Success Story: स्वप्न साकारण्याची जिद्द ही नेहमी वयापेक्षा मोठी ठरते. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगण्याचा प्रयत्न करते. परंतु, प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. कोणाला डॉक्टर व्हायचे असते, कोणाला व्यावसायिक, तर कोणाला आणखी काही. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करीत असतात. आज आम्ही अशाच एका तरुणाचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत, ज्याने कमी वयात मोठी कामगिरी केली आहे.
वय वर्ष २२ असलेला हर्ष पाटील महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी आहे. हर्षला नेहमी नवनवीन प्रयोग करायला खूप आवडतात, त्यामुळे या वयात त्याने केशरची लागवड सुरू केली आहे. खरं तर हर्षने आपल्या पारंपरिक शेतीला हवामानाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी एरोपोनिक्स तंत्राने केशराची लागवड सुरू केली. आता यातून तो लाखो रुपयांची कमाई करतो.
शेतीचे नुकसान झालेले पाहून घेतला निर्णय
हर्ष पाटीलचे कुटुंब महाराष्ट्रातील नंदुरबार येथील एका गावात १२० एकर जमिनीवर केळी, टरबूज आणि कापूस पिकवते. परंतु, गेल्या काही वर्षांत वातावरणातील बदलामुळे आणि अवकाळी पावसामुळे त्यांची पिके करपून जाऊ लागली. हवामान बदलामुळे हर्षच्या कौटुंबिक शेतीचे नुकसान होत होते, त्यामुळे त्याने आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे ठरवले. तसेच हर्षला कधीही कॉर्पोरेट जगतात काम करायचे नव्हते. त्याला नेहमी व्यवसाय करण्याची इच्छा होती.
कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात हर्षने वेगवेगळ्या क्षेत्रांत व्यवसायाच्या संधी शोधायला सुरुवात केली. मात्र, त्याच्या पालकांचा त्यासाठी विरोध होता. कारण हर्षने फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यावे अशी त्यांची इच्छा होती. मुंबईत कॉम्प्युटर सायन्स शिकत असताना हर्षने शेतीचे नवीन तंत्र आणि आधुनिक पद्धती शिकायला सुरुवात केली. त्यावेळी त्याला ड्रॅगन फ्रूट, चंदन, केशर या नवीन पिकांची माहिती मिळाली.
केशरची लावगड करण्याची कल्पना कशी सुचली?
भारतात मोठ्या प्रमाणात केशर लागवड काश्मीरमध्ये केली जाते, कारण तेथील हवामान त्याला अनुकूल आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उष्ण वातावरणात केशर पिकवणे हे हर्षसाठी आव्हानात्मक होते. त्याने नियंत्रित वातावरणात एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून एका छोट्या खोलीत केशराची लागवड सुरू केली. एरोपोनिक्स तंत्रात झाडे मातीशिवाय वाढतात. हवेतून पोषक तत्वांचा पुरवठा होतो. हर्षने केशरसाठी योग्य हवामान देण्यासाठी या सेटअपमध्ये ह्युमिडिफायर आणि एअर कंडिशनर्स यांचाही वापर केला.
पहिल्याच प्रयत्नात मिळाले यश
हर्षने पहिल्याच प्रयत्नात एका छोट्या खोलीत ३५० ग्रॅम मोगरा जातीचे केशर पिकवले. यातून त्याला लाखो रुपयांचा नफा मिळाला. त्याने हळूहळू खूप प्रगती केली. हर्षचे हे यश पाहून अनेक शेतकरी त्याच्याशी संपर्क साधत आहेत. आतापर्यंत हर्षने ऑनलाइन कार्य क्लासेसच्या माध्यातून ५० हून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.