Success Story: अनेक जण स्वतःचा व्यवसाय करण्याचे स्वप्न पाहतात आणि ते पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर भरपूर मेहनत घेतात. पण असेदेखील अनेक जण असतात; ज्यांना नाइलाजाने केवळ स्वतःचा आणि कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीच्या जागी व्यवसाय करावा लागतो. २०२० साली आलेल्या कोरोना महामारीच्या काळात जगावर आर्थिक संकट उदभवले होते; ज्यात अनेकांनी आपली नोकरी गमावली. नोकरी गमावलेल्यांपैकी बऱ्याच व्यक्तींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज आम्ही अशाच एका यशस्वी उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला सांगणार आहोत; ज्याने कोरोना काळात आपली नोकरी गमावली आणि नाइलाजाने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पण, त्याचा हा निर्णय आज त्याच्यासाठी एक वरदान ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या यशस्वी उद्योजकाचे नाव मोहब्बत दीप सिंग चीमा असून, कोरोना काळात नोकरी गेल्यावर ते त्यांचे मूळ राज्य पंजाबमध्ये परतले आणि घर चालविण्यासाठी ढिलवानमध्ये स्वतःचा फूड ट्रक ‘द पिझ्झा फॅक्टरी’ सुरू केली.

असा सुरू झाला यशाचा प्रवास

खरे तर, मोहब्बत दीप सिंग चीमा यांना अडीच लाख रुपये पगाराची नोकरी होती. पण, अचानक नोकरी गमावल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे ते पुन्हा आपल्या मूळ गावी परतले आणि तिथे त्यांनी ‘द पिझ्झा फॅक्टरी’ सुरू केली. सुरुवातीला त्यांनी चार लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून ‘द पिझ्झा फॅक्टरी’ सुरू केली. सुरुवातीचे महिने त्यांच्यासाठी खूप कठीण गेले. कारण- लोक त्यांची चेष्टा करायचे. कारण- पंजाबमध्ये बहुतेकांना समोसे आणि पकोडे खाण्याची सवय होती. त्यामुळे अशा ठिकाणी नवीन खाद्यपदार्थ खाण्याकडे लोकांचा कल नव्हता.

मग चीमा यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या मेन्यूची किंमत १९९ रुपये ठेवली. या किमतीत तुम्ही कितीही पिझ्झा, बर्गर व फ्राईजचा आनंद घेऊ शकता, अशी स्पेशल ऑफर त्यांनी ग्राहकांसाठी ठेवली. त्यानंतर हळूहळू लोक त्यांच्या पदार्थांचा आस्वाद घेऊ लागले. आता दीप महिन्याला जवळपास दोन लाख रुपये कमावतात. खरे तर दीप यांना लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड होती आणि त्यांना हॉटेल मॅनेजमेंट करायचे होते. पण, परिस्थितीमुळे त्यांनी दुसरे करिअर निवडले होते.

दीप यांचे हे स्वप्न ‘द पिझ्झा फॅक्टरी’मुळे पुन्हा साकार झाले. आज दीप यांनी अनेकांना ढिलवानमध्ये फूड ट्रक उघडण्यासाठी प्रेरित केले आहे. तसेच गोरखपूरहून लोक त्यांच्याकडे फूड ट्रक व्यवसायाबद्दल सल्ला घेण्यासाठी येतात. ढिलवान जंक्शन आता ‘पिझ्झा-बर्गर जंक्शन’ म्हणून ओळखले जाते.