Success Story : समाजात आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, जे आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. आज आपण एका अशा मायलेकाची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्यांनी मोठ्या हिमतीने एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि ते दररोज ४० हजार रुपये कमावतात. या तरुणाचे नाव आहे जितू थॉमस. जितू आणि त्याची आई लीना पाच हजार वर्ग फुटांच्या जागेमध्ये मशरूमची (अळिंबीची) शेती करतात. ते दररोज १०० किलोपेक्षा जास्त मशरूमचे उत्पादन घेतात. तापमान नियंत्रित ठेवून, ते वैज्ञानिक पद्धतीने शेती करतात. हे मशरूम विकून ते चांगला नफा कमावत आहेत. त्याशिवाय जितू इतरांना मशरूमच्या शेतीचे प्रशिक्षणसुद्धा देतो. आतापर्यंत त्याने एक हजार लोकांना प्रशिक्षण दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : India Post Payments Bank धारकांनो सावधान! अन्यथा तुमचेही अकाउंट होईल रिकामी; टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी

कसा सुरू केला व्यवसाय?

२०१८ मध्ये जितूने एका खोलीमध्ये मशरूमचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्याचा हा पहिला प्रयोग यशस्वी ठरला. इंटरनेटवर त्याने प्लास्टिकच्या बाटलीमध्ये मशरूम उगवण्याची ट्रिक पाहिली होती आणि त्यातून त्याला ही कल्पना सुचली. त्याने मेहनत घेतली आणि त्याचे त्याला फळ मिळाले.
सुरुवातीला यश मिळाल्यानंतर त्याने मशरूमच्या शेतीविषयीची अधिक माहिती जाणून घेतली. त्याने मशरूम ची शेती कशी करावी, या संदर्भात अभ्यासक्रमसुद्धा केला. पुढे त्याच्या या छंदाचे व्यवसायात रूपांतर झाले.
आता जितू एक यशस्वी व्यावसायिक बनला आहे. त्याची आई लीना यांनी ‘लीनाज मशरूम’ नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीमध्ये हजारो मशरूमचे बेड आहे. या बेडपासून ते दररोज १०० किलोपेक्षा जास्त मशरूमचे उत्पादन घेतात.

हेही वाचा : Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…

मशरूमच्या शेतीचे अनेक फायदे आहेत. ते लवकर उगवते; पण मशरूमची शेती करणे तितकेसे सोपे नाही. मशरूम खूप नाजूक असते. तापमानातील थोडासाही बदल संपूर्ण पीक खराब करू शकते. त्यामुळे ही शेती नेहमी एका विशिष्ट रचनेनुसार केली जाते; ज्यामध्ये साधारणत: ५,००० बेड लावले जातात.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात मशरूमची लोकप्रियता खूप वाढली आहे. मशरूमची शेती करून तुम्ही पैसा कमावू शकता. जितूने वयाच्या फक्त १९ व्या वर्षी मशरूमच्या शेतीमध्ये आवड दाखवली आणि मेहनत घेतली. आज आईच्या मदतीने तो मशरूमची शेती करतो. जितू आणि त्याची आई हजारो लोकांसाठी एक प्रेरणास्रोत आहे, जे आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची इच्छा बाळगतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of a man who started mushroom farming business with his mother and earned 40 thousand rupees per day ndj