Success Story: स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करीत असतात. पण, या प्रयत्नांना अनेकदा हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे काही जण खचून जाऊन, स्वप्नपूर्तीकडे नेणारी वाट अर्धवट सोडून देतात; तर काही जणांना सहजपणे भरपूर यश मिळते. पण, मिळालेल्या यशावर समाधानी होऊन थांबून न राहता, ते यश आणखी दुप्पट कसे करता येईल याकडे त्यांचे लक्ष असते. आज आम्ही अशाच एका व्यावसायिकाबद्दल सांगणार आहोत; ज्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इन्फोसिससारख्या मोठ्या आयटी कंपनीतील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता.
बिराजा राऊत हे बेंगळुरूचे रहिवासी असून, व्यवसाय सुरू करण्याआधी हे इन्फोसिससारख्या मोठ्या आयटी कंपनीत काम करायचे. परंतु, एकदा ते बर्गर खायला गेले असताना तिथे त्यांना खूप चविष्ट बर्गर खायला मिळाला आणि त्याच वेळी त्यांच्या डोक्यात नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पनेची विचारचक्रे फिरू लागली. त्यावेळी बर्गर हा फक्त नाश्ता नसून, तो पूर्ण जेवण असू शकतो हे त्यांच्या लक्षात आले.
वीस हजारांनी व्यवसायास प्रारंभ
व्यवसायाची कल्पना डोक्यात आली तेव्हा राऊत यांच्याकडे केवळ २०,००० रुपये होते. पण, त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या संकल्पनेवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी मागचा-पुढचा विचार न करता, इन्फोसिसमधील नोकरी सोडली. त्यांनी व्यवसायासाठी रात्रंदिवस मेहनत केली आणि २०११ मध्ये ‘बिगीज बर्गर’ सुरू केले. त्यांना स्थानिक चवीनुसार असलेला एक स्वदेशी क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) ब्रॅण्ड तयार करायचा होता. राऊत यांनी सुरुवातीला यूट्यूबवरून बर्गर कसा बनवायचा हे शिकून घेतले आणि बेंगळुरूमध्ये फक्त २० हजार रुपयांमध्ये एक छोटासा स्टॉल उघडला. हळूहळू त्यांचे ‘बिगीज बर्गर’ खूप प्रसिद्ध झाले. अनेक लोक बर्गर खाण्यासाठी गर्दी करु लागले. हळूहळू त्यांच्या किऑस्कचे दुकानात रूपांतर झाले.
छोट्या स्टॉलचे १०० कोटींच्या कंपनीत रूपांतर
फक्त २० हजार रुपयांमध्ये सुरू केलेल्या एका छोट्याशा स्टॉलचे रूपांतर आज बिगीज बर्गर या सुमारे १०० कोटी रुपयांच्या कंपनीत झाले आहे. बिराजा यांच्या मेहनत आणि चिकाटीमुळे ‘बिगीज बर्गर’ अनेक शहरे आणि राज्यांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
बिराजा राऊत यांचा हा बर्गर आज भारतातील सर्वांत मोठ्या व प्रसिद्ध देशी बर्गर ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. २०२३ मध्ये त्यांची कमाई १०० कोटी रुपये होती. बिराजा यांचे पुढील ध्येय लहान शहरांमध्ये ‘बिगीज बर्गर’ उघडणे हे आहे. तसेच त्यांना कंपनीला ५०० कोटींच्या उलाढालीपर्यंत न्यायचे आहे. सध्या ‘बिगीज बर्गर’ची २८ शहरे आणि १४ राज्यांमध्ये १३० स्टोअर्स आहेत.