Success Story: प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगत असतो. जगात प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. काही जण त्यांना आवडणाऱ्या गोष्टीतून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. हे स्वप्न खरे करण्यासाठी ते दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करतात. आज आम्ही अशाच एका यशस्वी व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत, ज्यांनी गरिबीतून केवळ मेहनतीच्या जोरावर आपला व्यवसाय उभा केला आहे.
खरं तर आपल्या देशात पशुपालन हा शेतकऱ्यांच्या समृद्धीचा आधार राहिला आहे. आताचा काळ जरी बदलला असला तरीही अनेक जण पुन्हा नव्याने जुन्या पारंपरिक व्यवसायांकडे पाहत आहेत. रमेश रुपारेलिया हे त्यांपैकीच एक आहेत, जे एकेकाळी केवळ ८० रुपये कमवत होते, ते आता वर्षाला आठ कोटी रुपये कमावतात.
गुजरातमधील एका छोट्या गावात राहणारे रमेश रुपारेलिया यांना लहानपणापासूनच आयुष्यात अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला, त्यामुळे त्यांचे शिक्षण सातवीपर्यंतच झाले. रमेश यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. तसेच त्यांचं गाईंवरही खूप प्रेम होतं. २०१० मध्ये त्यांनी शेती करायचा निर्णय घेतला, पण रमेश यांच्याकडे स्वतःची जमीनही नव्हती. गोंडल येथील एका जैन कुटुंबाकडून त्यांनी जमीन भाड्याने घेतली होती. त्यांनी शेतीत रसायनांचा वापर केला नाही. त्यांनी केवळ गाईच्या शेणाचे खत म्हणून वापर केला. शेतीमध्ये रमेश यांना लाखो रुपयांचा फायदा झाला.
गाईंसाठी उभी केली गोशाळा
शेतीतून नफा झाल्यानंतर रमेश यांनी स्वतःची चार एकर जमीन खरेदी केली आणि शेतीसह गाई पालन व्यवसाय सुरू केला. शेतीमध्ये त्यांनी वैदिक गाई पालन आणि गाईंवर आधारित शेतीचा वापर केला. आज ते ‘श्री गिर गौ कृषी जतन संस्था’ नावाने स्वतःचा गोठा चालवतात. गीर गाईच्या दुधापासून बनवलेले सेंद्रिय तूप विकून ते करोडो रुपये कमावतात.
आज त्यांच्याकडे २५० हून अधिक गीर गाई आहेत. त्यांचा गोठा पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. येथे उत्पादित होणारे दूध, ताक, लोणी आणि तुपालाही खूप मागणी आहे. छोट्या प्रमाणावर सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आज १२३ देशांमध्ये पसरला आहे. रमेश यांनी त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देऊन त्यांची उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणली आणि त्यांनी आवश्यक प्रमाणपत्रे आणि परवाने मिळवले. ते वर्षाला सुमारे आठ कोटी रुपये कमावतात.