बारावीनंतर सांख्यिकीमध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत. बारावीनंतर अनेक महाविद्यालयांमध्ये स्टॅटिस्टिक्स विषयात पदवीची सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना आयआयटीमधून पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे. अर्थात त्यासाठी पदवीच्या शेवटच्या वर्षी विद्यार्थ्यांना ‘जाम’ नावाची एक राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई, कानपूर, तिरुपती येथील आयआयटीमधून स्टॅटिस्टिक्समध्ये दोन वर्षांचा एमएस्सी कोर्स करण्याची संधी मिळते.
बारावीनंतर स्टॅटिस्टिक्स क्षेत्रात पदवी मिळवण्यासाठी देशातील सर्वोत्तम संस्था म्हणजे कोलकाता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. येथे बारावीनंतर ३ वर्षांचा बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा सायन्स हा कोर्स चालवला जातो. १२ वीची परीक्षा किमान ७५ टक्के गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळू शकतो. मात्र यासाठी बारावीला मॅथेमॅटिक्स/ अप्लाईड मॅथेमॅटिक्स आणि इंग्रजी हे दोन विषय घेणे आवश्यक आहे. या कोर्सला प्रवेशासाठी जेईई (मेन्स) चे २०२४ किंवा २०२५ चे मार्क किंवा सीयूईटी २०२४ किंवा २०२५ चे मॅथेमॅटिक्स व इंग्रजी या विषयांचे मार्क ग्राह्य धरले जातील. याच संस्थेत पदव्युत्तरचे दोन वर्षांचे दोन कोर्स उपलब्ध आहेत. एक आहे मास्टर ऑफ स्टॅटिस्टिक्स. हा कोर्स संस्थेच्या कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली या संकुलामध्ये उपलब्ध आहे तर दुसरा एम.टेक्. कॉम्प्युटर सायन्स जो कोलकाता संकुलामध्ये उपलब्ध आहे. या संस्थेसंबंधी अधिक माहिती संस्थेच्या isical. ac. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
स्टॅटिस्टिक्समध्ये पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यूपीएससीची एक वेगळी परीक्षा उपलब्ध असते. भारत सरकारच्या स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटमध्ये अधिकारी म्हणून नोकरी मिळण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. स्टॅटिस्टिक्समध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परदेशातही उच्च शिक्षणासाठी जाण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
स्टॅटिस्टिक्समध्ये पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेता घेता विद्यार्थ्यांना विमा क्षेत्राचा आत्मा असणाऱ्या अॅक्चुरीजमधील परीक्षा देणं शक्य असते. विमा क्षेत्र हे सातत्याने वाढत जाणारं क्षेत्र आहे, यामधील इन्शुरन्स अंडररायटर आणि इन्शुरन्स क्लेम अॅडजस्टर या दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक ती पात्रता या परीक्षांमधून मिळते. इन्स्टिट्यूट ऑफ अॅक्चुरीज ऑफ इंडिया ( actuariesindia. org) या संस्थेमार्फत या परीक्षा घेतल्या जातात. कोणत्याही शाखेतून बारावीनंतर एक अॅक्चुरीअल कॉमन एन्ट्रन्स टेस्ट ही संस्था घेते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे या विषयातील १३ परीक्षा देता येतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या परीक्षा एकीकडे पदवी / पदव्युत्तर शिक्षण चालू असताना देता येतात. या परीक्षांनंतर विद्यार्थ्यांना विमा क्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध होतात.
स्टॅटिस्टिक्स विषयात पदवी / पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्केट रिसर्च , बँकिंग, इन्शुरन्स, माहिती तंत्रज्ञान , फायनान्शिअल अॅनॅलिसिस , बिझनेस अॅनॅलिसिस , डाटा सायन्स , डाटा अॅनॅलिसिस , ऑपरेशन रिसर्च , पॉलिटिकल अॅनॅलिसिस , स्पोर्ट्स अॅनॅलिसिस, हवामान शास्त्र अशा विविध क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध होतात.
vkvelankar@gmail. com