Success Story: भारतातील दिग्गजांचे प्रेरणादायी प्रवास नेहमीच आपल्याला ऊर्जा देतात. स्वप्नपूर्तीसाठी अनेक जण या यशस्वी दिग्गजांच्या प्रेरणादायी प्रवासाकडे आदर्श म्हणून पाहतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी करण्याचे ध्येय असते. पण, प्रत्येकवेळी हे स्वप्न साकारण्यासाठी वयाची आणि शिक्षणाची अट असतेच असं नाही. भारतात असेदेखील अनेक यशस्वी लोक आहेत ज्यांचे खूप कमी शिक्षण झाले आहे, पण तरीही आज ते करोडोंचा व्यवसाय सांभाळतात. आज आम्ही अशाच एका व्यावसायिकाचा प्रेरणादायी प्रवास तुमच्यासमोर मांडणार आहोत, ज्यांचे शिक्षण फक्त आठवीपर्यंत झाले; पण आज ते जगात अब्जाधीश म्हणून ओळखले जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवरतन अग्रवाल हे सुप्रसिद्ध ‘बिकाजी’ ब्रँडचे संस्थापक असून आज वयाच्या ७२ व्या वर्षी ते १३,४३० कोटी रुपयांची कंपनी सांभाळत आहेत. शिवरतन अग्रवाल हे गंगाभिसन ‘हल्दीराम’ भुजियावाला यांचे नातू आहेत, जे ‘हल्दीराम’ सोबत आपल्या व्यवसायामुळे प्रसिद्धीस आले. शिवरतन यांनी सुरुवातीला आपल्या कौटुंबिक व्यवसायातून सुरुवात केली. मात्र, हल्दीराम यांच्या निधनानंतर ‘हल्दीराम भुजियावाला’चा व्यवसाय त्यांचा मुलगा मूलचंद अग्रवाल यांच्याकडे गेला. मूलचंद अग्रवाल यांना शिवकिसन अग्रवाल, मनोहर लाल अग्रवाल, मधु अग्रवाल आणि शिवरतन अग्रवाल ही चार मुलं होती. शिवकिसन अग्रवाल, मनोहर लाल अग्रवाल, मधु यांनी मिळून भुजियाचा नवीन ब्रँड सुरू केला आणि त्याचे नाव आजोबांच्या ‘हल्दीराम’ या नावावरून ठेवण्यात आले. मात्र, तिन्ही भावांसोबत व्यवसाय करण्याऐवजी शिवरतन यांनी स्वतःचा ‘बिकाजी’ हा नवा ब्रँड सुरू केला.

शिवरतन यांना लहानपणापासूनच नमकीन पदार्थ बनवण्याची खूप आवड होती आणि त्यांनी आजोबांकडून भुजिया कसे बनवायचे हे शिकून घेतले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्यवसाय करणं खूप सोपं झालं होतं. त्यावेळी त्यांनी खूप विचार केला आणि तेव्हाच त्यांनी बेसनपासून बनवलेला ‘बिकानेरी भुजिया’ हा खास पदार्थ बनवला. हल्दीराम हे आधीच या क्षेत्रात नावाजले होते. त्यांना त्यांच्याशी स्पर्धा करायची होती. १९८६ मध्ये अग्रवाल यांनी बिकाजी फूड्स इंटरनॅशनलचे म्हणून शिवदीप प्रॉडक्ट्सची स्थापना करून त्यांच्या उद्योजकीय उपक्रमाची पायाभरणी केली. बिकाजी यांना १९९२ मध्ये औद्योगिक उत्कृष्टतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा: Success Story: आयुष्यभर LIC एजंटची नोकरी करून उभारली २३ हजार कोटींची कंपनी; जाणून घ्या जिद्दीचे फळ

२५ वर्षांहून अधिक काळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर शिवरतन अग्रवाल यांनी बिकाजी फूड्सला यशाच्या शिखरावर पोहोचवले. आज कंपनीचे बाजार भांडवल १३,४३० कोटी रुपये आहे. तसेच बिकाजी २५० हून अधिक उत्पादने तयार करतात. बिकाजीची उत्पादने परदेशातही पाठवली जातात. त्यांच्या उत्पादनांमध्ये पाश्चात्य स्नॅक्स आणि फ्रोझन वस्तूंचाही समावेश आहे आणि आज बिकाजी उत्पादने देशभरातील आठ लाखांहून अधिक दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. बिकाजी फूड्सचा विस्तृत उत्पादन पोर्टफोलिओ, आयकॉनिक भुजिया आणि नमकीनपासून ते पॅकेज्ड मिठाई, पापड आणि इतर स्वादिष्ट स्नॅक्सपर्यंत ब्रँडला देशभरातील ग्राहकांमध्ये दर्जा प्राप्त झाला आहे.

अग्रवाल यांचा फोर्ब्सच्या २०२४ च्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तसेच मासिकाच्या अहवालानुसार, ११ एप्रिलपर्यंत त्यांची एकूण संपत्ती १०,८३० कोटी रुपये आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story education up to 8th and built a company worth 13 thousand crores founder of the famous bikaji brand sap