Success Story: आयुष्यात काहीतरी वेगळे करून दाखविण्याचे कौशल्य ज्या व्यक्तींमध्ये असते, त्या व्यक्ती वामनराव पै यांच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या संदेशाप्रमाणे स्वतःला घडवीत जाऊन, यशाच्या पायऱ्या गाठत आपल्यातील वेगळेपण जगाला दाखवून देतात. भारतात असे अनेक उद्योजक, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील लोक आहेत, ज्यांनी आयुष्यातील कठीण परिस्थितीवर मात करून, स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. आज आम्ही अशाच एका यशस्वी व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास आपल्यासमोर मांडणार आहोत.
डॉ. मानव आहुजा हे नाव आपल्यापैकी अनेकांनी आजवर अनेकदा ऐकले असेल. कारण- त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. डॉ. मानव आहुजा हे एकेकाळी दिल्लीच्या गल्लीबोळात वाढले. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण डॉ. राधाकृष्णन इंटरनॅशनल स्कूल आणि खालसा स्कूलमधून घेतले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून बी.कॉम. करणाऱ्या मानव यांचा व्यवसाय व्यवस्थापनाकडे कल होता. त्यामुळे त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईतून मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीए केले. त्यानंतर मानव नोकरीच्या शोधात दुबईला गेले. तिथे त्यांना स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेत सेल्स एक्झिक्युटिव्हची नोकरी मिळाली.
कठीण संकटातून वाटचाल
मानव यांनी नामांकित बँकेत नोकरी मिळवली; परंतु त्यांचा प्रवास त्यांच्यासाठी तितकासा सोपा नव्हता. दुबई हे त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन ठिकाण होते. त्यामुळे तिथे त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. या सर्व अडचणींमध्येही त्यांनी स्वत:ला सिद्ध करायचे ठरवले. या काळात त्यांना व्यवसायातील गुंतागुंत समजली. एका मुलाखतीत मानव यांनी सांगितले होते की, दुबईत एक वेळ अशी आली की, ते आजारी पडले आणि त्यांच्याकडे औषधांसाठीही पैसे नव्हते. त्यावेळी त्यांच्या रूममेटने त्यांना मदत केली.
बिझनेस गुरू म्हणून झाले प्रसिद्ध
कालांतराने मानव यांनी नोकरी सोडून स्वतःचा मार्ग निवडला. अनुभव आणि दुसऱ्याला शिकवण्याची हातोटी यांच्या जोरावर त्यांनी लोकांना व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘टीपीईजी इंटरनॅशनल एलएलसी’ची स्थापना केली, जी कंपनी स्वतःचा व्यवसाय किंवा व्यापार सुरू करू इच्छिणाऱ्या सर्व तरुणांना मार्ग दाखविते. त्यांची कंपनी जगभरातील अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. सध्याच्या घडीला ते इंटरनॅशनल बिझनेस गुरू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहेत.