधिक बळकट होईल असे त्यांना वाटत असते. बहुतेकांवर लवकरात लवकर नोकरी मिळवण्याचे दडपण असते. पालकांनी शिक्षणासाठी केलेला खर्च त्यासाठी घेतलेली मेहनत, त्याचबरोबर इतर मित्रांबरोबर कळत नकळत केली जाणारी तुलना, त्यातून निर्माण होणारी स्पर्धा, स्वत:च्या स्वत:कडून असलेल्या अपेक्षा या सर्व गोष्टींचे प्रचंड ओझे घेऊन मुले मुलाखतीला सामोरे जातात.
आपण नक्की कसे आहोत? आपल्यातील क्षमता, कमतरता व व्यक्तिमत्त्वातील इतर घटक, आत्मसात केलेली कौशल्य याचे वास्तविक भान अनेक जणांमध्ये दिसून येत नाही. स्वत:ला आपण आहोत त्यापेक्षा खूप कमी समजणे किंवा स्वत:बद्दल फाजील आत्मविश्वास असणे असे दोन प्रकार बरेचदा दिसून येतात. हे दोन्ही प्रकारचे वाटणे आपल्याला वास्तवापासून दूर नेणारे आहे.
हेही वाचा…दूरदेशीच्या ज्ञानवाटा: देशोदेशीच्या प्रवेश परीक्षा
कोणत्याही मुलाखतीमध्ये यशस्वी होण्यासाठी Self Awareness म्हणजेच ‘स्व ओळख’ आणि Self Acceptance म्हणजेच ‘स्व स्वीकार’ या अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत स्वत:ला व स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातील घटकांना नीट जाणल्याशिवाय आणि ओळखल्याशिवाय कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होणे अत्यंत अवघड आहे. मला माझ्याविषयी नक्की काय वाटते माझ्या व्यक्तिमत्त्वातील गुणवैशिष्ट्ये व आत्मसात केलेली कौशल्य मी मला हवी तशी हवी तेव्हा माझ्या परवानगीने नीट वापरतो का, या गोष्टीला करिअरमध्ये अत्यंत महत्त्व आहे. नुसती पुस्तकी हुशारी कुठेच कामाला येत नाही. शिकलेल्या अभ्यासाचा आपल्या नोकरीमध्ये नक्की कसा उपयोग करायचा याची माहिती असणे व त्यासाठीची आवश्यक कौशल्य आत्मसात करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (लेखक समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत) drmakarandthombare@gmail. com