Success Story: अनेकदा मित्र आपलं आयुष्य घडवतात, तर अनेकदा काही मित्रांमुळे आयुष्यात अनेक वाईट गोष्टी होतात. त्यामुळे संगत नेहमी चांगल्या मित्रांची करावी असं म्हटलं जातं. अशाच बालपणीच्या चार मित्रांचा यशस्वी प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. या चौघांनी एकत्र येऊन एक व्यवसाय सुरू केला, ज्यात ते लाखो रूपये कमावतात.
भारतातील अनेक सुंदर पर्यटन स्थानांपैकी केरळदेखील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. पण, आता केरळमधील कोझिकोड जिल्हा खास हलव्यासाठीही ओळखला जाऊ लागला आहे. बालपणीच्या चार मित्रांनी एकत्र येऊन एक स्टार्टअप सुरू केला आणि हा हलवा जगभरात पोहोचवला. आज या चारही मित्रांचा व्यवसाय झपाट्याने वाढत असून हा कोझिकोड हलवा विकून ते लाखो रुपये कमवत आहेत. या स्टार्टअपचे नाव फुलवा असे आहे.
या स्टार्टअपची सुरुवात करणाऱ्या बालपणीच्या चार मित्रांची नावं शाबास अहमद एनसी, सानू मोहम्मद सी, इरफान सफर एस आणि थेसरीफ अली पीके अशी आहेत. त्या चौघांनाही हा हलवा खूप आवडतो. या हलव्यावरील प्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी हा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज त्याच हलव्याचे २४ प्रकार आहेत आणि ते बॉक्समध्ये पॅक करून जगातील अनेक देशांना पुरवले जातात.
अशी झाली व्यवसायाची सुरुवात
हा हलवा मैदा, लोणी, दूध आणि साखरेपासून तयार केला जातो. केरळमध्ये या चौघांचा हा हलवा खूप प्रसिद्ध आहे. हा हलवा अनेक रंगांमध्ये तयार केला जातो. केरळच्या बाहेर राहणाऱ्या लोकांपर्यंत हा हलवा पोहोचवण्यासाठी या चौघांनी हा व्यवसाय सुरू केला. कारण केरळमधील लोक जगातील अनेक देशांमध्ये राहतात. त्यांनी ‘फुलवा’ नावाचा स्टार्टअप सुरू केला आणि हा हलवा बनवून विकायला सुरुवात केली.
एका वर्षात कमावले ८४ लाख रुपये
फुलवा स्टार्टअपची सुरुवात २०२३ मध्ये झाली असून या व्यवसायात त्यांनी जवळपास ८४ लाख रुपयांची कमाई केली आहे. फुलवा पारंपरिक चवीच्या हलव्यापासून सुके खोबरे, टरबूज इत्यादींपर्यंत विविध प्रकारचे हलवे तयार करते.
हेही वाचा: Success Story : MBA पदवीधर व्यक्तीने नोकरी सोडून सुरू केली स्वतःची कंपनी; दरमहा करोडोंची कमाई
फुलवा हा हलवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून हा हलवा देशात आणि जगभरात पाठवला जातो. त्यांचे ग्राहक युके, तुर्की, जर्मनी आणि युएईमध्ये आहेत. त्यांना पहिल्या महिन्यातच ३०० हून अधिक ऑर्डर मिळाल्या होत्या. आता त्यांचा व्यवसाय अधिक पारंपरिक केरळ चिप्ससारखे स्नॅक्स बनवण्याचा विचार करत आहेत.