Success Story : भारतामध्ये असे अनेक तरुण आहेत, ज्यांनी कमी वयात स्वकर्तृत्वावर मोठमोठे व्यवसाय, उद्योग उभे केले आहेत. आज आम्ही अशाच एका यशस्वी तरुणाचा प्रेरणादायी प्रवास तुमच्यासमोर मांडणार आहेत. गुजरातचे रहिवासी असलेले जीत शाह यांनी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने ते आज कोट्यवधीची कमाई करीत आहेत. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात ते स्विगी आणि उबर ईट्ससाठी फूड डिलिव्हरीचे काम करायचे. कोरोना महामारीच्या काळात सगळे बंद असताना जीत यांनी डिजिटल मार्केटिंग शिकण्याचा निर्णय घेतला. या एका निर्णयाने त्यांचे नशीब बदलले. त्यानंतर त्यांनी ‘सिम्पेक्स स्कूल प्रायव्हेट लिमिटेड’ या त्यांच्या कंपनीची पायाभरणी केली. त्याद्वारे त्यांनी डिजिटल मार्केटिंगच्या आयडिया शिकविण्यास सुरुवात केली. जीत शहा यांच्या यशाच्या प्रवासाबद्दल येथे जाणून घेऊ.
जीत शहा यांची कहाणी आपल्याला दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाने यश कसे मिळवता येते ते पाहण्याची प्रेरणा देते. ३ जून १९९९ रोजी गुजरातमधील सुरेंद्रनगर येथे जन्मलेले जीत महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अर्धवेळ नोकरीही करत होते. ते सकाळी महाविद्यालयात जायचे, दुपारी अर्धवेळ नोकरी करायचे आणि रात्री त्यांच्या करिअरचे नियोजन करायचे.
जीत यांनी २०२१ मध्ये अहमदाबादच्या एलडी अभियांत्रिकी महाविद्यालयामधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयाच्या काळात स्विगी आणि उबर ईट्ससाठी त्यांनी फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले. सकाळचे महाविद्यालय आणि दुपारची नोकरी यांमध्ये मार्ग काढत त्यांनी डिजिटल मार्केटिंगमध्ये पाऊल ठेवले. जीत शहा यांचा डिजिटल मार्केटिंगमधील प्रवेशदेखील खूप मनोरंजक आहे. खरं तर २०२० मध्ये कोरोना साथीच्या काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे जीत यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा आला. त्यांना फूड डिलिव्हरीची नोकरी सोडावी लागली. पण, त्यांनी हार न मानता. डिजिटल मार्केटिंग शिकायचे ठरवले आणि त्यात प्रभुत्व मिळवले. या नवीन कौशल्यामुळे त्यांना चांगली नोकरी मिळाली, ज्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला एक नवीन दिशा मिळाली.
सिम्पेक्स स्कूल्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना
२०२१ मध्ये जीत शाह यांनी सिम्पेक्स स्कूल्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. ही संस्था लहान व्यवसाय आणि उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग शिकण्यास मदत करते. अवघ्या १८ महिन्यांत त्यांच्या कंपनीने एक लाखाहून अधिक विद्यार्थी, उद्योजक व तरुण व्यावसायिकांना डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले आहे. जीत फेसबुक जाहिराती, विक्री फनेल, वेब डेव्हलपमेंट व लीड जनरेशन यांसारख्या क्षेत्रात त्यांच्या कौशल्याचा वापर करून, लोकांना त्यांचे ब्रँड तयार करण्यास आणि वाढविण्यास मदत करतात.
जीत हे केवळ एक यशस्वी उद्योजकच नाहीत, तर एक सुप्रसिद्ध YouTuber देखील आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनेलद्वारे, ते व्यवसाय, व्यक्तिमत्त्व विकास व डिजिटल मार्केटिंगबद्दलचे त्यांचे अनुभव शेअर करतात. २०२१ मध्ये त्यांनी ‘कोचिंग किंग’ नावाचे एक पुस्तकही लिहिले. हे पुस्तक त्यांचे कौशल्य आणि इतरांना मार्गदर्शन करण्याची त्यांची आवड प्रतिबिंबित करते. आज जीत शाह करोडो रुपये कमवत आहेत. त्यांची यशोगाथा मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.