Success Story: राजस्थानमधील एका लहान शहरातून दिल्लीत आलेल्या आणि ‘पिझ्झा हट’मध्ये काम करणाऱ्या शिजू पप्पन यांनी मेहनतीच्या जोरावर एक कॅफे चेन सुरू केली. आज ते वर्षाला आठ कोटी रुपये कमावतात. १९९७ मध्ये दिल्लीत आलेल्या शिजू पप्पन यांनी ‘पिझ्झा हट’मध्ये साफसफाई आणि वेटरचे काम केले. पण, त्यानंतर त्यांनी त्यांची ‘द चटपटा अफेअर’ कंपनी सुरू केली. आता संपूर्ण भारतात त्यांच्या कंपनीचे ५० आउटलेट्स आहेत.

शिजू पप्पन यांचा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी उत्तम उदाहरण आहे. ‘पिझ्झा हट’मध्ये काम करताना त्यांनी भारतीय स्ट्रीट फूडला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी ‘द चटपटा अफेअर’ सुरू केले. शिजू पप्पन यांचे बालपण राजस्थानमधील एका छोट्या शहरात गेले. आई-वडिलांच्या निधनामुळे त्यांना लहानपणापासूनच अनेक अडचणींना सामना करावा लागला होता. १९९७ मध्ये ते उदरनिर्वाह करण्यासाठी दिल्लीत आले आणि ‘पिझ्झा हट’मध्ये काम करू लागले. पण, या नोकरीत त्यांना पाच ते सहा हजार रुपये इतका कमी पगार मिळत होता. पण, एवढ्या पगारात त्यांना महिन्याचा खर्च भागवणे कठीण होते. त्यानंतर त्यांनी फास्ट फूड उद्योगात २० वर्षे काम केले. त्यादरम्यान त्यांनी ‘सदर्न फ्राइड चिकन’चे सीईओ म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

२०२० मध्ये पप्पन यांनी ‘द चटपटा अफेअर’ सुरू केले. हळूहळू पप्पन यांचा व्यवसाय झपाट्याने वाढू लागला. आज त्यांची कंपनी देशभरात ५० ठिकाणी म्हणजेच बंगळुरू, चेन्नई, गुरुग्राम व हैदराबादसारख्या प्रमुख शहरांत कार्यरत आहे. या कॅफे चेनची वार्षिक कमाई सुमारे आठ कोटी रुपये आहे.

हेही वाचा: Success Story : गरीब परिस्थिती, इंटरव्ह्यूला जाण्यासाठी नव्हते कपडे… परिस्थितीवर मात करून मिळवला ६७ वा क्रमांक

‘द चटपटा अफेअर’मध्ये २०० हून अधिक पदार्थ

शिजू पप्पन यांच्या ‘द चटपटा अफेअर’मध्ये बिहारच्या प्रसिद्ध लिट्टी चोख्यापासून ते उत्तर भारतातील स्वादिष्ट चाटपर्यंत असे सुमारे २०० पदार्थ आहेत. पप्पन यांना भारतीय स्ट्रीट फूड पिझ्झा व बर्गरसारखे लोकप्रिय व्हावे, असे वाटते. त्यामुळे ते भारतीय स्ट्रीड फूड अधिक लोकप्रिय व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.