नोकरी करायची नाही. लेखक व्हायचे हे स्वप्न सुबोध कुलकर्णी याने पाहिले. कॉलेजातील एका स्पर्धेनिमित्ताने त्याच्यातील लेखक जागा झाला. पण पुढे ही वाटचाल ‘कंटेंट रायटर’ पर्यंत कशी झाली… ते सुबोधच्याच शब्दात वाचू…

बाबांच्या बदल्या होत असल्यामुळे मी सीबीएससीच्या शाळेतून तीन शहरांत शाळा पूर्ण केली. शाळेत हिंदी आणि इंग्लिश तर घरात पूर्ण मराठी. आई मूळची नागपूरची त्यामुळे तिचे हिंदीवर प्रभुत्व आणि मराठी अस्सल नागपुरी वळणाचे. कळलं का भौ मी काय म्हणतो ते? केंद्र सरकारात छानशी नोकरी असलेला नवरा बघून देऊन आईचे पदवी मिळाल्या मिळाल्या आजोबांनी लग्न लावून दिले. वर्षभरातच माझा जन्म झाला तो भोपाळला. शाळा सुरू झाली ती जयपुरला. हायस्कूलात गेलो ते दरभंग्याला. पण मला कॉलेजात घातले गेले ते मात्र मुंबईत. खरे तर मला पुण्यात शिकायला जायचे होते कारण जेवढ्या गावात आधी मी राहिलो तिथे प्रत्येक ठिकाणी पुण्याचे शिक्षण छान असते असे समजून मुलांना तिथे पाठवण्याची पद्धत ऐकली होती. आई आणि बाबा या दोन नागपूरकरांचे मत पुण्याबद्दल फारसे चांगले कधीच नव्हते. पुण्याची माणसे आकडू असतात असे नेहमी दोघे म्हणत. पण गमतीची गोष्ट अशी होती की माझ्या आईला वाचनाची खूप आवड होती. तिने मराठी पुस्तके जमवलेली होती ती मात्र सारी पुण्याच्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेली. एकदा मी तिला विचारले सुद्धा, सारे प्रकाशक पुण्यातच राहतात का? तिने हसून उत्तर दिले नाही, पण ते चांगली चांगली पुस्तकं निवडून प्रकाशित करतात. यावर मी न विचारताच तिने अजून एक टिप्पणी केली, सगळीकडची मासिके बंद पडली पण पुण्यातली मासिके मात्र अजून चालू आहेत. अभ्यास सोडून मराठी पुस्तकांची गोडी मला अशी आईकडून लागली.

Competitive Examination Career Dr Sagar Doifode
माझी स्पर्धा परीक्षा: कामाचे समाधान महत्त्वाचे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Mrunal Thakur Comment on Diwali Edited Video
Mrunal Thakur Comment: “त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ, माझं तर मन…”, चाहत्याचे एडिटेड व्हिडीओ पाहून मृणाल ठाकूरची खोचक टिप्पणी
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

मुंबईला रवानगी

मॅट्रिक झाल्यानंतर मी बीए करून यूपीएससीची परीक्षा द्यावी असे बाबांनी ठरवले होते. त्यांच्या आखणीप्रमाणे मुंबईतील सुप्रसिद्ध कॉलेजात माझी रवानगी झाली. प्रवेशानंतर पहिल्याच आठवड्यात नोटीस बोर्डवर मराठी भाषेतील एका नोटिशीने माझे लक्ष वेधले. मराठी साहित्य मंडळाची पहिली बैठक असून, ‘माझे आवडते पुस्तक’ या विषयावर निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. एक हजार शब्दाचा निबंध पाठवा व एक हजार रुपयाचे पारितोषिक मिळवा. ती नोटीस वाचून माझे तर डोळेच विस्फारले. पण लगेच नजर गेली ती निबंध सादर करण्याच्या शेवटच्या तारखेवर. हाती तब्बल दहा दिवस होते. कॉलेज संपवून घरी जाताना डोक्यात आईकडच्या संग्रहातील दोन लेखकांची पुस्तके समोर थुईथुई नाचत होती. ती मला आवडली होती, त्यापेक्षा एक हजार रुपयांचे आकर्षण मोठे होते असे आत्ता मला पंचवीस वर्षांनी जाणवते. दोन दिवस रात्री चार चार तास जागून कवी ग्रेस यांच्या एका पुस्तकावर माझा तितकाच न समजणारा अबोध निबंध तयार झाला. तिसऱ्या दिवशी मराठी हा विषयही न घेतलेल्या विद्यार्थ्यांचा हा निबंध मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षांनी ठेवून घेतला. निबंधाचा मथळा वाचून माझ्याकडे त्यांनी आपादमस्तक पाहिले आणि गंभीर चेहरा करून, या बैठकीला एवढेच सांगितले. बैठकीच्या दिवशी शेवटच्या रांगेत जागा पकडून मी बसलो होतो. बहुतेक सगळ्या मुली व मोजके विद्यार्थी अशा माहोलात पहिली बैठक सुरू झाली. कोणी मला ओळखत नव्हते व इतरांनाही मी प्रथमच पहात होतो. सगळ्यांनाच काय पण मला सुद्धा प्रचंड धक्का देणारी घोषणा अध्यक्षांनी केली आणि माझा निबंध पहिल्या क्रमांकाने निवडला गेल्याचे जाहीर केले. त्या हजार रुपयांनी माझ्या आयुष्यात क्रांती घडली. मी लेखकच व्हायचे ठरवले. दोन रात्री जागून आवडीच्या पुस्तकावर निबंध लिहीत एक हजार रुपये मिळतात तर रोज सहा तास लिहून मला किती पैसे मिळतील? अशी स्वप्ने पहात ती रात्र गेली. सुबोध कुलकर्णी असे माझे नाव छापलेली विविध पुस्तके मला स्वप्नात दिसत होती.

इंग्लिश विषयामधे पदवी

पदवी करता मी एंटायर इंग्लिश विषय घेतला होता. मात्र सारे लक्ष दर आठवड्याला काहीतरी मराठीत लिहिण्यात अडकलेले असे. तो काळ सर्व लिखाण हाताने लिहिण्याचा व पोस्टाने पाठवण्याचा होता. मराठीतील झाडून सारी नियतकालिके व अनेक प्रकाशकांकडे पाठवलेले माझे लेखन नियमाने परत येत असे. प्रयत्न चांगला आहे पण आमच्याशी फारसा संबंधित नाही असे, किंवा याच स्वरूपाचे शेरे मारून आज वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी साभार परत आलेल्या माझ्या कथा, कविता, लेखांचा समोर ठेवलेला गठ्ठा पाहताना माझ्या गालावर किंचित हसू उमटते. काही वेळा मनात गमतीचा विचार येतो ही सारी रद्दी विकली तर दहा रुपये तरी मिळतील का? मात्र त्यातील प्रत्येक चिठोरे मी जीवापाड जपून समोरच ठेवले आहे. वडिलांचे मी यूपीएससीची परीक्षा द्यावी हे स्वप्न बीएला जेमतेम हायर सेकंड क्लास मिळाला तेव्हाच भंगले होते. नोकरी करायची नाही आणि लेखक बनायचे हा माझा हट्ट अधिक अधिकच वाढत चालला होता. अशातच माझ्या कॉलेजातून बाहेर पडलेल्या तीन अमराठी अवलिया मित्रांशी माझी गाठ पडली. काही अॅड कंपन्यांकरता शॉर्ट फिल्म बनवणे हा त्यांचा धंदा जोरात चालला होता. त्यांना मराठीत कंटेंट लिहून देणारा माणूस पाहिजे होता. पाच ते सात मिनिटांच्या एपिसोड करता मूळ हिंदी किंवा इंग्रजीतून आलेली कथा सुबोध मराठीत करण्याचे काम माझ्याकडे आले. दोन कथांचे मराठीकरण (भाषांतर नव्हे) त्यांना खूप आवडले. त्यांनी माझ्यासमोर पुढच्या वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट टाकले, एका कथेकरता मला एक हजार रुपये मिळणार होते. निबंधाचे बक्षीस आणि कंटेंटचे बक्षीस सारखेच. गेल्या सात वर्षांत अजून अशा स्वरूपाची पाच कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आली. आता माझ्या हाताखाली तीन नवशिके उमेदवार काम करतात. मी त्याचे संपादन करून छानसे पैसे कमावतो. कधीतरी रात्री झोप लागत नाही, त्या वेळेला माझे ‘लेखक: सुबोध कुलकर्णी’, म्हणून नाव छापलेले पुस्तक दिसू लागते. अनेकदा समोर आलेली शॉर्ट फिल्म, अॅड फिल्म संपते, तेव्हा माझे नाव कुठे सापडते का म्हणून मी शोधत राहतो. पण ते फारच क्वचित असते. सुस्थिर उत्पन्न नसल्यामुळे माझे लग्न झालेले नाही याची रुखरुख आई बाबांना असते. मला ती नाही. लिव्ह इनचा पर्याय असल्यामुळे संसाराचे झेंगट मागे लागलेले नाही. पण एकच स्वप्न अपुरे राहिले आहे. पुण्यातील एखाद्या नामवंत प्रकाशकाने माझे पुस्तक काढावे आणि त्या प्रकाशन समारंभाचा फोटो सर्व वृत्तपत्रात छापून यावा. मात्र माझ्या टोयोटा गाडीत बसून मी एखाद्या अॅड एजन्सीच्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा मात्र केल्या जाणाऱ्या कॉन्ट्रॅक्टवर पूर्ण समाधानी असतो. मराठीतील जुने गाजलेले नाटक अशावेळी मला वेडावून दाखवते, ‘करायला गेलो एक’…

Story img Loader