Success Story : आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते. पण, फार कमी लोक आपल्या या इच्छा पूर्ण करतात. कारण यासाठी जिद्द, एकाग्रता आणि मेहनतही तितकीच महत्त्वाची आहे. आज आम्ही अशाच एका उद्योजकाच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगणार आहोत.

युनिकॉर्न ‘अपना’चे संस्थापक आणि सीईओ निर्मित पारेख यांचा प्रवास भारतातील अनेक तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या निर्मित यांनी आज आपल्या प्रतिभा, मेहनतीच्या जोरावर नऊ हजार कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. पण, या मेहनतीसोबतच त्यांनी मोठी रिस्कही घेतली. ॲपलमधील नोकरी सोडून निर्मित यांनी स्वत:चे स्टार्टअप सुरू केले. त्यावेळी अनेकांना त्यांचा हा निर्णय चुकीचा वाटला. पण, त्यांनी आपल्या मेहनतीने सर्वांचे विचार चुकीचे सिद्ध केले.

लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड

मुंबईतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या निर्मित यांना लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड होती. त्यांनी वयाच्या ७ व्या वर्षी डिजिटल घड्याळ बनवले होते, तर वयाच्या १३ व्या वर्षी रोबोटिक्स प्रोग्रामिंगमध्ये प्रभुत्व मिळवले होते. त्यांनी गुजरातच्या निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी ‘इनकॉन टेक्नॉलॉजीज’ ही पूर व्यवस्थापन उपाय विकसित करणारी कंपनी सुरू केली. मात्र, ही कंपनी फारशी यशस्वी होऊ शकली नाही आणि कालांतराने ती बंद पडली. ही कंपनी बंद झाल्यानंतर निर्मित यांनी आपले स्टार्टअप इंटेलला विकले. त्यानंतर इंटेलमध्ये डेटा ॲनालिटिक्सचे संचालक म्हणून काम केले. या काळात त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले आणि त्यानंतर ते ॲपलमध्ये रुजू झाले.

हेही वाचा: Success Story: पाच लाखांच्या गुंतवणुकीतून सुरू केला व्यवसाय अन् मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल सात हजार करोड

निर्मित पारेख यांनी ब्लू कॉलर कामगार आणि नियोक्ते यांच्यातील दरी कमी करण्यासाठी ‘अपना’ प्लॅटफॉर्म लॉन्च केला. हे प्लॅटफॉर्म करोना काळाच्या आधीपासून सुरू झाले आणि अवघ्या २२ महिन्यांत ते भारतातील सर्वात तरुण युनिकॉर्न बनले. आज ‘अपना’ची किंमत नऊ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असून या प्लॅटफॉर्मवर १,५०,००० हून अधिक कंपन्या नोंदणीकृत आहेत, ज्यात Unacademy, Flipkart, Zomato, BigBasket सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.