Success Story: स्विगी डिलिव्हरी एजंट ते प्रोफेशनल फॅशन मॉडेल, असा साहिल सिंगचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी असाच आहे. यशाचा हा प्रवास साहिलसाठी सोपा नव्हता. पण स्वतःमधील अविश्वसनीय परिवर्तन, दृढनिश्चय व मेहनत यांच्या जोरावर साहिलने स्वत:कडे यश जणू खेचून आणलं.
साहिल सिंग हा मुंबईचा रहिवासी असून, तो गरीब कुटुंबात जन्माला आला. त्याच्यावर लहानपणापासूनच घर सांभाळण्याची जबाबदारी होती. त्यामुळे साहिलने स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायला सुरुवात केली.
प्रोफेशनल फॅशन मॉडेल म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी साहिलने अनेक नोकऱ्या केल्या. त्यात त्याने दोन वर्षे स्विगीसाठी डिलिव्हरी एजंट म्हणून काम केले. एक वर्ष महाराष्ट्रातील बर्गर किंग आउटलेटमध्ये शेफ म्हणून आणि आठ महिने किराणा दुकानात कर्मचारी म्हणून काम केले. या नोकऱ्या करतानाही त्याने आपल्या स्वप्नांची साथ सोडली नाही. तो पराभव स्वीकारायला तयार नव्हता. स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याने प्रयत्न अथकपणे सुरूच ठेवले. मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केल्यानंतर त्याने अनेक असाइनमेंट्स केल्या आणि रॅम्प वॉकने सर्वांना प्रभावित केले.
रॅम्प वॉकचा व्हिडीओ चर्चेत
साहिलचा रॅम्प वॉकचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. साहिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर, ‘डिलिव्हरी बॉयपासून ते सेल्स एक्झिक्युटिव्हपर्यंत आणि नंतर मॉडेलपर्यंत’, अशी कॅप्शन देत, लोक त्याचे खूप कौतुक करीत असल्याचे म्हटलेय.
हेही वाचा: Success Story: रस्त्यांवर फुगे विकण्यापासून ते करोडोंची कंपनी उभी करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
साहिल सिंग कसा बनला सुपरमॉडेल?
एका मुलाखतीत साहिलने सांगितले की, फॅशन इंडस्ट्रीत येण्यासाठी त्याला बरीच वर्षे लागली. २००९ मध्ये त्याने एका मॉडेलचे पोस्टर पाहिले होते. तेव्हापासून तो मॉडेल व्हायचे स्वप्न पाहू लागला. त्यादरम्यान तो रस्त्याच्या कडेला पर्स विकायचा. सुमारे २०० ऑडिशन्सनंतर त्याची ‘स्ट्रिक्स’ने रॅम्प वॉकसाठी निवड केली. मॉडेलिंगसाठी त्याची उंची थोडी कमी असल्याने त्याला हील्स घालून रॅम्पवर चालण्याची संधी मिळाली. मॉडेलिंगव्यतिरिक्त साहिल सोशल मीडियावर व्हिडीओजच्या माध्यमातून पुरुषांच्या ग्रूमिंग आणि स्टायलिंगबद्दल टिप्सदेखील देतो.