Success Story Of Diganta Das : एखादी गोष्ट तुम्ही मनापासून ठरवली आणि त्या दिशेने प्रयत्न चालू ठेवले तर तुम्हाला यश नक्कीच मिळते. पण, या यशाच्या प्रवासात एखादं जरी संकट आलं तरीही मन घाबरून जाते. तर घाबरून जाण्यापेक्षा पुन्हा ध्येयाने आपण कसा प्रवास सुरू करतो ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. तर याचं उत्तम उदाहरण दिगंत दास यांच्या प्रवासातून (Success Story) आपल्याला पाहायला मिळेल. दिगंत दास यांनी आसाममध्ये पराठा-ऑन-द-गो (paratha-on-the-go) उपक्रम सुरू केला आहे; ज्यामध्ये १० लोक काम करतात आणि दररोज सुमारे १,४०० पराठे तयार करतात. दास यांना पराठ्याची संकल्पना केरळच्या प्रसिद्ध मलबार परोठ्यापासून मिळाली आहे, जे देशभरात एक प्रसिद्ध नाव आहे.

कोण आहेत दिगंत दास?

दिगंत दास, मूळचे बिस्वनाथ जिल्ह्यातील गोपाळपूर शहरातील आहेत. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे शिक्षण गोपाळपूर नेहरू उच्च माध्यमिक विद्यालयात झाले, जिथे त्यांनी २००१ मध्ये मॅट्रिक पूर्ण केले. त्यांनी परिस्थितीअभावी लहान वयातच काम करून कुटुंबाला मदत करण्यास सुरुवात केली.

काही काळ कोळशाच्या खाणीत काम केल्यानंतर, दास आसामच्या उदलगुरी जिल्ह्यातील एका बांधकाम कंपनीत स्टोअरकीपर म्हणून रुजू झाले, जिथे त्यांना स्वयंपाक करण्याचे काम करण्याची संधी मिळाली. नंतर २००८ मध्ये दिगंत दास चांगल्या संधींच्या शोधात बंगळुरूला गेले. देशातील टेक हबमध्ये दास यांनी खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम केले.

हेही वाचा…Success Story : एका वर्षात सोडलं आयएएस पद, स्वतःचं उभारलं कोचिंग सेंटर; वाचा लोकप्रिय विकास दिव्यकीर्ती यांची यशोगाथा

त्यानंतर २०१४ मध्ये त्यांचे लग्न झाले आणि बंगळुरूमधील अन्न उत्पादन युनिटमध्ये मिक्सिंग मॅन म्हणून त्यांनी नोकरी मिळवली. उल्लेखनीय म्हणजे, अन्न उद्योगात पहिल्यांदाच काम करणाऱ्या दास (Success Story) यांना हळूहळू सर्व गोष्टी कळू लागल्या. त्यानंतर उत्कृष्ट कौशल्य आणि मेहनतीमुळे दास यांना पराठा बनवणाऱ्या पदावर बढती मिळाली. मात्र, काही अपरिहार्य परिस्थितीमुळे त्यांना आसामला परत यावे लागले.

दास यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट:

दिगंत दास यांच्या जीवनात एक टर्निंग पॉईंट आला, जेव्हा विजेची तार त्यांच्यावर पडली आणि त्यांना अर्धांगवायू झाला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, “२०१७ मध्ये एक हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक केबल माझ्या अंगावर पडली, त्यामुळे मला अर्धांगवायू झाला. पूर्णपणे बरे होण्यासाठी मला तीन ते चार वर्षे लागली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा होता. मी खूप चिंतेत होतो, कारण माझे कुटुंबीयही चिंतेत होते.” त्यानंतर काही काळाने त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि ते पुन्हा बंगळुरूला जाऊन पराठा बनवण्याचे काम करू लागले.

एका नवीन प्रवासाला सुरुवात (Success Story) :

देशात कोविड-१९ महामारी जेव्हा सुरू झाली तेव्हा दासच्या जवळच्या मित्राने वेल्लोरमध्ये पराठा ब्रँड स्थापन केला. पराठा ब्रँडच्या मार्केटिंगकडे दास यांना लक्ष देण्यास सांगितले. त्यानंतर दास आंध्र प्रदेशात गेले आणि त्यांनी मित्राच्या ब्रँडचे व्यवस्थापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच राज्यात चांगला ग्राहकवर्ग निर्माण करण्यात दास यांना यश आले. त्यानंतर त्यांनी स्वतःचा पराठा ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्वतःच्या गावी त्यांनी गोपाळपूरमध्ये ‘डेली फ्रेश फूड’ सुरू केलं.

स्वतःच्या प्रवासाबद्दल सांगताना दास म्हणाले की, “तरुण नोकरीच्या शोधात इतर देशात जातात, पण त्यांच्यासमोर अनेक संधी येथेच उपलब्ध असतात. मी तरुणांना आमंत्रण देतो, जे देशाच्या विविध भागांत काम करत आहेत, त्यांनी माझ्याबरोबर काम करण्यासाठी यावे.” स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी दास यांनी मजूर, कोळसा खाणीत काम करणारा कामगार, स्वयंपाक बनवणारा, सुरक्षा रक्षक आदी अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं आहे. दास यांचा प्रवास (Success Story) पाहून त्यांचा खूप अभिमान वाटतो. कारण त्यांचा हा प्रवास अनुभव व मेहनतीच्या जोरावर त्यांनी पूर्ण करून दाखवला आहे.