Success Story: यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी जिद्द, चिकाटी खूप महत्त्वाची असते. आज आम्ही अशाच एका यशस्वी उद्योजकाचा प्रवास सांगणार आहोत. हे यश मिळवण्यापूर्वी त्याला अनेकवेळा अपयशाचा सामना करावा लागला. विक्रम पई असं या उद्योजकाचं नाव असून तो आता ReferRush या ई-कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफॉर्मचे संस्थापक आणि सीईओ आहे. हे एक असे व्यासपीठ आहे, जे व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांद्वारे नवीन ग्राहक मिळवण्यास मदत करते. हे एक रेफरल मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे, जे व्यवसायांना आणि त्यांच्या विद्यमान ग्राहकांना त्यांच्या उत्पादनांबद्दल किंवा सेवांबद्दल इतरांना सांगण्यास प्रोत्साहित करते. यासाठी ग्राहकांना कमिशन दिले जाते.

विक्रम पई हा बेंगळुरू येथील असून रेफरल नावाचा ई-कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफॉर्म सुरू करण्यापूर्वी त्याला भूतकाळात अपयश, आर्थिक अडचणी आणि आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला होता. सहा वर्षांत त्याचे पाच व्यवसाय अयशस्वी झाले, ज्यात दोन कोटी रुपयांचे नुकसानही झाले. सहा वर्षे लागोपाठ अपयश मिळूनही विक्रम पई याने आपले ध्येय सोडले नाही. या काळात एकदा त्याच्याकडे फक्त ४,००० रुपये शिल्लक होते, ज्यामुळे तो त्याच्या सह-संस्थापकाचा पगारही देऊ शकत नव्हता. अनेक लोकांनी त्याच्यावर एलॉन मस्क बनण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केले, त्याच्या शरीराच्या अर्ध्या भागाला अर्धांगवायू झाला. मित्रांनीही त्याला सोडले. पण, या आव्हानांसमोर विक्रमने हार मानली नाही.

मेहनतीचे मिळाले फळ

विक्रम पईच्या मेहनतीचे अखेर फळ मिळाले. झिरोदाचे सह-संस्थापक निखिल कामत यांच्या डब्ल्यूटीफंड ग्रँट इनिशिएटिव्हने त्यांच्या कंपनी रेफररशची निधीसाठी निवड केली. या अनुदानासाठी २,४०० हून अधिक स्टार्टअप्समधून त्यांच्या कंपनीची निवड करण्यात आली. सुरुवातीला, ReferRush ला पहिले एक लाख रुपये कमवण्यासाठी चार महिने लागले. पण, आता ते दररोज १.५ लाख रुपये कमवत आहेत आणि नफ्यात आहेत. कोणत्याही नवीन उद्योजकासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. रेफररश ही एक रेफरल मार्केटिंग कंपनी आहे. हे ई-कॉमर्स ब्रँडना त्यांच्या ग्राहकांकडून रेफरल मिळविण्यास मदत करते.

तरुण उद्योजकांसाठी प्रेरणा

विक्रमचा असा विश्वास आहे की, पहिली पाच वर्षे शिकण्यासाठी असतात. त्यांची कहाणी अपयशाची भीती बाळगणाऱ्या सर्व तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. यावरून हे सिद्ध होते की, सतत कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने काहीही शक्य आहे.

सोशल मीडियावर शेअर केली माहिती

विक्रमने नुकतीच सोशल मीडियावर त्याच्या यशाच्या प्रवासाबद्दल माहिती शेअर केली. एलॉन मस्क बनण्याचा प्रयत्न करताना लोक त्याला कसे म्हणतात याबद्दल तो बोलला. त्याने त्याच्या अर्धवट अर्धांगवायूचाही उल्लेख केला. सर्वात कठीण वेळ तेव्हा आली, जेव्हा त्याच्याकडे फक्त चार हजार रुपये शिल्लक होते, यामुळे तो त्याच्या सह-संस्थापकाला पगारही देऊ शकला नाही. त्याने त्याच्या सह-संस्थापकाला ३६,००० रुपये पाठवले त्यावेळचा स्क्रीनशॉटही शेअर केला.

विक्रमने लिहिले, ‘मला सांगण्यात आले की मी एलॉन मस्क बनण्याचा प्रयत्न करत आहे.’ माझ्या शरीराच्या अर्ध्या भागाला अर्धांगवायू झाला. माझ्या मित्रांनी माझ्याकडे पाठ फिरवली. पण, मी स्वतःवरचा विश्वास गमावला नाही. माझ्याकडे खाण्यासाठी अन्न होते, राहण्यासाठी घर होते आणि मला फक्त तेवढीच गरज होती.

Story img Loader