Success Story: स्वप्न साकारण्याची जिद्द ही नेहमी वयापेक्षा मोठी ठरते. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगण्याचा प्रयत्न करते. परंतु, प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. कोणाला डॉक्टर व्हायचे असते, कोणाला व्यावसायिक, तर कोणाला आणखी काही. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करीत असतात. आज अनेक तरुण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन उंची गाठत आहेत. आज अशाच एका तरुणाची यशोगाथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

किशन बगरिया हा आसाममधील दिब्रुगढ या छोट्या शहरातील तरुण आहे. ज्याने वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी एक ॲप बनवले. जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांनी त्याची उत्पादने खरेदी करण्यासाठी पसंती दर्शवली. एवढेच नाही, तर हे ॲप विकून तो आज ४०० कोटींचा मालक झाला आहे.

ॲप स्वतः बनवायला शिकला

किशनला लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड होती. किशनने माध्यमिक शिक्षण घेतले नव्हते. पण, त्याला तंत्रज्ञान जाणून घेऊन, ते समजून घेण्याची खूप इच्छा होती. छंद म्हणून त्याने एक लहान विंडोज ॲप बनवले. त्यानंतरही तो आणखी नवनवीन गोष्टी शिकत राहिला. ऑनलाइन माध्यम आणि प्रयोगांद्वारे त्याने आपले कौशल्य वाढविणे सुरूच ठेवले.

एका अॅपने बदलले किशनचे आयुष्य

२०२० मध्ये किशनने Texts.com नावाचे स्वतःचे मेसेजिंग ॲप सुरू केले. हे एक इंटिग्रेटेड मेसेजिंग प्लॅटफॉर्म होते; ज्याद्वारे वापरकर्ते व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम व ट्विटरसारख्या विविध ॲप्सवरून एकाच ठिकाणी संदेश मिळवू शकतात. किशनने बनविलेल्या या अॅपचे त्याच्या मित्रांनी कौतुक केले. हळूहळू अनेकांना या अॅपबद्दलची माहिती मिळू लागली. टेक इंडस्ट्रीतील अनेक कंपन्यांनी हे ॲप खरेदी करण्यासाठी किशनशी संपर्क साधला. शेवटी वर्डप्रेस तयार करणाऱ्या ऑटोमॅटिक या अमेरिकन कंपनीने २०२३ मध्ये किशनचे ॲप विकत घेतले. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अंतिम व्यवहारामध्ये किशनला ४१६ कोटी रुपये मिळाले.

हेही वाचा: Success Story: २०१३ च्या महापुरात स्वप्न धुळीस मिळालं; दोन मित्रांच्या साथीनं फक्त १६० रुपयांत केली सुरुवात अन् उभारली करोडोची कंपनी

दरम्यान, व्यवहारानंतर अमेरिकेतील ‘ऑटोमॅटिक’चे संस्थापक मॅट मुलेनवेग हे किशनला त्यांच्यासोबत सॅन फ्रान्सिस्कोला घेऊन गेले. आज किशन ‘टेक्स्ट डॉट कॉम’च्या टीमचे नेतृत्व करीत आहे आणि ऑटोमॅटिक कंपनीला टेक सपोर्ट देत आहे.