Success Story: भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न असंख्य विद्यार्थी पाहतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशातील अत्यंत कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. ज्या व्यक्तीला आयुष्यात आपली अनेक स्वप्नं पूर्ण करायची असतात ती व्यक्ती आयुष्यातील संकटं, अपयश, प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करतानाच आपल्या यशावर लक्ष केंद्रित करते. भारतात असे अनेक यशस्वी लोक आहेत की, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठमोठ्या परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. आज आम्ही अशाच एका यशस्वी व्यक्तीच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगणार आहोत.

IAS निरीश राजपूत यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आणि खडतर आहे. निरीश हे मूळचे मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील रहिवासी असून एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे लहानपणापासूनच निरीश यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. निरीशचे वडील व्यापाराने शिंपी होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते ग्वाल्हेरला गेले आणि तिथे काम करत त्यांनी बीएस्सी आणि एमएससी पदवी मिळवली. शिक्षणासाठी पुरेसे पैसा मिळावे आणि शिक्षण सुरळीत पार पडावे यासाठी निरीश यांनी पेपर विकायला सुरुवात केली आणि अभ्यासाचा खर्च भागवला. आर्थिक अडथळे असतानाही त्यांनी शिक्षणात यश मिळवले.

असे मिळाले यूपीएससी परीक्षेत यश

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करत असताना निरीश यांची हुशारी पाहून त्यांच्या एका मित्राने त्यांना त्यांच्या संस्थेत प्राध्यापक पदाची ऑफर दिली. निरीश तिथे विद्यार्थ्यांना शिकवायचे, ही नोकरी त्यांनी दोन वर्षे केली. मात्र, दोन वर्षांनंतर त्यांच्या मित्राने निरीश यांचा विश्वासघात केला आणि त्यांना शिक्षक पदावरून काढून टाकले. नोकरी गेल्यानंतर निरीश खूप दुखावले गेले, त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी त्यांना त्यांच्या एका मित्राने अभ्यासाचे साहित्य दिले. दिल्लीला जाण्यासाठी त्यांनी कर्जदेखील घेतले.

हेही वाचा: Success Story : IIT पदवीधर, मेहनतीच्या जोरावर उभारली ६५ हजार कोटींची कंपनी; पण नव्या संधीसाठी दिला राजीनामा; जाणून घ्या राहुल जैमिनी यांचा प्रेरणादायी प्रवास

दिल्लीला गेल्यानंतर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी छोट्या नोकऱ्या केल्या, पण UPSC परीक्षेसाठी सतत अभ्यास केला. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे ते कोणत्याही संस्थांमध्ये गेले नाही. यावेळी त्यांना तीन वेळा अपयश आलं, पण चौथ्या प्रयत्नात UPSC CSE परीक्षेत त्यांनी ३७० वा क्रमांक मिळवला.

Story img Loader