Success Story: या जगात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगत असते. जगात प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. कोणाला वकील, डॉक्टर व्हायचे असते, तर कोणाला व्यावसायिक व्हायचे असते. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करत असतात. पण, या प्रयत्नांना अनेकदा हवं तसं यश मिळत नाही, त्यामुळे काही जण खचून जातात आणि ते स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट अर्धवट सोडून देतात. अनेक जण मिळालेल्या कामात जास्तीत जास्त मेहनत घेऊन यशाचे शिखर पार करतात. खरंतर मेहनत करणाऱ्या व्यक्तीसाठी कोणतंच काम लहान किंवा खूप मोठं नसतं. व्यक्तीचा प्रामाणिकपणा आणि मेहनतच त्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देते. आज आम्ही अशाच एका व्यावसायिकाबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केले आहे.

सध्या करोडपती असलेल्या या व्यावसायिकाने एकेकाळी १८ रुपयांच्या पगारावर भांडी धुण्याचे काम केले होते. जयराम बनन असे या व्यावसायिकाचे नाव असून त्यांच्या यशाचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. जयराम बनन हे मूळचे कर्नाटकातील उडपी येथील असून वयाच्या १३ व्या वर्षी ते शालेय परीक्षेमध्ये नापास झाले होते. ही गोष्ट आपल्या वडिलांना कशी सांगायची, यामुळे ते खूप घाबरले आणि परीक्षेचा निकाल वडिलांकडे घेऊन जाण्यापेक्षा घरी न जाण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडले. १९६७ मध्ये ते मुंबईला पोहोचले, त्यावेळी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम शोधले. त्यावेळी एका हॉटेलमध्ये त्यांना भांडी धुण्याची नोकरी मिळाली. तसेच या कामासाठी त्यांना महिन्याचा १८ रुपये पगार निश्चित करण्यात आला.

जयराम बनन यांनी भांडी धुण्याचे कामही खूप मेहनतीने आणि आवडीने केले. त्याच हॉटेलमध्ये त्यांना टेबल साफ करण्याचे काम मिळाले. पुढे त्यांना वेटरची जबाबदारी देण्यात आली. हळूहळू त्या हॉटेलमधील भांडी धुण्याच्या कामासाठी लागलेल्या जयराम यांच्या जबाबदाऱ्या बदलत गेल्या व १८ रुपये महिन्याच्या पगारावरून त्यांचा पगार २०० रुपये करण्यात आला; तसेच कालांतराने त्यांना हॉटेलचे व्यवस्थापक बनवण्यात आले.

पुढे जयराम मॅनेजर झाल्यानंतर हॉटेल व्यवसायातील अनुभव मिळाल्यावर ते १९७४ मध्ये मुंबईहून दिल्लीला गेले आणि दिल्लीतील गाझियाबाद येथे सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये त्यांनी २००० रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर १९८६ मध्ये दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनी भागात ‘सागर’ नावाचे पहिले हॉटेल सुरू केले.

हेही वाचा: Success Story : वयाच्या ६० व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात; १५ कोटींचा तोटा सोसूनही न खचता २१०० कोटींच्या कंपनीची उभारणी

चार वर्षांनंतर दिल्लीत ‘सागर रतन’ नावाने दुसरे हॉटेल सुरू केले. हळूहळू त्यांच्या यशाची घोडदौड सुरू झाली. त्यांच्या हॉटेलमध्ये दक्षिणे भारतातील चविष्ट पदार्थ मिळायचे त्यांना “उत्तरेचा डोसा किंग” अशी उपाधी मिळाली. रिपोर्ट्सनुसार, जयराम बनन यांची जगभरात ‘सागर रतन’ नावाने जवळपास १०० हून अधिक हॉटेल आहेत. त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे ३०० कोटी रुपये आहे.