Success Story: सौमेंद्र जेना हे मूळचे ओडिशातील राउरकेला शहरातील रहिवासी आहेत. सध्या ते दुबईत राहतात. सौमेंद्र जेना यांनी नुकतेच सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील दोन वेगवेगळे पैलू दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. ज्यातील एका फोटोत त्यांचे राउरकेला येथील जुने, लहान घर दिसत आहे; तर दुसऱ्या फोटोत त्यांचा दुबईतील आलिशान बंगला आणि गाड्या दिसत आहेत. या फोटोखालील कॅप्शनमध्ये जेना यांनी सांगितले की, हे १७ वर्षांच्या मेहनतीचे, रात्रंदिवस केलेल्या कष्टाचे फळ आहे.
सौमेंद्र यांची पोस्ट
सौमेंद्र जेना यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी, ‘हे माझे जुने घर होते – राउरकेला, ओडिशातील एक लहान शहर, जिथे माझा जन्म झाला, मोठा झालो आणि १२ वी (१९८८-२००६) पर्यंत शिकलो. २०२१ मध्ये पुन्हा तिकडे गेलो होतो. आज माझे दुबईत घर आहे, जे १७ वर्षांच्या कठोर परिश्रमाची, रात्रंदिवस केलेल्या मेहनतीचे फळ आहे. तुमचे मत काय आहे?’ सौमेंद्र जेना यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर ही पोस्ट शेअर केली आहे.
सौमेंद्र जेना यांच्या या यशाच्या प्रवासाला अनेकांनी दाद दिली. एका युजरने लिहिले की, “स्वप्न खरी होतात, यश केवळ कठोर परिश्रम आणि शॉर्टकटशिवाय मिळते; सौमेंद्र, अभिनंदन.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “आपलं सुरुवातीचं आयुष्य दाखवण्यासाठी धैर्य लागतं. आनंद झाला की तुम्ही तुमच्या मुलाबरोबर तिकडे गेलात, त्याच्यासाठी हा खूप मोठा धडा आहे!”
सौमेंद्र जेना हे आर्थिक क्षेत्रातील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आहेत. त्याचे इन्स्टाग्रामवर तीन लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत आणि YouTube वर सुमारे चार लाख ८७ हजार सबस्क्राइबर्स आहेत. सोशल मीडियाद्वारे ते आर्थिक विषय सोप्या भाषेत स्पष्ट करतात, गुंतवणूक सल्ला देतात आणि लोकांना योग्य आर्थिक निर्णय घेण्यास मदत करतात.
जेना यांनी आपल्या जीवनाचा प्रवास एक प्रेरणा म्हणून मांडला आहे. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो असे ते सांगतात. अविरत परिश्रम आणि योग्य दिशेने केलेला प्रयत्नच आपल्याला आपल्या यशापर्यंत पोहोचवतो.