Success Story : झोमॅटोचे नाव आता देशात लोकप्रिय झाले आहे. या कंपनीचे संस्थापक व सीईओ दीपिंदर गोयल यांनी झोमॅटोची स्थापना करण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना केला. त्यांच्या यशाची गोष्ट देशातील हजारो नवोदित उद्योजकांना प्रेरणा देते. पंजाबमधील एका छोट्या गावातील रहिवासी असल्याने दीपिंदर गोयल यांना अभ्यासात फारसा रस नव्हता. ते सहावीच्या वर्गातही नापास झाले होते; परंतु त्यानंतर काही वर्षांनी कठोर परिश्रमाने ते आयआयटीमध्ये प्रवेश मिळविण्यात यशस्वी झाले.
दीपिंदर गोयल यांचा जन्म पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब या शहरात झाला होता. त्यांचे आई-वडील दोघेही शिक्षक होते. सहावीमध्ये ते नापास झाले. परंतु, त्यांच्यात चिकाटी होती. मग त्यांनी जिद्दीने अभ्यास केला आणि २००१ मध्ये ते जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले. गणित आणि कॉम्प्युटरमध्ये बी.टेक. करण्यासाठी त्यांनी आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते दिल्लीतील एका कंपनीत काम करू लागले.
या ठिकाणी दीपिंदर यांच्या लक्षात आले की, त्यांचे सहकारी अनेकदा जेवण आणि जेवण ऑर्डर करण्यावर चर्चा करतात. या वारंवार होणाऱ्या चर्चांमुळे त्यांच्या मनात अन्न वितरण ॲप्लिकेशनच्या कल्पनेने घर केले. मग दीपिंदर यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन, पंकज चड्डाह यांच्यासह Foodiebay नावाचा फूड डिलिव्हरी स्टार्टअप सुरू केला. याच कंपनीला २०१० मध्ये झोमॅटो, असे नाव देण्यात आले.
आज Zomato चे मार्केट कॅप सुमारे २.४ लाख कोटी रुपये आहे. झोमॅटोशिवाय दीपिंदर यांनी इतर अनेक कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. दीपिंदर यांनी अलीकडेच त्यांच्या पत्नीसह फूड डिलिव्हरी एजंट म्हणून काम करण्यासाठी एक दिवस काढून, डिलिव्हरी भागीदारांना येणाऱ्या आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.