मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. लिबरल आर्टस् अशीच एक शिक्षण शाखा. अष्टपैलूत्व देण्याचे काम हा कोर्स करतो यात शंका नाही. तसंच आर्थिक दृष्ट्या ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी लिबरल आर्ट्स हा एक आगळा वेगळा अभ्यासक्रम आहे. पण पालकविद्यार्थी अजूनही यापासून लांबच आहेत.

खरंतर हा अभ्यासक्रम वीस वर्षे तरी चालू आहे. पण अजूनही ही भानगड काय आहे याबद्दल एक हत्ती आणि सहा आंधळे अशी स्टोरी सुरू होते. दरवर्षी बारावीचा निकाल लागला की मुले मला हवे ते मिळालं नाही की इतर काय काय मिळतं याचा गुगल वर, इंटरनेटवर शोध घेऊ लागतात. या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीची १६- १७ वर्षे बारावीची मुले गुगल वर जाऊन तासतास घालवून एवढी ‘संशोधन’, करण्यात पटाईत नव्हती. वीस सालापासून हातातला मोबाइल व कोणीच अडवत नाही म्हटल्यावर या संशोधनाची सर्व मर्यादा ओलांडून वधूवर संशोधनासारखी ही गाडी जाऊन पोचली आहे. त्यामुळे बीए लिबरल आर्ट्स हा नवीन शब्द साऱ्यांना कळायला लागला. मात्र फी चे स्वरूप ऐकून पालकांच्या पोटात गोळा येत होता आहे व राहील. ज्या संस्थेने भारतात प्रथम हा अभ्यासक्रम सुरू केला होता त्या वेळेला वर्षाची चार लाख अशी चार वर्षांची सोळा लाख त्याची फी होती. विविध शैक्षणिक प्रदर्शनात, म्हणजेच करिअर फेअर हा सध्याचा रुळलेला शब्द, त्यात त्या संस्थेचा स्टॉल दरवर्षी पाहायला मिळत असे. मग त्याची नक्कल करण्याकरता इतर खासगी विद्यापीठे सरसावली. पाहता पाहता भारतातील सर्व महानगरात व सर्व नामवंत खासगी विद्यापीठात हा अभ्यासक्रम आता सुरू झाला आहे.

पालकांची अपेक्षा वेगळीच

तीन वर्षांपूर्वी एका शैक्षणिक सेमिनार मध्ये अशा कोर्सला शिकवणाऱ्या एका प्राध्यापक बाईंना प्रायोजित केले गेले होते. वाचकांना समजावा म्हणून या शब्दाचा अर्थ नीट सांगतो. सेमिनार मधील इतर वक्त्यांना मानधन देऊन बोलवले होते. ते मानधन देण्याची व्यवस्था या प्रायोजित वक्त्यांच्या संस्थेने केली होती. त्या बदल्यात पंचेचाळीस मिनिटे त्यांना बोलण्याची संधी दिली होती. त्यांनी सोप्या भाषेमध्ये आम्ही काय काय शिकवतो याची समग्र माहिती दिली. ती ऐकता ऐकताना सारे श्रोते रंगून गेले होते. त्यांचे भाषण संपल्यावर त्यांनी विचारले, ‘एनी क्वेश्चन्स?’

एका उच्चशिक्षित महिलेने हात वर करून पहिला प्रश्न विचारला, तुम्ही हे सारे शिकवता ते छानच आहे पण बीए ची पदवी कोणत्या विषयातली मिळते? जसे की इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, जर्मन इत्यादी. तशी पदवी नाही, म्हणूनच त्याचे नाव लिबरल आर्ट्स आहे असे मॅडमनी म्हटल्यानंतर साऱ्याच श्रोत्यांचा उत्साह मावळला. त्यानंतर एका आयटीतील इंजिनिअरने प्रश्न विचारला फी किती? मॅडमने उत्तर दिले वर्षाला साडेतीन लाख रुपये. इंजिनीअरने उलटे विचारले सहा लाखात माझा मुलगा इंजिनीअर होऊन पॅकेज मिळवेल. बीए लिबरल आर्ट्स नंतर पॅकेज कितीचे? त्यावर गोलमाल उत्तर आले, ‘नाही त्यानंतर त्याला काही ना काही तरी स्पेशलायजेशन करून शिकावेच लागेल. वाटले तर तो लगेच इंग्लंड अमेरिकेला जाऊ शकेल. तिथे जाऊन त्याने वेगळ्या स्वरूपाचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल त्याची पूर्व तयारी आम्ही छान करून घेतो.’

काय शिकवणार?

आजवर या साऱ्या संस्थांमधून पास झालेले विद्यार्थी पुढील शिक्षण परदेशात घेऊन किंवा अशाच स्वरूपाच्या महागड्या संस्थात पुढची पदवी घेऊन सहसा वडलोपार्जित उद्याोगात लागले आहेत. याला अपवाद नक्कीच आहेत. क्रिकेटमध्ये प्रत्येक टीम मध्ये जसे दोन तरी अष्टपैलू खेळाडू असतात तसं अष्टपैलूत्व देण्याचे काम हा कोर्स करतो यात शंका नाही. पण समाजाला हवा असतो तो धावा करणारा बॅट्समन, किंवा भरपूर विकेट काढणारा गोलंदाज. क्वचित एखादाच खेळाडू असा असतो की तो एकही जास्तीची धाव प्रतिस्पर्धी संघाला काढू देत नाही. पण त्याचे कौतुक फक्त चेंडू अडवण्यापुरतेच होते. दुसऱ्या दिवशी त्याचे नाव कुठेच छापून येत नाही. तसे अष्टपैलूत्व येथे शिकता येते.

हा कोर्स खऱ्या अर्थाने सर्वांगीण व्यक्तिविकासाचा आहे यात शंका नाही. इतिहास विषय आवडीने व सखोलपणे अभ्यासता येतो. समाजशास्त्रामुळे संपूर्ण समाजाची वीण कळते. जाती-जाती मधील आंतर संबंध व मानवी विकासाचे टप्पे कळत जातात. केवळ लिटरेचर असे न करता त्याचा कम्युनिकेशन साठी संबंध प्रत्यक्षात कसा आणायचा ते यात शिकायला मिळते. सध्या सर्वांचे काही जे लाडके शब्द आहेत म्हणजे कंटेंट रायटिंग, डिजिटल मार्केटिंग, मीडिया अँड मास कम्युनिकेशन इ. त्यात वरवरचे न शिकता त्याचा गाभा यात शिकता येतो. सर्जनशील व्यक्तिमत्त्वाला येथे वाव मिळतो. एखादी कला जोपासून तो ऑप्शनल विषय म्हणूनही घेता येतो. जाहिरातकलेसाठी पूरक असलेले अनेक विषय, संगीताच्या, वादनाच्या काही विषयांचा एडिशनल क्रेडिट म्हणून समावेश होतो. आंतरराष्ट्रीय संबंधांसारखा गंभीर विषय इथे शिकणे शक्य होते. तत्त्वज्ञानाची ओळख व त्यातील जागतिक प्रवाह यांची सुरुवात या अभ्यासक्रमातून होते. प्रत्येक क्षेत्राला वेढून टाकणारा मानसशास्त्रासारखा विषय आवडीने येथे शिकता येतो. किंवा त्यातच विद्यार्थी एडिशनल क्रेडिट्स घेऊ शकतात. नवीन शैक्षणिक धोरणात गुणांक किंवा क्रेडिटस् याला भरपूर वजन देऊन शैक्षणिक गुणांका ची आखणी केली गेली आहे. आंतरशाखीय, आंतरराष्ट्रीय पदव्या घेताना किंवा विदेशी जाऊन शिकताना याचे क्रेडिट ट्रान्सफर करणे ही शक्य होते. अन्य कोणत्याही पदव्या घेताना, चर्चा करणे, स्वत:ची मते मांडणे, गटकार्य करणे याला फारसे महत्त्व दिले जात नाही. ते या अभ्यासक्रमात प्राधान्याने केले जाते. हे सारे वाचायला ऐकायला छान असले तरी अजूनही या अभ्यासक्रमाची फी सामान्यांच्या आवाक्यात येणारी नाही हे वास्तव लक्षात घ्यायलाच हवे. त्यामुळे मोजक्या आणि मुलांनी हवे ते करावे, त्यांच्या पाठीशी आम्ही भरपूर पैसे घेऊन उभे आहोत अशा पालकांच्या गटासाठी हा अभ्यासक्रम नावाजला जातो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मात्र या अभ्यासक्रमाची फी पालकांच्या आवाक्यात येईल अशी आहे. विविध शाखांचे आंतरशाखीय शिक्षण तेथे दिले जाते. पण हा पदवी अभ्यासक्रम असल्यामुळे पुणे विद्यापीठाच्या आवारात शिरण्याचे धाडस नसलेले पालक विद्यार्थी अजूनही यापासून लांबच आहेत.

मनोजच्या शिक्षणाच्या वाटचालीमध्येमध्ये असंख्य अडथळे येऊन सुद्धा त्याला अभ्यासात, वाचनात, लेखनाची रुची लागली. कौटुंबिक ताणतणाव सगळ्या घरात असतात. इतके टोकाचे नसले तरी त्यावर मात करण्याची मानसिक शक्ती मनोजने कमावली. आर्थिक दृष्ट्या ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी लिबरल आर्ट्स हा एक आगळा वेगळा अभ्यासक्रम आहे हेही येथेच नोंदवतो.