Success Story: कष्ट आणि जिद्द माणसाला कधी यशाच्या शिखरावर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. भारतात असे लहान-मोठे उद्योजक आहेत, ज्यांनी आयुष्यातील अनेक अडथळ्यांवर मात करून आपलं यश गाठलं आहे. यातील अनेकांचा प्रवास खूप प्रेरणादायी असतो. आज आम्ही अशाच एका व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास घेऊन आलो आहोत.

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील भावेश पुरोहित याने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘धेनू प्रसाद’ नावाची कंपनी सुरू केली, ज्यात गोमूत्रापासून नैसर्गिक खत बनवले जाते. २०१७ मध्ये भावेशने या कंपनीची पायाभरणी केली असून ही कंपनी वर्षाला ७० लाख रुपये कमावत आहे.

अशी झाली व्यवसायाची सुरुवात

भावेश पुरोहित गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील भाभर येथील रहिवासी आहे. त्याने बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतली असून या व्यवसायासाठी भावेशला वडिलांकडून प्रेरणा मिळाली. त्याचे वडील निराधार गाईंना वाचवायचे. वडिलांनी गाईंसाठी घेतलेले कष्ट त्याने पाहिले होते, त्यामुळे या गाई शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्हाव्यात अशी त्याची इच्छा होती. रूपांतर करण्याच्या कल्पनेतून त्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांना गाई पाळणे शक्य होईल, हे त्यांना माहीत होते. सेंद्रिय शेतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल; तसेच ग्राहकांना ताजे, अधिक नैसर्गिक अन्न उत्पादने मिळतील, या कल्पनेच्या पायावर धेनू प्रसाद ॲग्रोव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली.

अनेक ठिकाणी नकार पचवला

तीन वर्षांच्या संशोधनानंतर भावेशने गोमूत्र खताचा यशस्वीपणे व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला भावेशने वडिलांच्या गोठ्यातून केवळ ५० लिटर गोमूत्र गोळा केले. भावेश जवळपास दररोज आजूबाजूच्या गावात आणि शेतात जात असे. पण, शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल माहीत नसल्यामुळे त्याला सतत नकार मिळाला. कोणीही प्रयत्न करायला तयार नव्हते. त्यानंतर त्याने शेतकऱ्यांना गोमूत्र खताच्या फायद्यांविषयी जागरूक करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या आणि हळूहळू त्याला यश मिळू लागलं.

हेही वाचा: Success Story: ‘कष्ट हाच यशाचा मार्ग’; IIT परीक्षेत आलं अपयश, हार न मानता कमी पैशात घेतली शिकवणी आणि उभी केली आठ हजार कोटींची कंपनी

आज ‘धेनू प्रसाद’ हे गोमूत्र डेअरी म्हणून उदयास आले आहे. हे ५०० हून अधिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यास मदत करते. तसेच ही कंपनी दरमहा ४५,००० लिटर गोमूत्रावर प्रक्रिया करते. हे धनरक्षक (नैसर्गिक कीटकनाशक) आणि धनभूमी (माती कंडिशनर) सारखी उत्पादने देते. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल ७० लाख रुपये होता.