Success Story: ज्या व्यक्तीला आयुष्यात आपली अनेक स्वप्नं पूर्ण करायची असतात ती व्यक्ती आयुष्यातील संकटं, अपयश, प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करतानाच आपल्या यशावर लक्ष केंद्रित करते. भारतात असे अनेक यशस्वी लोक आहेत की, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठमोठ्या परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. आज अशाच एका यशस्वी अधिकाऱ्याची संघर्षकथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील भीमरा गावातील पवनकुमार प्रजापत यांनी एकेकाळी घरोघरी भाज्या विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला होता; तर जोधपूरमध्ये अवघ्या ५० रुपयांत मजूर म्हणून कामदेखील केले होते. पवन प्रजापत यांचे आयुष्य लहानपणापासूनच संघर्षमय होते. घरची आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे ते लहानपणापासून पडेल ते काम करत होते. परंतु, त्यांनी आयुष्यात कधीही हार मानली नाही. आलेल्या प्रत्येक आव्हानावर मात करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि ते आरएएस परीक्षेत १७०व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

पवन प्रजापती यांचे संघर्षमय आयुष्य

पवन प्रजापती गावातील सरकारी शाळेतून पाचवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ सुरू झाला. दहावीपर्यंत गावातील शाळेत शिक्षण घेत असताना पवन यांना जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा ते घरापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात जाऊन तिथल्या एका भाजी व्यापाऱ्याकडून भाजी विकत घ्यायचे आणि परत येऊन आपल्या गावातील घरोघरी भाजी विकायचे. अशा रीतीने भाजीविक्री करून, त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.

भाजी विकत असतानाच मिळेल त्यावेळी अभ्यास करून, त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर चार महिने ते जोधपूरच्या एका कारखान्यात ५० रुपये प्रतिदिन या दराने मजूर म्हणून काम करू लागले. त्यानंतर बारावी पूर्ण करून, खासगीद्वारे बीएची पदवी मिळवली. २०१३ मध्ये त्यांना रेल्वेत गनमॅन म्हणून तैनात करण्यात आले. त्यानंतर २०१४ मध्ये पटवारीमध्ये त्यांची निवड झाली. मग पवन यांनी आरएएस परीक्षेची तयारी सुरू केली.

हेही वाचा: Success Story : एकेकाळी सहावीत अनुत्तीर्ण; पण आता तब्बल ५०० कोटींच्या कंपनीचा मालक

संघर्षाला मिळाले यश

२०१६ मध्ये पवन यांची एलआरओ पदासाठी निवड झाली. तसेच २०१८ साली त्यांनी पहिल्यांदा RAS परीक्षा दिली; पण त्यावेळी त्यांना यश मिळाले नाही. मात्र, त्यांनी हार न मानता, अभ्यास सुरूच ठेवला. शेवटी २०२१ च्या भरती परीक्षेत कठोर परिश्रम करून, पवन १७० व्या क्रमांकासह RAS च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले.