Success Story of Soundararajan brothers: आयुष्यात यश मिळवायचं असेल, तर कष्ट, मेहनत ही घ्यावीच लागते. असं असलं तरी काहींना यश मिळविण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आव्हानांचा सामना करावा लागतो; पण तरीही खचून न जाता, आलेल्या आव्हानांना तोंड देत काही जण आपलं स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी होतात. आज आपण अशाच भावंडांची यशोगाथा जाणून घेणार आहोत; ज्यांनी पाच हजार रुपयांत व्यवसाय सुरू केला होता आणि आता ते कोट्यवधींचे मालक आहेत.
सौंदरराजन भावंडांनी अशी केली व्यवसायाला सुरूवात
बी सौंदरराजन आणि जीबी सौंदरराजन आज भारतातील दोन सर्वांत श्रीमंत पोल्ट्री शेतकरी आहेत. परंतु, लहानपणापासूनच त्यांची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. अनेक अडचणींना सामोरं जात त्यांनी हा टप्पा गाठला आहे.
शाळा संपल्यानंतर सौंदरराजन यांनी भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील कृषी पंप कंपनीत नोकरी केली. नंतर ते आपल्या भावाच्या व्यवसायात सामील होण्यासाठी गेले, जिथे त्यांनी शेतकऱ्यांना चिकन विकले.
हेही वाचा… विड्या विकून आईनं बनवलं मुलाला IAS अधिकारी, UPSC परीक्षेत मिळवला २७ वा क्रमांक; वाचा अनोखी यशोगाथा
त्यानंतर दोन्ही भावांनी मिळून १९८४ मध्ये पाच हजार रुपयांच्या अल्प गुंतवणुकीतून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. त्यांचा पहिला पोल्ट्री फार्म कोईम्बतूरपासून ७२ किमी अंतरावर उदुमलाईपेट्टई येथे होता. चार दशकांनंतर त्यांनी १२ हजार कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीसह भारतातील सर्वांत मोठा पोल्ट्री व्यवसाय स्थापित केला.
सुगुणा फूड्स (Suguna Foods)
सुगुणा फूड्स या त्यांच्या कंपनीमध्ये १८ राज्यांतील १५ हजारहून अधिक गावांतील ४० हजार शेतकरी आहेत. या कंपनीचे बी सौंदरराजन हे चेअरमन आहेत आणि त्यांचा मुलगा विघ्नेश हे या फर्मचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
कंपनीच्या स्थापनेनंतर सात वर्षांत ४० शेतकरी त्यांच्यात सामील झाले. तसेच त्यांची उलाढाल सात कोटींच्या पुढे गेली. सध्याच्या घडीला सुगुणा चिकन हे तमिळनाडूमध्ये एक प्रसिद्ध नाव बनले आहे.
सौंदरराजन भावंडांनी या व्यवसायात कोणतीही पार्श्वभूमी, तसेच शिक्षण नसताना विविधता आणली. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये त्यांची उलाढाल ९,१५५.०४ कोटी रुपये होती आणि आर्थिक वर्ष २०२० मध्ये त्यांच्या कंपनीचे मूल्य ८,७३९ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये त्यांचा नफा ३५८.८९ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी कंपनीची तब्बल १२ हजार कोटींची उलाढाल झाली होती.