Success Story: आयुष्याची परीक्षा असो किंवा UPSC, MPSE यांसारख्या मोठमोठ्या परीक्षा असोत. माणसाची जिद्द व मेहनत त्याच्या वाईट परिस्थितीलाही मात देते. भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न असंख्य मुले-मुली पाहतात. त्यासाठी दिवस-रात्र ते प्रचंड मेहनतही घेतात. काही जण कॉलेजमध्ये शिकत असल्यापासूनच यूपीएससी परीक्षेच्या तयारीला लागतात. आयुष्यातील आर्थिक, सामाजिक संकटांवर मात करून ते आपले स्वप्न साकारतात. आज आम्ही अशाच एका यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला सांगणार आहोत.
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन सर्वांत तरुण आयएएस अधिकारी बनलेल्या अन्सार शेखने हे सिद्ध केले आहे. अन्सार शेखचे वडील युनूस शेख अहमद ऑटोरिक्षा चालवायचे आणि त्याची आई आदिला शेख शेतात काम करायची त्याचा धाकटा भाऊ अनिसने इयत्ता सातवीत शाळा सोडली आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व भावाला आयएएस परीक्षेची तयारी करण्यास मदत करण्यासाठी गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली.
पहिल्या प्रयत्नात UPSC केली उत्तीर्ण
अन्सार शेख आणि त्यांच्या कुटुंबाला संघर्ष, कठोर परिश्रम व समर्पणामुळे यश मिळाले. गरिबीत वाढलेल्या आणि मोठ्या कष्टातून शिक्षण घेत असलेल्या अन्सार शेखने वयाच्या २१ व्या वर्षी २०१६ च्या यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात आयएएस होऊन इतिहास घडवला.
अन्सार शेख हा मूळचा महाराष्ट्रातील जालना गावचा रहिवासी आहे. तिथे त्याचे बालपण गरिबीत गेले. त्याच्या दोन बहिणींचे लहान वयातच लग्न झाले होते आणि त्यांच्या धाकट्या भावानेही नोकरीसाठी शिक्षण सोडले होते. परिस्थिती इतकी बिकट झाली की, त्याच्या नातेवाइकांनी अन्सारला शिक्षण सोडून काम करायला सांगितले. कुटुंबाच्या प्रचंड दबावाखाली, अन्सारचे वडीलही पैशाअभावी त्याचे शिक्षण थांबविण्यासाठी त्याच्या शाळेत गेले.
त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी समजावून सांगितल्यावर वडिलांनी त्याचे शिक्षण सुरू ठेवण्याची परवानगी दिली. अन्सारने बारावीत ९१ टक्के आणि पदवीमध्ये ७३ टक्के गुण मिळवले. मग त्याने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. सर्वांत तरुण आयएएस अन्सार शेखने एक वर्ष प्रशिक्षण घेतले आणि तीन वर्षे कठोर तयारी केली. त्यानंतर तो यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेला बसला. यूपीएससीमध्ये पहिल्याच प्रयत्नात अन्सार शेखने ३६१ वा रँक मिळवली आणि वयाच्या २१ व्या वर्षी तो देशातील सर्वांत तरुण आयएएस अधिकारी बनला.