Success Story: प्रत्येक जण पदवी मिळविल्यानंतर चांगली नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतो; परंतु बहुतांश तरुणांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागतोच. कधी कधी नोकरी मिळाली तरी चांगला पगार मिळत नाही; तर कधी कधी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून नाकारले जाते. अशा
परिस्थितीत अनेक जण खचून जातात. परंतु, जेव्हा एखादा काहीतरी करण्याची जिद्द दाखवून, ठरविलेल्या दिशेने प्रयत्नांची कास कायम ठेवतो, तेव्हा तो त्याचे ध्येय निश्चितपणे साध्य करतो. आज आम्ही अशाच एका तरुणाचा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला सांगणार आहोत.

या तरुणाला नोकरीसाठी एकदा-दोनदा नाही, तर तब्बल ५० वेळा नकाराचा सामना करावा लागला. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे त्यानंतरही त्याने हार मानली नाही आणि स्वतःचा मार्ग यशोदायी स्वतः तयार केला.

या प्रेरणादायी यशस्वी तरुणाचे नाव जॉयदीप दत्ता, असे आहे. जॉयदीप हा पश्चिम बंगालमधील मानबाजार या लहान खेडेगावातील रहिवासी आहे. त्याचे वडील कृष्णचरण दत्ता आणि आई मीरा दत्ता यांनी त्यांच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. जॉयदीपने २०११ मध्ये बीसीए केले आणि २०१४ मध्ये एमसीए पूर्ण केले. त्यानंतर तो नोकरीच्या शोधार्थ बाहेर पडला. त्यासाठी त्याने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या; पण सर्वत्र त्याला नकारघंटाच ऐकायला मिळाली. एकदा-दोनदा नव्हे, तर एकूण ५० वेळा त्याला नोकरीच्या मुलाखतींमध्ये नाकारले गेल्याने माघारी परतावे लागले.

या काळात जॉयदीप दत्ताला जाणवले की, पदवी असणे हेच सर्वस्व नाही; उलट जर तुमच्याकडे योग्य कौशल्ये नसतील, तर नोकरी मिळविणे खूप कठीण आहे. जॉयदीपने एका मोठ्या कंपनीच्या कॅम्पस टेस्टमध्ये ९० टक्के गुण मिळवले होते; परंतु संवादकौशल्याच्या अभावामुळे त्याला नाकारण्यात आले.

५० वेळा नकारांतून मिळाली स्वव्यवसायाची प्रेरणा

वारंवार नोकरीसाठी नाकारल्यानंतर जॉयदीप दत्ताने स्वतःचे काहीतरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मग जॉयदीप डिजिटल मार्केटिंग शिकला आणि त्यानंतर २०१९ मध्ये त्याने ‘अ‍ॅफनॉयस इंडिया’ची स्थापना केली. त्याचा व्यवसाय चांगला चालला होता; पण त्याच काळात लॉकडाऊन सुरू झाल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आणि त्याचा व्यवसाय ठप्प झाला. कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही त्याला कर्ज घ्यावे लागले; पण त्याने हार मानली नाही आणि नवीन कौशल्यांद्वारे स्वतःला अद्ययावत केले. डिजिटल मार्केटिंगसह तो ई-कॉमर्स आणि ब्रँडिंग शिकला. आता त्याची कंपनी डिजिटल मार्केटिंग, ब्रँड मॅनेजमेंट ते इन्फ्लुएन्सर मॅनेजमेंट अशा क्षेत्रांत काम करते आहे. त्याने त्याच्यासारख्या अनेक तरुणांना रोजगार दिला असून, नोकरीसाठी सतत नकार मिळणाऱ्यांसाठी त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.