Success Story: माणूस पैशाने किताही गरीब असला तरीही त्याची मेहनत आणि चिकाटी त्याला स्वप्नपूर्तीपर्यंत नेऊन पोहोचवते. भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न असंख्य विद्यार्थी पाहतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशातील अत्यंत कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात; पण मोजकेच त्यात पास होतात. ज्या व्यक्तीला आयुष्यात आपली अनेक स्वप्ने पूर्ण करायची असतात ती व्यक्ती आयुष्यातील संकटे, अपयश, प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करतानाच आपल्या यशावरही लक्ष केंद्रित करते. भारतात असे अनेक यशस्वी लोक आहेत की, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठमोठ्या परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. आज आम्ही अशाच एका यशस्वी व्यक्तीच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगणार आहोत.
आयएएस अधिकारी गोविंद जयस्वाल हे मूळचे उत्तर प्रदेशातील वाराणसी असून, त्यांचे वडील रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यामुळे गोविंद यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती. गोविंद यांची आईदेखील खूप आजारी असायची. त्यांच्यावरील उपचारांसाठी भरपूर पैसे खर्च व्हायचे. त्यामुळे अनेकदा गोविंद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुकी भाकरी खाऊन दिवस काढले. गोविंद लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे लहानपणापासूनच गोविंद यांना अनेक अडचणींचा सामना करीत आपले शिक्षण पूर्ण करावे लागले. परंतु, त्यांच्या या संघर्षमय प्रवासाला त्यांच्या वडील आणि बहिणींची नेहमी साथ होती.
मित्राच्या वडिलांकडून अपमान
लहानपणी गोविंद त्यांच्या जवळच्या मित्राच्या घरी खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्या मित्राच्या वडिलांनी गोविंद यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारलं. गोविंद यांचे वडील रिक्षा चालवतात हे कळल्यावर मित्राच्या वडिलांनी गोविंदचा खूप अपमान केला. त्यावेळी त्यांनी ठरवले की,आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवायचे. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर त्यांनी आपल्या शिक्षकांना आयुष्य कसे बदलता येईल, असा प्रश्न विचारला. त्यावर शिक्षकांनी सांगितले की, एकतर काहीतरी मोठा उद्योग करून किंवा आयएएस अधिकारी बनून तू तुझं आयुष्य बदलू शकतोस. तेव्हापासून गोविंद यांनी आयएएस बनण्याचा निर्णय घेतला.
वडिलांनी केले पालनपोषण
आईच्या निधनानंतर गोविंद यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलांचे उत्तमरीत्या पालनपोषण केले. मुलांच्या शिक्षणात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. घरची वाईट परिस्थिती पाहून अनेक लोक गोविंद यांना रिक्षा चालव, असे टोमणे मारायचे. तसेच त्यांच्या बहिणींना दुसऱ्यांच्या घरी जाऊन भांडी घासण्याचे सल्ले द्यायचे; पण त्यांनी कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिले नाही.
पहिल्याच प्रयत्नात यश
आयएएस अधिकारी गोविंद जैस्वाल यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण उस्मानपुरा येथील सरकारी शाळेत केले आणि हरिश्चंद्र विद्यापीठातून पदवी घेतली. २००६ मध्ये गोविंद यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेले. त्यावेळी पायाला अनेक जखमा होऊनही उपचार न करता, त्यांचे वडील गोविंद यांना पैसे पाठविण्यासाठी रिक्षा चालवायचे आणि अनेकदा उपाशी पोटी दिवस काढायचे. दिल्लीला गेल्यानंतर गोविंद यांनी जास्त पैसा नसल्यामुळे कुठल्याही परीक्षेसाठी क्लासची मदत घेतली नाही. भरपूर अभ्यास करून त्यांनी २००७ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ४८ वा क्रमांक मिळवला.