Success Story: व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत; यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला कठोर मेहनत घ्यावी लागते. आज आम्ही अशाच एका यशस्वी व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास तुमच्यासमोर मांडणार आहोत.
दरमहा ४०० रुपये पगाराची नोकरी करण्यापासून ते २,००० कोटींची कंपनी उभारण्यापर्यंतचा कैलास काटकर यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. कैलास काटकर यांनी ‘क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून भारतातील आघाडीच्या आयटी सिक्युरिटी सोल्युशन्स व्यवसायात ओळख आहे. कैलास यांनी वीज उपकरणांच्या दुरुस्तीचे दुकान असलेल्या व्यवसायाला जागतिक IT सिक्युरिटी सोल्युशन्स समूहात बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कैलास काटकर यांचा जन्म १९६६ मध्ये महाराष्ट्रातील रहिमतपूर येथील एका कुटुंबात झाला. मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कैलास यांनी आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी स्थानिक रेडिओ आणि गणकयंत्र (कॅलक्युलेटर) दुरुस्तीच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. या कामाबद्दल त्यांना दरमहा ४०० रुपये पगार मिळत होता.
१९९० च्या दशकापर्यंत पुरेसे तांत्रिक कौशल्य प्राप्त केल्यानंतर कैलास यांनी १५,००० रुपयांच्या गुंतवणुकीसह स्वतःची गणकयंत्र दुरुस्तीची कंपनी सुरू केली. त्यानंतर कैलास यांनी १९९३ मध्ये कॅट कॉम्प्युटर सर्व्हिसेसची स्थापना केली, जी संगणक दुरुस्ती आणि देखभाल सेवा देते. बाजारातील व्यापक संशोधनानंतर कैलास यांना क्विक हीलबाबतची संकल्पना सुचली.
हेही वाचा: Success Story : तब्बल नऊ वेळा अपयश येऊनही न खचता प्रयत्नांची शिकस्त; आज करोडोच्या कंपनीचे मालक
व्यवसाय उभारणीच्या काळात त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. १९९९ मध्ये कंपनीची स्थिती इतकी भयानक होती की, ते कर्मचाऱ्यांचे पगारही देऊ शकत नव्हते. तथापि, त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ते या अडचणीवर मात करू शकले. त्यावेळी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काटकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एकत्र करून, अथक परिश्रम घेतले.