बिस्कीटे व चॉकलेट सर्वानां आवडतात पण त्यांच्या आवरणांचा कचरा पाहून कधी छान, प्रसन्न वाटतं का? शारंग अंबडकर या नवउद्यामीला वाटतं. अशा प्लास्टिक आवरणातून तयार केलेल्या उत्तमोत्तम उत्पादनांच्या त्याच्या कंपनीचं नावच ‘फीलगुड इकोनर्चर’ आहे. चॉकलेट आणि बिस्कीटाच्या कागदापासून त्याने बनवलेल्या टाइल्स काँक्रीटपेक्षाही मजबूत आहेत. सतत काही ना काही जुगाड करण्याच्या आवडीतून शारंगचा हा उद्योग कसा उभा राहिला, जाणून घेऊ त्याच्याच शब्दांत…

इटलीमध्ये रोम विद्यापीठात एका शिष्यवृत्तीच्या माध्यमातून चार महिने शिकण्याची संधी मला मिळाली होती. पहिल्याच आठवड्यात सवयीनुसार, आम्ही मुलं राहात होतो, तेथे घराच्या बाहेर कचरा ठेवला. दोन दिवस कोणीच तो उचलण्यासाठी आलं नाही. चौकशी केली तर कळलं की बाहेर एका ठिकाणी डबे ठेवले आहेत, तिथे स्वत: नेऊन टाकायचा. कचरा टाकायला गेलो तर तिथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने आम्हाला कचऱ्याचं वर्गीकरण केलं नसल्यामुळे ५० युरोचा दंड लावला. युरोपीय देशांमध्ये प्लास्टिकचा पुनर्वापर अत्यंत गांभीर्यपूर्वक कसा होतो, ते तिथे कळलं. भारतात आल्यावरही ही संकल्पना डोक्यात होती. घरी दुधाच्या भरपूर पिशव्या होत्या. त्या कापून मिक्सरमध्ये बारिक वाटल्या आणि विशिष्ट तापमानाला प्लास्टिक आकसतं, ते विज्ञान समजून घेऊन, त्याचे गोळे करून ‘बिन बॅग’सारख्या उशा बनवल्या. तशाच आणखी खूप उशा बनवून विकल्याही. त्यासाठी चहावाल्यांकडून भरपूर पिशव्या जमा केल्या. स्वत:च्या या जुगाडातूनच आणखी प्रेरणा मिळाली. मग प्लास्टिकच्या मागे हात धुवून लागलो.

लॉकडाऊन पथ्यावर

प्लास्टिकच्या विघटन बिंदूचा अभ्यास केला. घरी एक जुना ओटीजी होता, त्यात एक मोल्ड घेऊन त्याची टाइल बनवली. ही जानेवारी २०२० ची गोष्ट आहे. हे प्रायोगिक होतं. आधी एक अॅल्युमिनिअमचा मोल्ड बनवला. त्यापासून ही टाइल बनवली. नंतर कोविडमध्ये लॉकडाउनमुळे सर्वच बंद होतं. तेव्हा मी एक व्हिडिओ तयार केला. आमची टाइल, वीट आणि सिमेंटचा ब्लॉक – शेजारी शेजारी ठेवले आणि हातोड्याने तोडत गेलो. वीट, काँक्रीटचा ब्लॉक तुटला पण माझी टाइल तुटली नाही. माझ्या या टाइलचा व्हिडिओ, माहिती मी लिंक्डइनवर पोस्ट केली. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. अनेक कंपन्यांनी चौकशी केली. युनायटेड नेशन्सने संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की आमची एक स्पर्धा आहे, तिथे तुम्ही हे उत्पादन सादर करा. आम्हाला तिथे ‘मटेरियल ऑफ द इयर’ हा अवॉर्ड मिळाला. तोपर्यंत आम्ही हे मिक्स्ड प्लास्टिक वेस्टपासून तयार करत होतो. त्याचं पेटंटही मला मिळालं. ‘कम्पोझिट मटेरिअल फ्रॉम मिक्स्ड प्लास्टिक वेस्ट अँड कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्ट’ चे माझे पेटंट आहे. मे २०२० मध्ये माझी ‘फीलगुड इको नर्चर’ कंपनी सुरू केली. या पेटंटमुळे माझ्या उत्पादनाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली.

पर्यावरणस्नेही प्लास्टिकची उत्पादने

आमचं पहिलं उत्पादन होतं टाइल. चॉकलेट आणि बिस्कीटाचे जे कागद असतात, त्यापासून आम्ही हे टाइल बनवतो. एक किलो काँक्रीटचं उत्पादन करण्यासाठी तीन किलो कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जित होतो, त्याचवेळी १ किलो प्लास्टिकसाठी ९० ग्रॅम कार्बन उत्सर्जित होतो. यामुळे या फरशा पर्यावरणस्नेही ठरतात. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या दोन पेट्रोल पंपांवर तसंच देशभरातल्या अनेक अंगणवाड्यांमध्ये व फॉर्म हाऊस मध्येे या प्लास्टिक पण इको फ्रँडली फरशा लागलेल्या आहेत.

याशिवाय प्लास्टिकपासून लाकडाला पर्याय म्हणून आम्ही विशिष्ट पद्धतीच्या शीट्स तयार केल्या आहेत. त्या लाकूड किंवा प्लायवूडला पर्याय म्हणून वापरता येतात. आमचं तिसरं उत्पादन प्लास्टिकपासून टेक्सटाइलचे आहे. टेक्सटाइल किंवा पॉलिएस्टर कापड हे क्रूड ऑइलसारख्या जीवाश्म इंधनापासून बनलं जातं आणि क्रूड ऑइल महाग तर आहेच, शिवाय त्याचं उत्पादनही हळूहळू कमी कमी होत चाललं आहे. म्हणून आमचं उत्पादन इथे महत्त्वाचं ठरतं, प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांपासून आम्ही हे कापड बनवतो. ते अनेक कंपन्यांना पुरवतो. अनेक कॉर्पोरेट कंपन्या टी-शर्टस, झेंडे, पिशव्या बनवण्यासाठी वापरतो.

आमचं चौथं उत्पादन आहे क्रेट्स. दूध वगरै ठेवण्यासाठी, हाताळण्यासाठी जे क्रेट्स लागतात ते आम्ही प्लास्टिकपासून बनवतो.

एचपीसीएलपासून अदानीपर्यंत ग्राहक

माझ्या टाइल्सचे ग्राहक आहेत, एचपीसीएल पेट्रोल पंप, पार्ले अग्रोज, हिंदुस्थान युनिलिव्हर. त्यानंतर किचनमध्ये, किंवा दारांसाठी जे लाकूड वापरतात ते आमचं इको फ्रेंडली लाकूड वापरलं जातं. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या भूमिगत केबलवरून एक काँक्रीटचा स्लॅब जातो, त्याऐवजी आता आमच्या शीट्स लावल्या जातात. आमचे कापड टाटा, टाटा एआयजी, डोलो, मायक्रोलॅब्स, एल अँड टी, जॉन्सन अँड जॉन्सन, कॅरिअर कंपनीत जातात. माझ्या कंपनीचे सध्याचे भांडवल अडीच कोटींचे आहे.

मध्यमवर्गीय कुटुंब

मी मुंबईचाच. माझं शिक्षण एन.एल. दालमिया स्कूल, मिरा रोडमध्ये झालं. माझं इंजिनीअरिंग मालाडच्या अथर्व कॉलेजमध्ये आयटीमधून झालं. हा उद्याोग सुरू केला तेव्हा मी इंडियन प्लास्टिक इन्स्टिट्यूटमधून पॉलिमर इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केला. अलीकडेच मी आयआयएम इंदोरमधून एमबीए केलं. वडिल इंजिनीअर आहेत , बॉम्बे हॉस्पिटलमध्ये काम करत होते. आता ते गुंतवणूक सल्लागार आहेत. आई गृहिणी आहे आणि वडिलांना त्यांच्या कामात मदत करते आणि ती माझ्या ‘उद्याोगांमध्ये’ही माझ्या पाठीशी असते.

इतरांनाही प्रेरणा

मी २०२३ मध्ये रिसायकलिंगवर एक हँडबुक लिहिलं होतं, निती आयोगाच्या सीईओंच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. ‘बुक ऑफ रिसायकलिंग’ नावाची ही हस्तपुस्तिका भारतभर आणि परदेशीही वितरित करण्यात आली. ती प्रेरणादायी ठरल्याने त्याची नोंद पंतप्रधान कार्यालयाने देखील घेतली. तसेच २०२४ नोव्हेंबरमध्ये ‘भारत के इको स्टार्टअप’ हे हँडबुक लिहिलं. त्यात भारतातल्या हजारोंमधून निवडक ५०-६० स्टार्टअपची माहिती आहे. ते पतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागारांनाही मी पाठवलं. तसेच पर्यावरणस्नेही उत्पादनांवर, प्रक्रियेवर मी डेन्मार्क आणि जर्मनीत लेक्चर्स दिले आहेत. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी इंडियन ऑइल कंपनीने पाठवलेलं रिसायकल्ड जॅकेट घातले होते, प्लास्टिक बॉटलपासून हे जॅकेट बनविण्याची संकल्पना माझीच होती. सध्या मी सोलार इंडस्ट्रीमध्ये ‘वॉक वे’ साठी जी उत्पादने लागतात ती रिसायकल्ड प्लास्टिकपासून बनवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात असा हा पहिल्यांदाच प्रयत्न होतो आहे.

(शब्दांकन : मनीषा देवणे)

Story img Loader