Success Story: स्वप्न साकारण्याची जिद्द ही नेहमी वयापेक्षा मोठी ठरते. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगण्याचा प्रयत्न करते. परंतु, प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. कोणाला डॉक्टर व्हायचे असते, कोणाला व्यावसायिक, तर कोणाला आणखी काही. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करीत असतात. पण, या प्रयत्नांना अनेकदा हवे तसे यश मिळत नाही. मग त्यामुळे काही जण खचून जातात आणि ते स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट अर्धवट सोडून देतात; तर काही जण थोड्या मिळालेल्या यशातही समाधानी होतात. पण, असेदेखील काही लोक असतात की, जे संकटाला तोंड देत पुन्हा नवी सुरुवात करून आपल्याला हवी ती गोष्ट मिळविण्यासाठी खूप मेहनत घेतात. आज आम्ही अशाच एका व्यावसायिकाबद्दल सांगणार आहोत.
या व्यक्तीने वयाच्या ६० व्या वर्षी स्वतःची कंपनी सुरू केली असून त्यांचे नाव कृष्णदास पॉल आहे. कृष्णदास पॉल वयाच्या ६० व्या वर्षी SAJ फूड सुरू केले.
कृष्णदास पॉल यांची योजना साखरमुक्त बिस्किटे बनवण्याची होती. यासाठी त्यांनी २००० मध्ये बिस्क फार्म सुरू केले. स्थापनेनंतर काही वर्षांनी, २००४ मध्ये, त्यांच्या कंपनीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यावेळी त्यांना १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. यानंतर, कृष्णदास पॉल यांनी आपले लक्ष पूर्व भारताकडे वळवले. त्यांनी बिस्किटांचे सात नवीन प्रकार तयार केले. त्यांचा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यांचे उत्पादन पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि ओडिशामध्ये खूप लोकप्रिय झाले.
कृष्णदास पॉल यांचे कोरोनामध्ये झाले निधन
कृष्णदास पॉल यांचे दुर्दैवाने २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या लाटेत निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा अर्पण पॉल यांनी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि ते त्यांच्या वडिलांचे स्वप्न साकार करत आहेत. एसएजे फूडने २०२३ च्या आर्थिक वर्षाचा शेवट २१०० कोटी रुपयांच्या उलाढालीसह केला. या कामगिरीमुळे देशभरातील बिस्किट उद्योगात एक प्रमुख उद्योजक म्हणून त्यांचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.
१९७४ मध्ये त्यांनी काम सुरू केले
जेव्हा कुटुंबाचा व्यवसाय पाच भावांमध्ये विभागला गेला तेव्हा कृष्णदास पॉल यांनी १९७४ मध्ये अपर्णा एजन्सी ही स्वतःची कंपनी स्थापन केली. त्यांनी नेस्ले, डाबर आणि रेकिट अँड कोलमनसाठी उत्पादने वितरित करण्यास सुरुवात केली. यानंतर, २००० मध्ये त्यांनी बिस्क फार्मची स्थापना केली. बिस्क फार्म आता पाच कारखाने चालवते आणि ब्रिटानियानंतर पूर्वेकडील दुसऱ्या क्रमांकाचा बिस्किट ब्रँड आहे.