Success Story: १९०५ मध्ये स्थापन झालेली ‘बिकानेरवाला’चे आता भारतात आणि परदेशात मिळून २२५ आउटलेट्स आहेत. कंपनीचे अमेरिका, कॅनडा, यूएई, कतार, न्यूझीलंड, सिंगापूर व नेपाळमध्येही आउटलेट्स आहेत. २०२३ मध्ये त्यांची उलाढाल ३,००० कोटी रुपये होती आणि २०३० पर्यंत ती १०,००० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. पण, या प्रसिद्ध मिष्ठान्न आणि चटपटीत पदार्थांच्या भांडाराची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली याची गोष्ट नक्कीच अनेकांना प्रेरणा देऊ शकते.

‘बिकानेरवाला’ची सुरुवात १९०५ मध्ये लालचंद अग्रवाल यांनी केली होती. त्यांनी बिकानेरच्या जुन्या शहर परिसरात बिकानेर नमकीन भंडार नावाचे एक दुकान उघडले, ज्यामध्ये ते मिठाई आणि चटपटीत पदार्थ विकायचे. १९५५ मध्ये त्यांच्या कुटुंबातील दोन भाऊ केदारनाथ अग्रवाल आणि सत्यनारायण अग्रवाल दिल्लीला आले. ओळखीच्या एका व्यक्तीमार्फत दोन्ही भाऊ जुन्या दिल्लीतील संतलाल खेमका धर्मशाळेत राहिले.

रसगुल्ल्यांमुळे मिळाली प्रसिद्धी

सुरुवातीला हे दोन्ही भाऊ रसगुल्ले बादलीत भरून आणि कागदाच्या पॅकेटमध्ये बिकानेरी भुजियासारखे तिखट-खारट पदार्थ पॅक करून विकायचे. त्यांचे रसगुल्ले जुन्या दिल्लीत आधीच लोकप्रिय होते; पण दिवाळीच्या पदार्थांच्या विक्रीमुळे ते लवकर प्रसिद्ध झाले. त्यांचे रसगुल्ले इतके प्रसिद्ध झाले की, ग्राहक त्यांच्याकडे गर्दी करू लागले. प्रत्येक व्यक्ती कधी २०-३०, तर कधी ५० रसगुल्लेही खरेदी करू लागले. पण, सर्वांना मिळतील इतके रसगुल्ले एका दिवसात बनवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे एका वेळी एका ग्राहकाला १० पेक्षा जास्त रसगुल्ले विकले जात नव्हते.

रसगुल्ले विकून कमावलेल्या पैशांतून १९६२ मध्ये त्यांनी दिल्लीत मोती बाजारात पहिले दुकान उघडले. हे दुकान मूग डाळ हलवा, बिकानेरी भुजिया व काजू कतली यांसाठी प्रसिद्ध होते. जसजशी त्यांची लोकप्रियता वाढत गेली, तसतसे अग्रवाल बंधूंना बिकानेरवाला म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर १९७२ मध्ये त्यांनी करोल बागेत एक दुकान विकत घेतले.

२०२३ मध्ये ३,००० कोटींची उलाढाल

ब्रँडला जागतिक स्तरावर नेण्यासाठी १९८८ मध्ये कंपनीने हवाबंद पॅकेजिंगमध्ये मिठाई आणि तिखट-खारट पदार्थ विकण्यासाठी ‘बिकानो’ लाँच केले. त्यानंतर १९९५ मध्ये ‘बिकानेरवाला’ने हरियाणातील फरिदाबाद येथे एक नवीन प्लांट उघडला आणि पेप्सिकोच्या ‘लहर’ ब्रँडसाठी स्नॅक्स तयार करण्यासाठी एक विशेष करार केला. तसेच २००३ मध्ये कंपनीने बिकानेरवाला चॅट कॅफे उघडण्यास सुरुवात केली. हे एक प्रकारचे फास्ट फूड सर्व्हिस रेस्टॉरंट आहे.

आज देशासह परदेशांतही ‘बिकानेरवाला’ आणि ‘बिकानेर’ या नावांनी २२५ आउटलेट्स आहेत. ‘बिकानेरवाला’ अमेरिका, दुबई, न्यूझीलंड, सिंगापूर, नेपाळ इत्यादी देशांमध्येही पोहोचला आहे. तसेच आता ते यूकेमध्ये विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

नवीन पिढीने केली प्रगती

या कुटुंबातील पुढच्या पिढीने कंपनीचे काम आधुनिक पद्धतीने पुढे नेले. पूर्वी बहुतेक काम हातांनी केले जात असे. पण, त्यानंतर यंत्रांचे युग सुरू झाले. त्यामुळे भारत आणि परदेशांतून चांगली यंत्रे मागवण्यात आल्यावर उत्पादन क्षमता वाढली आणि हातांनी काम करणे कमी झाले. ऑनलाइन ऑर्डर घेणे सुरू झाले आणि होम डिलिव्हरीदेखील सुरू झाली.