Success Story: स्वप्न साकारण्याची जिद्द ही नेहमी वयापेक्षा मोठी ठरते. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची स्वप्नं वेगवेगळी असतात. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करीत असतात. काही जण असे असतात, ज्यांना लहान वयातच खूप यश मिळते. पण, असेही काही लोक असतात ज्यांना आयुष्यात खूप उशिरा यश मिळते. आयुष्यभर कष्ट करून ते हे यश मिळवतात. उतार वयात कष्ट करण्यासाठी ते आपल्या वयाचीदेखील पर्वा करत नाहीत. आज आम्ही अशाच एका व्यावसायिकाबद्दल सांगणार आहोत की, जे वयाच्या ९३ व्या वर्षी अब्जाधीश झाले आहेत.
या व्यावसायिकाचे नाव लक्ष्मण दास मित्तल असून यांच्या यशाचा प्रवास इतरांप्रमाणेच प्रेरणादायी आहे. लक्ष्मण दास हे सोनालिका ट्रॅक्टर्सचे संस्थापक आहेत. एकेकाळी ते LIC एजंट होते. त्यांनी आयुष्यभर त्यांच्या पगारातून एक एक पैसा वाचवून निवृत्तीच्या वयात स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज सोनालिका ट्रॅक्टर्सचे नाव देशातील टॉप ट्रॅक्टर ब्रँड्समध्ये सामील झाले आहे; शिवाय ते देशातील सर्वात वृद्ध अब्जाधीश आहेत.
लक्ष्मण दास मित्तल हे सोनालिका ग्रुप आणि सोनालिका ट्रॅक्टर्सचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म ५ ऑगस्ट १९३१ रोजी पंजाबमधील होशियारपूर येथे झाला. त्यांचे वडील हुकूमचंद हे स्थानिक बाजारपेठेत धान्याचे व्यापारी होते, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सामान्य होती. त्या काळी त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर लक्ष्मण दास यांनी १९५५ मध्ये LIC एजंट म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात केली.
मात्र, लक्ष्मण दास यांच्या मनात नेहमी व्यवसाय करण्याची इच्छा होती. पण, व्यवसायाला लागणारे पुरेसे भांडवल त्यांच्याकडे नव्हते, शिवाय घराची जबाबदारीदेखील होती. परंतु, आयुष्यात ही इच्छा कधीतरी पूर्ण करू या विचाराने त्यांनी एलआयसी एजंट म्हणून काम करत असताना आपल्या पगारातील पैसे वाचवले. याच वाचवलेल्या पैशांतून त्यांनी १९६२ मध्ये थ्रेशर मशीन बनवण्यास सुरुवात केली, पण त्यांना यात यश मिळाले नाही. त्यावेळी त्यांना व्यवसायात मोठं अपयश आलं.
सोनालिका ट्रॅक्टर्सची सुरुवात
आलेल्या अपयशासमोर न हारता १९९६ मध्ये लक्ष्मण दास मित्तल यांनी आपली सर्व बचत वापरून सोनालिका ट्रॅक्टर्सची सुरुवात केली. सोनालिका ट्रॅक्टर पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची पसंती आहे. तसेच ही कंपनी १२० हून अधिक देशांमध्ये ट्रॅक्टर निर्यात करते. सोनालिका ग्रुपचे पाच वेगवेगळ्या देशांमध्ये पाच प्लांट आहेत. लक्ष्मण दास मित्तल हे भारतातील दुसरे सर्वात वृद्ध अब्जाधीश आहेत. शिवाय फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा समावेश होता. त्यांची एकूण संपत्ती सुमारे $२.५ अब्ज आहे. आज सोनालिका समूहाची एकूण संपत्ती २३ हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे.