Success Story: फॅशन डिझायनर ते बिझनेस कोच हर्षद कोंडाकमरला यांच्या यशाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. हर्षद यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांना तोंड दिले. त्यांनी एनआयएफटी हैदराबादमधून फॅशन डिझायनिंग आणि उस्मानिया विद्यापीठातून बीए-आर्ट्स केले. सुरुवातीला फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये शिकवल्यानंतर ते अनेक मोठ्या ब्रँडशी जोडले गेले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी स्वतःचा फॅशन व्यवसाय सुरू केला. पण, करोनामुळे तो बंद करावा लागला. परंतु, हार न मानता त्यांनी व्यवसाय प्रशिक्षणात आपले करिअर घडवले. आज त्यांनी १४० हून अधिक मोठ्या ब्रँड आणि १०,००० हून अधिक उद्योजकांना यशाचा मार्ग दाखवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हर्षद कोंडाकमरला यांचे बालपण

६ मे १९७८ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील खंकाल गावात हर्षद यांचा जन्म झाला. तसेच सुरुवातीचे शिक्षण विद्या गिरी, प्रशांती निलयम, पुट्टपार्थी येथे झाले. त्यानंतर त्यांनी मदनपल्ले येथील वाणी ज्युनियर कॉलेजमधून दहावी आणि बारावी पूर्ण केली. लहानपणापासूनच त्यांना फॅशनची आवड होती, म्हणूनच हर्षद यांनी NIFT हैदराबादमधून फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी घेतली.

त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, हर्षद यांनी अनेक फॅशन संस्थांमध्ये शिकवले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना फॅशनचे बारकावे शिकवले. यानंतर हर्षद यांनी अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी डिझायनिंगचे काम केले. व्हिज्युअल मर्चेंडायझिंग आणि रिटेल डिझाइनमध्ये आपले कतृत्व सिद्ध करून ते मोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर पोहोचले. १९९८ ते २०१० पर्यंत त्यांनी शॉपर्स स्टॉप, पँटालून, लाईफस्टाईल आणि खादिम्ससारख्या मोठ्या ब्रँडसोबत काम केले. या काळात त्यांनी आपली क्षमता खरी असल्याचे सिद्ध केले. एक यशस्वी फॅशन डिझायनर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

अडचणींसमोर जिद्द सोडली नाही

२०११ मध्ये हर्षद यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘युथ अर्बन फॅशन वेअर’ नावाचे फॅशन स्टोअर उघडले. यासह त्यांनी रिटेल डिझाइन कन्सल्टिंग आणि बिझनेस कोचिंगदेखील सुरू केले. परंतु, करोना साथीच्या आजारामुळे त्यांना त्यांचा फॅशन व्यवसाय बंद करावा लागला. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता, पण त्यांनी हार मानली नाही.

व्यवसायात अडचणीत असूनही हर्षद यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी ‘वेल्थी रिटेलर्स हब’ नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला. ते गेल्या १४ वर्षांपासून व्यवसाय प्रशिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत. या काळात त्यांनी १४० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अब्ज डॉलर्सच्या ब्रँडसोबत काम केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी १०,००० हून अधिक उद्योजकांना त्यांचे व्यवसाय वाढवण्यास मदत केली. त्यांनी आशिया आणि युरोपमधील अनेक मोठ्या ब्रँडबरोबर काम केले. आता ते २५० हून अधिक शीर्ष सीईओंच्या समुदायातदेखील सक्रिय आहेत.