Success Story: आजपर्यंत आपण भारतातील यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा ऐकल्या आहेत. पण, आज आम्ही तुम्हाला अशा यशस्वी भारतीय जोडप्याबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी परदेशात जाऊन आपला व्यवसाय यशस्वी केला आहे. कर्नाटकातील रहिवासी असलेल्या एका दाम्पत्याने अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या मुलीसाठी एक व्यवसाय सुरू केला आणि आता ते दरमहा $१५,००० कमवतात. त्यांच्या या प्रवासावरून अनेकांना नवीन काहीतरी नककीच करण्याची प्ररेणा मिळेल.
मुलीच्या आनंदासाठी सुरू केलेला प्रयोग झाला यशस्वी
कर्नाटकातील बेंगळुरू येथील रहिवासी श्वेता राजू आणि त्यांचे पती व्यंकट राजू सध्या अमेरिकतील न्यूयॉर्क येथे राहतात. श्वेता सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांचे पती रियल इस्टेट क्षेत्रातील वकील आहेत. तसेच त्यांची एक सहा वर्षांची मुलगीदेखील आहे. या जोडप्याने २०२१ मध्ये त्यांची मुलगी महाती हिच्या आनंदासाठी फोर्ट ग्रीन पार्कजवळ लिंबू पाणी आणि मसाला डोसाचा स्टॉल सुरू केला. लोकांना त्यांचा चविष्ट डोसा खूप आवडू लागला, ज्यामुळे हे जोडपं खूप प्रसिद्ध झालं.
त्यावेळी श्वेता आणि व्यंकट घरून मसाला डोसा बनवून बरोबर घेऊन जायचे. पण, मागणी वाढल्याने, त्यांनी एका महिन्यानंतर पार्कमध्ये गॅस स्टोव्ह बसवला. त्यांनी तिथेच डोसे बनवायला सुरुवात केली, त्यामुळे डोश्याची मागणी आणखी वाढली. सप्टेंबर २०२१ पर्यंत, दर शनिवारी शेकडो ग्राहक रांगेत उभे राहू लागले. डोसे तयार होण्यासाठी ते तासनतास वाट पाहायचे. डोशाची किंमत १० डॉलर्स होती. राजू दाम्पत्याने याला एक संधी म्हणून पाहिले आणि आपले काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने आपले काम एका उद्यानातील स्टॉलपासून व्यावसायिक स्वयंपाकघरापर्यंत सुरू केले. आता ते तिथेच जेवण बनवतात.
श्वेता आणि व्यंकटसाठी हे खाद्यपदार्थ विकणे हा केवळ व्यवसाय नाही, तर भारताच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा हा एक मार्ग आहे. ते २०१६ मध्ये अमेरिकेत आले होते. त्यांना भारतीय जेवणाची खूप आठवण येत होती. अमेरिकेतील सर्व भारतीय रेस्टॉरंट्सची चव सारखीच असते.
सध्या त्यांचे पॉप-अप रेस्टॉरंट शनिवारी सकाळी १०:३० ते दुपारी २ पर्यंत उघडे असते. राजू दाम्पत्याला ब्रुकलिन करी प्रोजेक्टला पूर्णवेळ रेस्टॉरंट बनवायचे आहे. त्याने लोकांकडून पैसे गोळा करण्याची मोहीमही सुरू केली आहे.