Shiv Nadar Delhi’s Richest Businessman : भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आहेत. पण, तुम्हाला दिल्लीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत हे माहितीय का? फोर्ब्सने या वर्षाच्या सुरुवातीला जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली होती, यावेळी या यादीत २०० भारतीयांचा समावेश होता. ज्यातील २५ श्रीमंतांमध्ये देशातील अव्वल आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि अध्यक्ष एमेरिटस शिव नाडर यांचा समावेश आहे. दिल्लीतील सर्वात श्रीमंत असलेल्या शिव नाडर यांच्याकडे ३५.६ अब्ज डॉलर (सुमारे २,९८,८९८ कोटी रुपये) संपत्ती आहे. दिल्लीचे सर्वात श्रीमंत व्यापारी असण्याबरोबर ते एक मोठे दानशूर व्यक्तीदेखील आहेत. पैसे दान करण्याच्या बाबतीत त्यांनी सर्वांना मागे टाकले आहे. नाडर यांनी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २०४२ कोटी रुपयांची देणगी दिली. म्हणजेच त्यांनी दररोज ५.६ कोटी रुपये दान केले. गतवर्षीही ते देणगीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होते. पण, शिव नाडर यांचा जीवनप्रवास नेमका कसा होता जाणून घेऊ..

कोण आहे शिव नाडर?

शिव नाडर हे आंतरराष्ट्रीय IT सल्लागार कंपनी HCL Technologies चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. नाडर आणि त्यांच्या मित्रांनी १९९७ मध्ये ही कंपनी सुरू केली, ज्याची सुरुवात त्यांनी १,८७,००० रुपयांच्या गुंतवणुकीने केली. सुरुवातीला त्यांच्या कंपनीने कॅल्क्युलेटर आणि मायक्रोप्रोसेसर बनवण्यावर भर दिला. यानंतर हळूहळू त्यांची कंपनी HCL Technologies ही जागतिक स्तरावरील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक बनली. आज एचसीएलचा व्यवसाय देशभर आणि जगभर पसरलेला आहे. एचसीएलची जगभरातील ६० देशांमध्ये उलाढाल सुरू आहे.

शिव नाडर यांचा जीवनप्रवास (HCL Founder Shiv Nadar’s Journey)

शिव नाडर यांचा जन्म तामिळनाडूच्या तुतिकोरीन जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. त्यांनी सेंट जोसेफ बॉईज हायर सेकेंडरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. नाडर यांनी पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, कोईम्बतूर येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यांनी १९६७ मध्ये वालचंद ग्रुपच्या कूपर इंजिनिअरिंग लिमिटेडमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. नंतर त्यांनी मायक्रोकॉम्प ही टेलि-डिजिटल कॅल्क्युलेटर बनवणारी कंपनी सुरू केली. हे नंतर हिंदुस्तान कॉम्प्युटर्स लिमिटेड म्हणून ओळखले गेले आणि आता एचसीएल टेक्नॉलॉजीज म्हणून ओळखले जाते. नाडर यांचे आयटी उद्योगात मोठे योगदान आहे, ज्यामुळे त्यांना २००८ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

४० वर्षांहून अधिक काळ एचसीएल

टेक्नॉलॉजीचे नेतृत्व केल्यानंतर शिव नाडर अध्यक्षपदावरून पायउतार झाले. यानंतर त्यांनी त्यांची मुलगी रोशनी नाडर यांच्याकडे आपल्या व्यवसायाची जबाबदारी सोपवली. रोशनी नाडर या देशातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक असून व्यवसायाबरोबरच त्या दररोज दान करण्याचा कौटुंबिक वारसा पुढे नेत आहेत. आज त्या HCL टेक्नॉलॉजीजच्या चेअरपर्सन आहेत. आपल्या कठोर परिश्रमाने आणि दूरदृष्टीने त्यांनी एचसीएलला नवीन उंचीवर नेले आहे. वडिलांप्रमाणेच रोशनीलाही सामाजिक कार्यात प्रचंड रस आहे.

परोपकारी लोकांच्या यादीत ‘डंका’

शिव नाडर आणि त्यांचे कुटुंबीयदेखील त्यांच्या परोपकारी कार्यासाठी ओळखले जातात. मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, त्यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुमारे २०४२ कोटी रुपये (दररोज सुमारे ५.६ कोटी रुपये) दान केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात देणगी दिल्यामुळे त्यांना ‘हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट २०२३’ मध्ये सलग तीन वर्षे ‘देशातील सर्वात उदार व्यक्ती’ ही पदवी मिळाली आहे. देणग्यांव्यतिरिक्त, नाडर यांनी चेन्नईमध्ये SSN कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग सुरू केले आणि HCL तंत्रज्ञानाद्वारे अनेक शैक्षणिक संस्थांना पाठिंबा दिला जातो.