Success Story: मुंबईच्या एका गरीब कुटुंबातील झोपडपट्टीत वाढलेली एक महिला आज लाखो महिलांसाठी आदर्श ठरत आहे. असेल ती परिस्थिती स्वीकारून मेहनत आणि डोळ्यांतल्या स्वप्नांच्या जोरावर यश कसे मिळवायचे हे या महिलेच्या खडतर प्रवासातून शिकायला मिळते. वर्षा सोळंकी असे या महिलेचे नाव असून, ही एक सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व कंटेंट क्रिएटर आहे. उत्तम डान्स आणि अभिनयाच्या जोरावर ती आता संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली आहे.
मोलकरीण म्हणून करायची काम
वर्षाला लहानपणापासून डान्सची आवड होती; परंतु घरातील गरीब परिस्थितीमुळे तिला हे स्वप्न करण्याची संधी मिळाली नाही. वर्षा लग्नापूर्वी तिच्या आईला मदत करण्यासाठी घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम करायची. परिस्थितीमुळे तिला शाळाही अर्धवट सोडावी लागली. त्यानंतर लग्न झाले आणि कुटुंबाच्या जबाबदारीत ती पुन्हा गुरफटली. पण, तिने हार मानली नाही.
लोकांनी उडवली खिल्ली
एके दिवशी तिने धाडस करून सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड करायला सुरुवात केली. अनेकांनी तिचे कौतुक केले, तर काही लोकांनी तिची खिल्लीही उडवली. पण, यामुळे त्याला काही फरक पडला नाही. ती तिच्या कामात व्यग्र राहिली. वर्षा सतत व्हिडीओ बनवत आणि अपलोड करत राहिली.आज वर्षाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत आणि ती यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनही लाखो रुपये कमावते. तसेच वर्षा सोळंकी हिंदी टेलिव्हिजनवरील ‘डान्स दिवाने सीजन ४’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.