Success Story: भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न असंख्य विद्यार्थी पाहतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी ही परीक्षा देशातील अत्यंत कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात; पण मोजकेच जण त्यात पास होतात. ज्या व्यक्तीला आयुष्यात ज्या व्यक्तीला अनेक स्वप्ने पूर्ण करायची असतात, ती व्यक्ती आयुष्यातील संकटे, अपयश, प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करतानाच आपल्या यशावरही लक्ष केंद्रित करते. भारतात असे अनेक यशस्वी लोक आहेत की, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठमोठ्या परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. आज आम्ही अशाच एका यशस्वी व्यक्तीच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगणार आहोत.

उत्तर प्रदेशातील दलपतपूर या गावात राहणाऱ्या वीर प्रताप सिंह राघव यांचा यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासंबंधीचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी अनेक आव्हानांना तोंड देत यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं. त्यांचा हा प्रवास यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. वीर प्रताप सिंह राघव यांचे प्राथमिक शिक्षण करोरा येथील आर्य समाज शाळेत झाले. तसेच सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण शिकारपूर येथील सरस्वती विद्या मंदिर येथे पूर्ण झाले. यावेळी शाळेत जाण्यासाठी ते घरापासून १० किलोमीटर दूर पायी चालत जायचे.

हेही वाचा: Success Story : २५० रुपये पगाराच्या नोकरीपासून ते फॅशन प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

शिक्षणासाठी घेतले कर्ज

वीर प्रतापला शिक्षणासाठी पैशांची गरज होती. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी व्याजावर पैसे घेतले होते. वीर प्रताप सिंह यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. अभियंता म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या वीर प्रताप यांनी प्राथमिक परीक्षेत तत्त्वज्ञानात दुसरा क्रमांक पटकावला. त्यांनी तत्त्वज्ञानात ५०० पैकी ३०६ गुण मिळवले होते. तसेच त्यानंतर यूपीएससी परीक्षेत २०१६ व २०१७ मध्ये दोन परीक्षांमध्ये वीर प्रताप यांना अपयश मिळाले होते; पण त्यांनी हार न मानता, सातत्याने मेहनत करून २०१९ च्या यूपीएससी परीक्षेत ९२ वा क्रमांक पटकावला.