पहिली नोकरी मिळाल्याच्या आनंदाचे रूपांतर पुन्हा अतिविचार, काळजी, भीती अशा नकारात्मक भावनांमध्ये होताना दिसून येते. आपल्याला नवीन आव्हानांना सामोरे जायला लागणार आहे याची मनोमन जाणीव होताना दिसते. कुठलीही नोकरी मिळवल्यानंतर आपल्याला मिळालेले पद व त्या पदाबरोबर येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या याबद्दल मनामध्ये सुस्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे.

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होताना इंटरव्ह्यू देण्यापासून नोकरी मिळेपर्यंत कोणकोणत्या आव्हानांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते याविषयी आपण गेल्या काही भागात जाणून घेतले. एकंदरीत हा प्रवास उत्कंठावर्धक असला तरी मनावर ताण आणणारा दिसून येतो. कारण अनिश्चिततेला सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी आपण केलेली नसते त्यामुळे अशा काळामध्ये आपल्या अनेक क्षमतांचा कस लागत असतो. अखेर एक आनंदाचा दिवस उजाडतो आणि आपल्याला आयुष्यातील पहिली नोकरी करण्यासाठी कंपनीने आपली निवड केली आहे अशी शुभवार्ता येते.

इतके दिवस मनात सुरू असलेली धाकधूक अखेर संपते आणि आपली निवड झाल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर वागण्या बोलण्यामध्ये दिसू लागतो. त्यातच कंपनीने आपल्याला हवे आहे तसे पॅकेज दिल्यामुळे मुले खुश होतात. परंतु हळूहळू या आनंदी बातमीचे रूपांतर पुन्हा अतिविचार, काळजी, भीती अशा नकारात्मक भावनांमध्ये होताना दिसून येते. आपल्याला नवीन आव्हानांना सामोरे जायला लागणार आहे याची मनोमन जाणीव होताना दिसते. कुठलीही नोकरी मिळवल्यानंतर आपल्याला मिळालेले पद व त्या पदाबरोबर येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या याबद्दल मनामध्ये सुस्पष्टता असणे अत्यंत आवश्यक आहे.

बदल स्वीकारताना…

आयुष्यात होणारा कोणताही बदल स्वीकारताना मनाला त्याची विशेष तयारी करावी लागते किंबहुना सक्षम व सुस्पष्ट विचारांनी आपल्याला मनाला तसे वळण लावावे लागते. बऱ्याच जणांना वाटते नोकरी स्वीकारली की हे सगळं आपोआप होईल पण तसं नसतं त्यासाठी विशेष तयारी करावी लागते. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर आपल्यातील गुणदोषांवर आपल्या कौशल्यांवर जाणीवपूर्वक काम करावे लागते. नोकरी मिळवण्यासाठी आजपर्यंत आपण खूप अतिरिक्त माहिती मेंदूमध्ये भरलेली असते प्रथम त्यातील अनावश्यक माहिती बाजूला ठेवून आपल्याला मिळालेले पद व त्या पदाबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक कौशल्य याची संपूर्ण जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या कंपनीची व्हिजन, मिशन काय आहे कंपनीची यावर्षीची उद्दिष्टे काय आहेत याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.

इच्छा, आकांक्षांना मुरड

नोकरी मिळाल्यानंतर बहुतेकांना टीमवर्क करावे लागते परंतु इतर सहकाऱ्यांबरोबर कसे काम करावे? त्यासाठी स्वत:मध्ये आपण काय काय बदल करावा याची बऱ्याच जणांना जाणीव नसते. आजपर्यंत आपल्याला मनाला वाटेल तसे करण्याची सवय लागलेली असते किंबहुना कुटुंबीय, मित्र मैत्रिणी, नातेवाईक आपल्याला समजून घेत असतात परंतु नोकरीच्या ठिकाणी मात्र आपल्याला सर्वांच्या सहमतीनेच बरेच निर्णय अंमलात आणावे लागतात. निर्णय घेण्याचे व्यक्ती स्वातंत्र्य देखील आपल्याला नसते तसेच काही निर्णय हे मनाला पटले नाहीत तरी वरिष्ठांनी सांगितल्यामुळे ते कंपनीच्या हिताचे आहेत असे गृहीत धरून त्या निर्णयांची अंमलबजावणी वेळेतच करावी लागते. आपल्या व्यक्तिगत इच्छा, आकांक्षांना वेळीच मुरड घालावी लागते.

सहकाऱ्यांसोबत काम करताना…

आपण कंपनीतील एक घटक आहोत हे स्वत:ला पुन्हा पुन्हा सांगायची गरज असते. बऱ्याच जणांना नाही ऐकण्याची व योग्य वेळी नाही म्हणण्याची सवयच नसते त्यामुळे वैचारिक व भावनिक गोंधळ होताना दिसून येतो. आपल्या घरातील वातावरण व कंपनीतील वातावरण वेगवेगळे असल्याने नवीन वातावरणाशी जुळवून घेता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा सुरुवातीच्या काही दिवसातच आपण पाहिलेली स्वप्ने, आपल्या करिअर विषयी मनात असलेल्या काल्पनिक प्रतिमांना धक्का बसतो. आपण पाहिलेली स्वप्ने, ठरवलेली उद्दिष्टे यांना काही वेळा सुस्पष्ट विचारांनी लगाम घालावा लागतो. असे करणे अत्यंत जरुरी आहे नाहीतर बऱ्याचदा आपला भ्रमनिरास होताना दिसतो आणि आपल्या सहकाऱ्यांबरोबर एकत्र काम करणे देखील अवघड होऊन बसते.

जीवनशैलीमध्ये बदल आवश्यक

नवीन नोकरी स्वीकारल्यानंतर बऱ्याच जणांच्या प्रकृतीवर त्याचा हळूहळू परिणाम होताना दिसतो. त्यामुळे अनेक मनोशारीरिक लक्षणांचा समूह प्रकृती दाखवू लागते. उगीचच होणारी चिडचिड, डोकेदुखी, वाटणारी काल्पनिक भीती, खाण्याच्या अनियमित वेळा व चुकीची आहार पद्धती, अपुरी झोप अशी अनेक लक्षणे दिसून येतात. त्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये व आपल्या सवयींमध्ये योग्य तो बदल करून या सर्व गोष्टींवर नक्कीच मात करता येणे शक्य आहे.

एकंदरीतच नव्या नोकरी बरोबर नवी आव्हाने, नव्या जबाबदाऱ्या, नवीन जीवनशैली, नव्या मनोधारणा स्वीकारणे,आत्मसात करणे,अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे सर्व करण्यासाठी स्वत:विषयी अभ्यास करणे, स्वत:ला नीट ओळखणे, स्वत:मध्ये परिस्थितीनुसार सतत बदल करण्याची क्षमता आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. drmakarandthombare@gmail. com

Story img Loader