Success Story: जगात प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. कोणाला पोलिस व्हायचे असते, तर कोणाला व्यावसायिक व्हायचे असते. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करत असतात. पण, या प्रयत्नांना अनेकदा हवं तसं यश मिळत नाही, त्यामुळे काही जण खचून जातात आणि ते स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट अर्धवट सोडून देतात; तर काही जण थोड्या मिळालेल्या यशातही समाधानी होतात. पण, असेदेखील काही लोक असतात, संकटाला तोंड देऊन पुन्हा नवी सुरुवात करून आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. आज आम्ही अशाच एका व्यावसायिकाबद्दल सांगणार आहोत, जे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून आता अब्जाधीश आहेत.

सुरतचे सर्वात श्रीमंत व्यक्ती अश्विन देसाई यांच्या यशाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यातील एक काळ असा होता, जेव्हा ते एका लहान खोलीत राहत होते आणि आज त्यांची एकूण संपत्ती १०,०४६ कोटी रुपये आहे. २०१३ मध्ये त्यांनी एथर इंडस्ट्रीजची स्थापना केली असून हळूहळू त्यांचा हा व्यवसाय प्रगतिपथावर पोहोचला.

असा सुरू झाला यशाचा प्रवास

अश्विन देसाई यांनी २०१३ मध्ये एथर इंडस्ट्रीजची स्थापना केली. आज ही कंपनी ॲग्रोकेमिकल्स, फार्मास्युटिकल्स तसेच तेल आणि वायू यांसारख्या उद्योगांना विशेष रसायनांचा पुरवठा करणारी मुख्य कंपनी बनली आहे. अश्विन यांचे गुजरातमध्ये दोन कारखाने असून त्यांची दोन मुलं रोहन आणि अमन या व्यवसायातील संचालन आणि तांत्रिक बाबी हाताळतात. तसेच अश्विन देसाई यांच्या पत्नी पौर्णिमा या मंडळाच्या सदस्या आहेत. जून २०२२ मध्ये देसाई यांनी त्यांच्या कंपनीला पब्लिक केली आणि १०.३ कोटी डॉलर जमवले. शेअर मार्केटमध्ये कंपनीचा स्टॉक १० टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध झाला आहे, यामुळे देसाई अब्जाधीश झाले.

हेही वाचा: Success Story: सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केला व्यवसाय; आज वर्षाला करतो लाखोंची कमाई

अश्विन देसाई यांचा उद्योजकीय प्रवास १९७६ मध्ये सुरू झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या मेव्हण्याबरोबर केमिकल्सचा व्यवसाय सुरू केला. सुरतमध्ये एका खोलीमध्ये रहात असताना देसाई यांनी शहराच्या सीमेवर विहिरीसह एक शेत भाड्याने घेतले. येथे त्यांनी सल्फरिल क्लोराईडचे उत्पादन सुरू केले. हे एक अतिशय धोकादायक अजैविक कंपाऊंड आहे. त्यावेळी हे भारतामध्ये आयात केले जायचे. हे केमिकल डाय आणि फार्मास्युटिकल उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावते. अश्विन देसाई यांची एथर इंडस्ट्रीज अजूनही विस्तारत आहे. तसेच ते सुरतमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.