Success story : शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आहे. शेतकरी शेतात राबतो आणि आपल्याला अन्न पुरवतो, म्हणून त्याला जगाचा पोशिंदा मानतात. शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. जर शेतकऱ्याने ठरवले तर तो मातीतूनही सोनं उगवू शकतो. आज आपण एका अशाच शेतकऱ्याविषयी जाणून घेणार आहोत. दहावी पास असलेला हा शेतकरी भाज्यांसह विविध प्रकारची पिके घेत कोटी रुपये कमवत आहे.

आयुष्यात यश हे शैक्षणिक पात्रतेने ठरत नाही तर आवड आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी यावर अवलंबून आहे, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. मधुसुदन हे पारंपरिक शेतीतून फलोत्पादनाकडे वळले आणि या धाडसी निर्णयाने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले.

मधुसुदन धाकड कोण आहेत?

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात राहणारे शेतकरी मधुसुदन धाकड हे फक्त दहावी पास आहेत. मधुसुदन यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला, त्यांचे वडील पारंपरिक शेती करायचे. शेतकऱ्याच्या घरी जन्मल्याने ते कधीच शेतीपासून दूर राहिले नाहीत. त्यांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. ते नवनवीन माहिती मिळवायचे. शेती हा नेहमीच त्यांच्या आवडीचा एक भाग होता, पण शेतीला करिअर म्हणून निवडणं हे वाटतं तेवढं सोप्पं नव्हतं. पण, त्यांनी ते करून दाखवलं. त्यांना शेती करताना येणाऱ्या आव्हानांची चांगली जाण होती, पण त्यांनी ते ही स्वीकारले.
सुरुवातीला मधुसुदन हे पारंपरिक शेती करायचे, पण शेतीच्या तंत्रामध्ये नवनवीन बदल आणि बाजारातील ट्रेंड लक्षात घेऊन ते बागायती पिकांकडे वळले.
मधुसुदन यांनी २०० एकर मोठ्या शेतजमिनीवर मिरची, सिमला मिरची, टोमॅटो, लसूण आणि आले यांसारख्या भाज्यांसह विविध प्रकारची पिके घेतली. शेतीमध्ये त्यांनी नवनवीन प्रयोग केले. त्यांच्या या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे त्यांनी कोटी रुपये कमवले. योग्य तंत्र, कामात सातत्यता आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आयुष्यात मोठी उंची गाठली.

मधुसुदन हे असंख्य शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणास्थान आहेत, ज्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य ही शक्य करून दाखवले. मधुसुदन सांगतात, “शेती हे माझ्या रक्तात आहे, पण जग बदलत आहे, त्यामुळे आयुष्यात प्रगती करण्यासाठी आपण काळाबरोबर चालायला हवे. शिक्षण महत्त्वाचे आहे, पण ते सर्व काही नाही. तुमच्यात इच्छाशक्ती असेल आणि काळानुसार बदलण्याची ताकद असेल तर तुम्ही आयुष्यात हव्या त्या गोष्टी प्राप्त करू शकता.”

Story img Loader