Success Story: आयुष्यात असे खूप कमी लोक आहेत जे त्यांचा छंदच व्यवसाय म्हणून निवडतात. करोना काळात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली, ज्यामुळे लोकांनी उदरनिर्वाहाचे साधन आणि छंद म्हणून विविध फूड व्यवसायात पदार्पण केले. ज्यात त्यांनी फूड स्टॉलपासून ते फूड ट्रक, हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला. अशीच एक सुरुवात २०२१ मध्ये नाहर बंधूंनीही केली. आनंद नाहर आणि अमृत नाहर या दोन्ही भावांना खाद्यपदार्थांबद्दल इतकी ओढ होती की त्यांनी एक ब्रँड सुरू केला.
अशी झाली सुरुवात
सुरतच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील नाहर बंधूंनी २०२१ साली करोनामुळे बंद पडलेले रेस्टॉरंट विकत घेतले. त्यात त्यांनी ५० हजार रुपये गुंतवले आणि फूड करिअरला सुरुवात केली. त्यांचा हा व्यवसाय फ्रँचायझी मॉडेलवर चालतो. सुरतमधील पहिल्या रेस्टॉरंटशिवाय त्यांच्याकडे १५० हून अधिक फ्रँचायझी आउटलेट आहेत.
इंजिनिअर भाऊ झाले व्यावसायिक
आनंद आणि अमृत हे दोन्ही भाऊ इंजिनिअर असून आनंदने ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले आहे, तर अमृतने पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये बी.ई. केले आहे. इंजिनिअरिंग केल्यानंतर २०१६ मध्ये आनंद शेअर मार्केटमध्ये रुजू झाले. त्यांनी ब्रोकरेज फर्ममध्ये फ्रीलान्स बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अमृतही शेअर मार्केटमध्ये उतरला. त्यानंतर २०२० मध्ये करोना काळात नाहर बंधूंनी घरी स्वयंपाक करून नवनवीन पदार्थ बनवण्याचे प्रयोग सुरू केले. दोघेही स्वयंपाकाचा आनंद घेऊ लागले. पुढे त्यांना स्वयंपाकाची आवड निर्माण झाली, त्यानंतर त्यातच करिअर करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. यावेळी त्यांनी स्वस्त दरात उत्कृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणारे कॅफे सुरू करण्याची योजना आखली.
नाहर भावंडांनी केली जोर्को ब्रँडीची सुरुवात
नाहर भावंडांनी जोर्को ब्रँडीची सुरुवात केली आणि हळूहळू मेहनतीच्या जोरावर देशामध्ये अनेक ठिकाणी या ब्रँडचे आउटलेट सुरू केले. आज जोर्कोचे देशातील ४२ हून अधिक शहरांमध्ये आउटलेट आहेत. या आउटलेटची संख्या २५० पेक्षा जास्त आहे. तसेत नाहर ब्रदर्स या व्यवसायाच्या माध्यमातून ४०० हून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. जोर्को ब्रँड आतापर्यंत १०० कोटींच्या घरात पोहोचला आहे.